मालखेड येथे मगरीच्या दर्शनाने ग्रामस्थांमध्ये घबराट

 मालखेड येथे कृष्णा नदीकाठावर मंगळवारी सकाळी मगरीचे दर्शन झाले आहे. यामुळे मालखेडसह वाठार, रेठरे खुर्द, रेठरे बुद्रुक आणि वाळवा तालुक्यातील कासेगाव, तांबवे, खुबी ग्रामस्थांमध्येही घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

मालखेड येथे मगरीच्या दर्शनाने ग्रामस्थांमध्ये घबराट 

कराड/प्रतिनिधी : 

           मालखेड ता. कराड येथील कृष्णा नदीकाठावर मंगळवारी ३ रोजी सकाळी मगरीचे दर्शन झाले. यामुळे मालखेडसह वाठार, रेठरे खुर्द, रेठरे बुद्रुक, कासेगाव, तांबवे खुबी ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

          कृष्णा नदीवर मालखेड येथे  कासारशिरंबे ता. कराड उपसा जलसिंचन योजनेची विहीर आहे. या विहिरीलगत नदीकाठावर मंगळवारी सकाळच्या सुमारास मगर असल्याचे काही युवकांसह स्थानिक शेतकरी, ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. त्यानंतर सदर मगरीचे व्हिडिओ आणि फोटो तात्काळ सोशल मीडियावर वायरल झाल्याने मालखेडसह आसपासच्या लोकांनी नदीकाठी मगर पाहण्यास गर्दी केली होती. दरम्यान, याबाबतची माहिती वनविभागाला कळविण्यात आली आहे. 

          नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे कृष्णा नदीला महापूर आला होता. हा महापुरा ओसरल्यानंतर कृष्णा नदीपात्रात अनेक ठिकाणे मगरींचे दर्शन झाले आहे. नुकतेच सांगली येथेही कृष्णा नदीत मगरीची दर्शन झाले होते. आता कराड तालुक्यातही मगरीचे दर्शन झाल्याने नदीकाठच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. 

          या महापुरामध्ये शेतजमिनीसह शेतपिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काही ठिकाणी तर नदीकाठावरील शेतजमीनच वाहून गेल्याने नदीकाठ खचला आहे. त्यातच महापुरात वाहून आलेला गाळ, झाडे-झुडपे व इतर कचरा नदी काठालगत साचल्याने अनेक ठिकाणी अडचण निर्माण झाली आहेत. 

         आशातच आता मालखेड येथील कृष्णा नदीकाठावर मगरीचे दर्शन झाल्याने शेतकऱ्यांना नदीकाठावरील शेतात जाताना भीती वाटत आहे. त्यामुळे तात्काळ या मगरीला पकडून अन्यत्र हलवावे, अशी मागणी मालखेड, वाठार, रेठरे खुर्द, रेठरे बुद्रुकसह वाळवा तालुक्यातील कासेगाव, तांबवे, खुबी ग्रामस्थांमधूनही होत आहे.