मराठा समाजावर अन्याय झाल्यास पहिली ठिणगी कराडमध्येच

मराठा समाजावर अन्याय झाल्यास पहिली ठिणगी कराडमध्येच
बैठकीस उपस्थित मराठा समाजबांधव

कराड तालुका मराठा क्रांती मोर्चाची तातडीची बैठक : बैठकीत मराठा बांधवांचा निर्धार 

कराड/प्रतिनिधी : 
          मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. परंतु, कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजावर अन्याय झाल्यास खपवून घेतला जाणार नाही. असा सूर आळवीत समाजाला न्याय न मिळाल्यास पहिली ठिणगी कराडमध्येच पडेल, असा गर्भित इशारा देत समाजावर अन्याय झाल्यास मराठा स्टाईलने आंदोलन केले जाईल, अशी भुमिका मराठा बांधवांनी घेतली आहे. 
         सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी ९ रोजी मराठा आरक्षणाला दिलेल्या स्थगिती दिल्याच्या पार्श्वभूमीवर गुरूवारी १० रोजी कराड तालुका मराठा क्रांती मोर्चाची तातडीची बैठक आयोजीत करण्यात आली होती. अल्पावधीतच बोलवण्यात आलेल्या या बैठकीस सोशल डिस्टंसींगचे नियम पाळत उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी मोठ्या प्रमाणावर मराठा समाजबांधव उपस्थीत होते. 
         दरम्यान, तामिळनाडू मध्ये  72%  आरक्षण चालते. मग महाराष्ट्रातच का नाही? असा संतप्त सवाल देखील अनेक बांधवांनी उपस्थित केला. तसेच  मराठा आरक्षण प्रश्नी कराड तालुका नक्कीच राज्याला दिशादर्शक भुमिका घेईल, असा विश्वासही यावेळी उपस्थित अनेक मराठा बांधवांनी व्यक्त केला.