मराठी साहित्यिकांनी आपले मीपण विसरावे - मधुकर भावे

स्व. यशवंतराव चव्हाण यांनी कलावंत, साहित्यिकांसाठीही कल्याणकारी कार्य केले. ते ९ साहित्य संमेलनांचे उद्घाटक, तर ७ साहित्य संमेलनांचे स्वागताध्यक्ष होते. मात्र, साहित्यिकांनीच यशवंतरावांना साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होऊ दिले नाही. परंतु, मराठी साहित्यिकांनी सर्वव्यापी भूमिका घेत आपले मीपण विसरायला हवे.

मराठी साहित्यिकांनी आपले मीपण विसरावे - मधुकर भावे
कराड : कराड व परिसरातील साहित्यिकांचा गौरव करताना जेष्ठ पत्रकार मधुकर भावे. सोबत, खासदार श्रीनिवास पाटील, दैनिक प्रीतिसंगमचे संपादक शशिकांत पाटील, यशवंतनगरीचे संपादक विकास भोसले व सर्व साहित्यिक.

मराठी साहित्यिकांनी आपले मीपण विसरावे - मधुकर भावे 

साहित्यिक सन्मान सोहळा संपन्न : कराडकरांनी यशवंत विचारांचा नंदादीप तेवत ठेवावा 

कराड/प्रतिनिधी : 

        महाराष्ट्राला मोठी साहित्य परंपरा आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हेही एक साहित्यिक होते. त्यांनी कलावंत, साहित्यिकांसाठीही कल्याणकारी कार्य केले. ते ९ साहित्य संमेलनांचे उद्घाटक, तर ७ साहित्य संमेलनांचे स्वागताध्यक्ष होते. मात्र, साहित्यिकांनीच यशवंतरावांना साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होऊ दिले नाही; अशी खंत व्यक्त करत मराठी साहित्यिकांनी सर्वव्यापी भूमिका घेत  आपले मीपण विसरावे, असे प्रतिपादन जेष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी केले.

        येथील वेणूताई चव्हाण सभागृहात शनिवारी 12 रोजी स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या 109 व्या जयंतीनिमित्त दैनिक प्रीतिसंगमचे रौप्य महोत्सवी वर्ष व यशवंनगरी न्यूज नेटवर्कची द्विशतकी वाटचाल यानिमित्त आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार श्रीनिवास पाटील होते. याप्रसंगी कराड व परिसरातील साहित्यिकांचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी दैनिक प्रीतिसंगमचे संपादक शशिकांत पाटील, यशवंतनगरीचे संपादक विकास भोसले व मान्यवर उपस्थित होते.

        श्री. मधुकर भावे म्हणाले, यशवंतराव चव्हाण यांच्या रूपाने महाराष्ट्रासह देशाला एक लोककल्याणकारी नेतृत्व मिळाले. त्यांनी संयुक्त महाराष्ट्राचा सुवर्णकलश आणल्यानंतर सर्वसामान्य जनतेचे हित डोळ्यासमोर ठेवून अनेक विधायक कामे केली. पंचायतराज व्यवस्था, ग्रामीण भागामध्ये एमआयडीसीचे जाळे निर्माण करून सर्वसामान्यांना लोकशाहीचा अधिकार व रोजगार मिळवून दिला. महाराष्ट्रात असे यशवंतराव चव्हाण पुन्हा होणे नाही. याची राज्यकर्त्यांनाही जाण असणे महत्त्वाचे आहे. शेतकरी का चिरडले गेले? कामगार का भरडले गेले? हे पाहण्यात आत्ताच्या राजकारण्यांना वेळ नाही. ते यशवंतरावांनी केले. महाराष्ट्राने आतापर्यंत यशवंतरावांच्या विचारांचे बोट धरले होते. ते सोडल्याने महाराष्ट्र भरकटला आहे. मात्र, कराडकरांनी यशवंतरावांच्या विचारांचा नंदादीप तेवत ठेवावा, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

        ते पुढे म्हणाले, सध्याचे राजकारण व राजकारणी पूर्णपणे भरकटले आहेत. पूर्वी सत्ताधारी आणि विरोधकांची नाती वेगळी होती. सर्वसामान्यांच्या प्रश्नावर लढण्याची जाण असलेले विरोधी पक्षनेते होते. त्याकाळी 40 हून अधिक धरणे बांधून जमीन सुजलाम-सुफलाम झाली. मात्र, 80 नंतरच्या 42 वर्षात एकही धरण बांधले गेले नाही. उलट महामार्ग व उड्डाणपूल करून राज्यकर्त्यांनी महाराष्ट्र उद्ध्वस्त केला. शहरी भागाचा लखलखाट करताना ग्रामीण भागाचा रखरखाट करू नका, असे म्हणत राज्यकर्त्यांमध्ये आता संवेदना उरली नसल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. 

        खा. श्रीनिवास पाटील म्हणाले, साहित्यप्रेमी यशवंतरावांच्या जयंती दिनानिमित्त सरस्वतीच्या दरबारातील मानकरी साहित्यिकांचा सत्कार होत आहे, याचा आनंद आहे. साहित्यिकांनी परिवर्तनशील व यशवंत विचारांची भूमिका मांडावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

     ते म्हणाले, यशवंतराव चव्हाण यांनी सर्वसामान्यांसाठी न्यायिक भूमिका घेतली. अनेक निर्णयांमधून त्यांनी लोकांचा भाग्योदय केला. हेच विचार जोपासण्याची आज गरज आहे. मधुकर भावे यांनी अत्यंत संघर्षमय परिस्थितीत मराठा वृत्तपत्रातून त्यांच्या पत्रकारितेची सुरुवात केली. आपल्या लेखणीच्या माध्यमातून त्यांनी यशवंत विचार जोपासला. तसेच सर्वसामान्यांना न्याय-हक्क मिळवून देण्याची भूमिका त्यांनी घेतली. त्यानुसार पत्रकारांनी सर्वसामान्यांप्रती आपली जबाबदारी ओळखून काम करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

     दरम्यान, मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन व स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी, कराड व परिसरातील साहित्यिक डॉ. शिवाजीराव ठोंबरे, विद्याधर गोखले, सी.डी.पवार, महादेव साने, बबन पोतदार, डॉ. मच्छिंद्र सकटे, अॅड.संभाजीराव मोहिते, डॉ. सुहासकुमार बोबडे, सुभाषराव गुरव, बसवेश्वर चेणगे, शंकर कवळे, संदिप डाकवे, सौ. अनघा दातार, सौ. शिल्पा चिटणीस, माणिक बनकर, अभय देशमुख, प्रा.दिलिपकुमार मोहिते डॉ. कोमल कुंदप यांचा यशवंतराव चव्हाण साहित्य गौरव सन्मान करण्यात आला.

     प्रास्ताविकात यशवंतनगरीचे संपादक विकास भोसले यांनी कराड ही यशवंतराव चव्हाण यांची साहित्य नागरी आहे. त्यामुळे आगामी काळात २५ नोव्हेंबर रोजी कराड येथे यशवंतराव चव्हाण साहित्य संमेलन व्हावे. यासाठी सर्वांनी विशेष प्रयत्न करावेत. तसेच त्यांचे साहित्य प्रकाशित करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. दैनिक प्रीतिसंगमचे संपादक शशिकांत पाटील यांनी आभार मानले. सूत्रसंचालक भरत कदम यांनी केले. 

एसटीचा कणा मोडू देऊ नका 

एसटी हा सर्वसामान्यांच्या जीवनाचा कणा आहे. एसटीच्या माध्यमातूनच शाळा-महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेऊन अनेकजणांची आज विविध क्षेत्रात यशस्वी वाटचाल चालू आहे. एसटी ही गरिबांची असून सर्वसामान्य माणूसही एसटीचा कणा आहे. मात्र, काही व्यावसायिक तो कणा मोडायला निघाले आहेत. मात्र, तो मोडू देऊ नका, असे आवाहनही श्री. भावे यांनी केले. 

प्रीतिसंगमावरील समाधी आपल्यासाठी तीर्थक्षेत्र 

12 मार्च हा यशवंतराव चव्हाण यांचा जन्मदिन आहे. येथील प्रीतिसंगमावर असलेली त्यांची समाधी ही आपल्यासाठी तीर्थक्षेत्र आहे. मात्र, कराडच्या एकाही वृत्तपत्रात आज त्यांच्या कार्यावर चार ओळींचा लेख छापल्याचे दिसत नाही. राज्यात आदर्श निर्माण करणाऱ्या यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीचाच कराडच्या पत्रकारितेला विसर पडतो, याची शरम वाटते. असे परखड मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

सामान्यांच्या प्रश्नांना वृत्तपत्रात जागा नाही 

प्रसारमाध्यमे ही लोकशाहीचा चौथा स्थंभ आहेत. परंतु, आता हा स्थंभच डळमळीत झाला आहे. माणसे पदांनी नाही, तर मनांनी मोठी होतात, याची जाण ठेवणे महत्वाचे आहे. मात्र, आता सामान्य माणसांच्या प्रश्नांना वृत्तपत्रात जागा मिळत नाही, ही मोठी खंत आहे. सामान्य माणसांचा आवाज जिवंत ठेवण्याचे काम पत्रकारांचे आहे, असे परखड मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.