ऐसे भोंदू मठाधिपती, शिणविती जगा

सर्वजण बाजीराव बुवांसारखे नसतात. तरीही अशा दुर्दैवी गोष्टी जेव्हा घडतात, त्याचा समाजावर मोठा परिणाम होतो आणि लोकांचा पाहण्याचा दृष्टीकोन बदलतो. त्यामुळे अखंड सावधान चित्त असो द्यावे. समाजातील चुकीच्या परंपरेवर, हीन प्रवृत्तीवर वार करून समाजात सकारात्मक बदल घडवणारे ते खरे ‘वारकरी’ होत, याचे स्मरण सर्वांना असावे.

ऐसे भोंदू मठाधिपती, शिणविती जगा
बाजीराव कराडकर

कृष्णाकाठ / अशोक सुतार

            श्री मारुतीबुवा मठ, कराड येथे पूर्वी मठाधिपती असलेल्या बाजीराव मामा कराडकर याने मठाधिपती होण्याच्या वादातून विद्यमान मठाधिपती ह.भ.प. जयवंतबुवा पिसाळ यांची पंढरपूर येथील कराडकर मठात निर्घृण हत्या केली. वारकरी संप्रदायात यामुळे खळबळ माजली आहे. बाजीराव कराडकर यांची पोलिसांनी अधिक चौकशी केली तर अजून बऱ्याच गोष्टी उघडकीस येण्याची शक्यता आहे. खरे तर वारकरी संप्रदाय हिंसेच्या विरोधात असताना ही गुन्हेगारी प्रवृत्ती वारकरी संप्रदायात शिरलीच कशी, असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. मठाधिपती होण्यासाठी किंवा या पदावरून डावलून दुसऱ्याला संधी दिल्यामुळे जर हिंसा करण्याची मानसिकता तयार होत असेल तर यावर समाजाने आणि विशेष करून मठांच्या विश्वस्त मंडळाने गांभीर्याने विचार करायला हवा असे वाटते. प्रत्येक व्यक्तीचे गुण, दोष जाणून त्यांना त्याप्रमाणे पद दिले पाहिजे. नाहीतर संत तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे होते. अंगी चंदन लावितें भाळीं । सदा शूळ माझे कपाळीं ॥ एवढेच सांगून संत तुकाराम थांबत नाहीत तर ते इशारा देतात की, आशाबद्ध जन । काय जाणे नारायण ॥१॥करी इंद्रियांची सेवा । पाहे आवडीचा हेवा ॥ध्रु.॥भ्रमलें चावळे । तैसें उचित न कळे ॥२॥तुका म्हणे विषें । अन्न नाशियलें जैसें ॥३॥ संत तुकारामांनी वारकरी संप्रदायाची पताका फडकावली. मानवाचा मनुष्य स्वभाव न ओळखताच त्याला उच्च पदावर बसवले की त्याला उन्मतपणा येतो. त्याला पाठिंबा देणारेही त्याच दर्जाचे हीन असतात. मठाधिपती पदावरून झालेल्या खुनामुळे वारकरी हादरले आहेत. मठाधिपती या पदावर असणाऱ्या व्यक्तीकडे तो सर्वज्ञ, बुद्धिवंत आणि मायाळू, इच्छारहित असावा, अशी अपेक्षा लोक करतात. त्या पदावरील व्यक्तीकडे तसे पहिले जाते. परंतु ज्या वारकरी संप्रदायाचा हिंसेला विरोध आणि समाजाशी ममतेची नाळ जोडलेली असते, त्याच संप्रदायातील काहीजण असे कृत्य करतात तेव्हा तरी काहीतरी चुकते आहे, व्यवस्था बिघडली असल्याचे जाणवते. त्यामुळे यापुढे उगा पदाचे अवडंबर माजवणे योग्य नव्हे. सर्व गोष्टींचे परीक्षण, चिंतन हवे. पंढरपुरात झालेला जयवंतबुवा पिसाळ यांचा खून हा निषेधार्ह आहेच, तो मानवतेला काळिमा फासणारा आहे, असे वाटते.                                    कराड येथे मनोऱ्याजवळ श्री मारुतीबुवा कराडकर मठ आहे. ज्येष्ठ वारकरी नेते बंडातात्या कराडकर यांचा हा मठ असून येथे भाविक नेहमी ये- जा करतात. माजी मठाधिपती बाजीराव मामा कराडकर यांच्या गैरवर्तनामुळे एक वर्षापूर्वी विश्वस्तांनी त्यांना मठाधिपती पदावरून हटवले होते. त्यांच्या जागी ह.भ.प. जयवंतबुवा पिसाळ यांची नेमणूक केली होती. यानंतर या वर्षभरात विश्वस्त मंडळ आणि बाजीरावमामा कराडकर यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु होते. बाजीरावबुवा कराडकर यांनी विश्वस्त मंडळाच्या एका बैठकीत झालेल्या वादानंतर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष यशवंत दाजी माने गुरुजी या ९२ वर्षाच्या वयोवृद्धावच्या डोक्यात विण्याचा प्रहर करून त्यांना गंभीर जखमी केले होते. जखमी झालेल्या माने यांना एक हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते, एवढी गंभीर जखम झाली होती. त्यावेळी बाजीरावबुवाने माने गुरुजींना जीवे मारण्याचीही धमकी दिली होती. त्यावेळी बाजीरावबुवाला शिक्षाही झाली होती. असे गुंडासारखे वर्तन असलेल्या बाजीराव बुवाने पंढरपूर येथे विद्यमान मठाधिपती जयवंतबुवा पिसाळ यांना मठात गाठून त्यांच्यावर चाकूहल्ला करत वरवंट्याने त्यांचा खून केला. ही घटना सांगण्याचे विशेष म्हणजे बाजीरावबुवा याची मठाधिपती पदाची आसक्ती गेली नव्हती आणि उन्मादही कमी झाला नव्हता, हेच यातून स्पष्ट होते. राजकारण, अर्थकारण हे भौतिक जग आहे, यात वैर, एकमेकांना संपवण्याची भाषा, कृती चालते. परंतु अध्यात्मिक जगात हे भौतिक जग घुसल्यामुळे हा अनर्थ होत आहे. इर्षा, आसक्ती, लोभ, भौतिक सुखाला चटावलेले विठ्ठलाचे स्मरण न करता, लोकांना अध्यात्मिक मार्गदर्शन न करता विठ्ठलापासून केव्हाच दूर गेले आहे. तो जगत्नियंता विठूराया अनेकांना प्रेमाचा, अध्यात्माचा संदेश देऊन गैरवर्तनापासून परावृत्त करत आहे. परंतु, नाही ध्यानी विठ्ठल,भौतिक सुखाचे स्मरण। विठूपासुनी राही दूर, दुराचारी तो चांडाळ ॥ अशी अवस्था सध्या काहीजणांची झाली आहे. अशा दुराचाऱ्यांना अधिकारी व्यक्तींनी वेसन घातली पाहिजे, अन्यथा समाजाची दिशाभूल होऊ शकते.                                                                                                                      मठाधिपतीच्या वादातून झालेली जयवंतबुवांची हत्या ही समाजाला क्लेशकारक आहे. वारकरी संप्रदायात हिंसेला जागा नाही. पंढरपुरात सर्व वैष्णव विठुरायाच्या दर्शनासाठी एकत्र येतात, समतेचा, प्रेमाचा संदेश देतात. त्याच पंढरपुरात असे हीन कृत्य घडावे, यासारखी वाईट गोष्ट नाही. आपण अध्यात्मिक जगात भौतिक मायेला जवळ केले आणि लोकांना आदर्श आचारसंहितेचे मार्गदर्शन करण्याऐवजी स्वतःच पापे करून दुराचारी बनलो तर ती समाजाची एक शुद्ध फसवणूक आहे. म्हणूनच संत तुकाराम लोकांना आपल्या अभंगातून दुराचारी लोकांबद्दल सावध राहण्याचा संदेश देतात, भूमि कांपे त्याच्या भारें । कुंभपाकाचीं शरीरें ॥ निष्टुर उत्तरें । पापदृष्टी मळिणचित्त ॥ दुराचारी तो चांडाळ । पाप सांगातें विटाळ ॥ तुका म्हणे खळ । म्हणोनियां निषद्धि तो ॥ समस्त वारकरी संप्रदायाला एक विनंती  की, सर्वजण बाजीराव बुवांसारखे नसतात. तरीही अशा दुर्दैवी गोष्टी जेव्हा घडतात, त्याचा समाजावर मोठा परिणाम होतो आणि लोकांचा पाहण्याचा दृष्टीकोन बदलतो. त्यामुळे अखंड सावधान चित्त असो द्यावे. समाजातील चुकीच्या परंपरेवर, हीन प्रवृत्तीवर वार करून समाजात सकारात्मक बदल घडवणारे ते खरे ‘वारकरी’ होत, याचे स्मरण सर्वांना असावे.