हवा तेज चलता है, मोदीजी टोपी संभालो !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या भवितव्यासाठी विचारपूर्वक निर्णय घेतले पाहिजेत. अन्यथा आगामी निवडणुकीपर्यंत भारताच्या फायद्याचे निर्णय घेतले नाहीत आणि इतर गोष्टी (उपद्व्याप ) सुरु ठेवले तर त्यांचे काही खरे नाही, असे दिसते. अग्निपथ चित्रपटात नायक अमिताभ बच्चन हा दिनकरराव याला इशारा देतो, दिनकरराव टोपी संभालो, हवा तेज चलता है ! याप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रतिकूल गोष्टींवर उपाययोजना करणे सुरु केले नाही तर मतदारच त्यांना धडा शिकवतील, अशी अस्वस्थ परिस्थिती देशात सुरु आहे.                                           

हवा तेज चलता है, मोदीजी टोपी संभालो !
cartoon by Ashok Sutar

            संडे स्पेशल /अशोक सुतार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पत जगात वाढली असतानाच देशातील आर्थिक मंदी, सातत्याने होणारी आंदोलने आणि वाढलेली बेरोजगारी इ. प्रश्न निर्माण झाले आहेत. यातच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, त्यांच्या पत्नी मेलेनिया ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यापूर्वी युएससीआयआरएफ या आंतरराष्ट्रीय पातळीवरील धार्मिक स्वातंत्र्यबाबतच्या आयोगाने एक अहवाल प्रकाशित केला असून यात देशातील लोकांचे धार्मिक स्वातंत्र्य धोक्यात आल्याचे म्हटले आहे. सदर अहवालामुळे केंद्र सरकारची चिंता वाढली आहे. डोनाल्ड ट्रम्प दि. २४ व २५ फेब्रुवारी रोजी भारत दौऱ्यावर येत आहेत. ते दिल्ली व मोदींच्या गुजरातमध्ये जाणार आहेत. ट्रम्प यांना अहमदाबाद येथील झोपडपट्टी दिसू नये म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चक्क अर्धा किमी लांबीची भिंत बांधली आहे. यावरून मोदींवर जोरदार टीका होऊ लागली आहे. मोदी गुजरातमधील गरिबी लपवत आहेत, असा संदेश जगभर पसरत आहे. अमेरिकेतही झोपडपट्ट्या आहेत, मग डोनाल्ड ट्रम्प यांची लाज कसली बाळगायची ? मोदींनी झोपडपट्टीवासियांना यापूर्वीच पक्की घरे बांधून दिली असती तर अशी वेळ मोदींवर आली नसती आणि गुजरातच्या विकासाचा फुगा फुटला नसता. मोदी अनेक कारणांवरून अडचणीत आले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प भारतात येणार म्हणजे काही करार- मदार असावा, परंतु तेही नाही. ट्रम्प दौऱ्यावर भारताचे शंभर कोटी वाया जाणार आहेत, एवढेच काय ते ! त्या दौऱ्यातून ट्रम्प यांचा अमेरिकेतील आगामी निवडणुकीत राजकीय फायदा होणार आहे,हे मात्र नक्की ! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या भवितव्यासाठी विचारपूर्वक निर्णय घेतले पाहिजेत. अन्यथा आगामी निवडणुकीपर्यंत भारताच्या फायद्याचे निर्णय घेतले नाहीत आणि इतर गोष्टी (उपद्व्याप ) सुरु ठेवले तर त्यांचे काही खरे नाही, असे दिसते. अग्निपथ चित्रपटात नायक अमिताभ बच्चन हा दिनकरराव याला इशारा देतो, दिनकरराव टोपी संभालो, हवा तेज चलता है ! याप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रतिकूल गोष्टींवर उपाययोजना करणे सुरु केले नाही तर मतदारच त्यांना धडा शिकवतील, अशी अस्वस्थ परिस्थिती देशात सुरु आहे.                                                  अमेरीकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी मेलेनिया दि.२४ आणि २५ फेब्रुवारी रोजी अहमदाबाद, आग्रा आणि नवी दिल्लीला भेट देणार आहेत. कोलोरॅडो येथील ‘कीप अमेरिका ग्रेट’ मेळाव्यात बोलताना ट्रम्प नुकतेच म्हणाले आहेत की, मागील काही वर्षांपासून भारताने चढे आयात कर लावले असून त्यामुळे अमेरिकेला व्यापारात मोठा फटका बसला आहे. मी पुढील आठवड्यात भारता दौऱ्यावर जाणार आहे. त्यावेळी भारताशी व्यापारावर चर्चा होईल. त्यांनी आमच्या वस्तूंवर इतकी वर्षे बरेच कर लादले त्याचा आम्हाला व्यापारात आर्थिक फटका बसला आहे. मोदी मला खरोखर आवडतात, मी त्यांच्याशी व्यापारावर चर्चा करणार आहे. पण आताच्या भेटीत कोणताही व्यापार करार केला जाणार नाही, फक्त त्यावर चर्चा होईल. निवडणुकीनंतर व्यापार करारावर विचार केला जाईल. अमेरिकेच्या फायद्याचा असेल तरच व्यापार करार केला जाईल. कुणाला आवडो न आवडो आमच्यासाठी अमेरिका प्रथम हे धोरण कायम आहे, असे ट्रम्प म्हणाले. म्हणजेच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारताशी फक्त फायद्याचे नाते ठेवू शकतात, अन्यथा नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ट्रम्प यांच्याशी बरोबरी करू इच्छित आहेत. परंतु भारतात अनेक गोष्टींची प्रतिकूलता असून देशात मानवी स्वातंत्र्याचे हनन सुरु आहे. त्यामुळे देशात अस्वस्थता सुरु असून अस्थिरतेचे वातावरण आहे. हे वातावरण सकारात्मक बदलांकडे नेणे याला पंतप्रधान मोदींनी प्राथमिकता दिली पाहिजे. तसेच देशातील आर्थिक मंदी संपवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. देशातील गरिबांची सख्या वाढत आहे, हा मोठा धोका आहे. त्यामुळे भारताला महासत्ता बनण्यास अनेक अडथळे आहेत. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमची अर्थव्यवस्था पाच ट्रिलीयनकडे प्रवास करू लागली आहे, आगामी काळात ते शक्य होईल, अशी लोणकढी थाप मारली आहे. परंतु पाच ट्रिलीयनच्या  अर्थव्यवस्थेचे आश्वासन देऊन काहीही हशील होणार नाही. त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न दिसून आले पाह्जेत.                                                                          आगामी ट्रम्प दौऱ्याचे वर्णन करताना मोदींनी म्हटले आहे की, ट्रम्प यांच्या स्वागतासाठी सुमारे सत्तर लाख लोक उपस्थित राहणार आहेत. असे सांगून ट्रम्प यांना खुश करायचे आहे काय ? अहमदाबाद विमानतळापासून ते मोटारा स्टेडियम या मार्गावर सात दशलक्ष लोक आपल्या स्वागतासाठी येतील, असे मोदी यांनी सांगितल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. ट्रम्प गुजरात येथील अहमदाबादला ‘नमस्ते ट्रम्प’ या कार्यक्रमासाठी मोटेरा स्टेडियममधील कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. मोटेरा स्टेडीयमचे उद्घाटनही होत आहे. हे स्टेडीयम जगातील सर्वात मोठे स्टेडीयम असल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.   24 फेब्रुवारीला दुपारी अहमदाबादच्या विमानतळावर अमेरिकन एअरफोर्स वन या विमानाने राष्ट्राध्यक्ष ट्रॅम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया ट्रॅप यांचे आगमन झाल्यांनतर त्यांच्या दोन्ही बाजूंना भारताच्या तिन्ही दलाचे जवान मानवंदना देत उभे असणार आहेत. प्रोटोकॅल तोडून स्वतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदी राष्ट्राध्यक्ष ट्रॅप यांच्या स्वागतासाठी विमानतळावर उपस्थित राहणार आहेत. ट्रम्प यांच्यासोबत एक उच्चस्तरीय प्रतिनिधीमंडळही राहणार आहेत. भारत व अमेरिका यांच्यात ऐतिहासिक संमेलन असल्याचे म्हटले जात आहे. अहमदाबादमध्ये होणारा ‘नमस्ते ट्रम्प’ हा कार्यक्रम गेल्या वर्षी ह्य़ूस्टनमध्ये झालेल्या ‘हाऊडी मोदी’ कार्यक्रमाच्या धर्तीवर राहणार आहे.                                                   द युनायटेड स्टेटस कमिशन ऑन इंटरनॅशनल रिलीजस फ्रीडम या आंतरराष्ट्रीय पातळीवरील आयोगाने एक अहवाल नुकताच प्रकाशित केला असून सीएए (नागरिकत्व सुधारणा कायदा ) बाबत आपले मत व्यक्त केले आहे. या आयोगाच्या अहवालात केंद्र सरकार देशातील हिंसाचार रोखण्यात अपयशी झाले असल्याचे मत नोंदवले आहे. देशातील अल्पसंख्य नागरिक सुरक्षित नसल्याचेही या अहवालात म्हटले आहे. धर्माच्या आधारे, भारतात होणाऱ्या हिंसाचाराचे प्रमाण २०१८ पासून वाढीस लागले आहे. केंद्र सरकार याकडे दुर्लक्ष करत असल्याचे निरीक्षण सदर आयोगाने नोंदवले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यांच्या भाजपा पक्षातील अनेक नेत्यांचे उजव्या हिंदुत्ववादी संघटनांसोबत संबंध असून त्यांनी जहाल वक्तव्ये केले असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्याशिवाय देशात सुरू असलेल्या सुधारीत नागरिकत्व विधेयकाविरोधातील आंदोलनाचा उल्लेख अहवालात करण्यात आला आहे. हे आंदोलन हिंसाचाराने मोडण्यात येत असून अल्पसंख्यांकांमध्ये असुरक्षितपणाची भावना असल्याचे नमूद करण्यात आले आहे. देशात नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे अनेक आंदोलने होत असून ही आंदोलने मोडून काढण्यासाठी सत्ताधारी पक्षाशी संबंधित लोक कार्य करीत असल्याचे दिसत आहे. देशातील नागरिकांचे धार्मिक स्वातंत्र्य नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे धोक्यात आल्याचा इशाराही द युनायटेड स्टेटस कमिशन ऑन इंटरनॅशनल रिलीजस फ्रीडम या आयोगाने दिला आहे.                                                                                                                     अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतात येत आहेत. या दौऱ्यादरम्यान ट्रम्प पंतप्रधान मोदींशी सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) व राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) च्या मुद्यांसह धार्मिक स्वातंत्र्याच्या मुद्यावर चर्चा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिका भारताच्या लोकशाही परंपरा आणि संस्थानांचा खूप आदर करत असल्याचे व्हाइट हाऊसकडून सांगण्यात आले आहे. तसेच, ट्रम्प यांच्या दौऱ्याअगोदर अमेरिकी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्याकडून हे देखील सांगण्यात आले की, धार्मिक स्वातंत्र्याचा मुद्दा अमेरिकेसाठी महत्त्वाचा आहे. भारत दौऱ्यावर असताना ट्रम्प धार्मिक स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर पंतप्रधान मोदींशी चर्चा करतील. सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) व राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) च्या मुद्यावर अमेरिका चिंतीत असल्याचेही यावेळी अमेरिकन प्रशासनातील अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. याशिवाय, ट्रम्प पंतप्रधान मोदींबरोबर लोकशाही, वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वातंत्र्याच्या मुद्यांबद्दलही बोलणार असल्याचे म्हटले आहे.                                                                                      अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौर्‍यापूर्वी कॉंग्रेसने प्रश्न उपस्थित केले आहेत. कॉंग्रेसने विचारले आहे की 'हाउडू मोदी' सारखा 'नमस्ते ट्रम्प' कार्यक्रम आहे का ? ट्रम्प यांच्या कार्यक्रमाला विरोधी पक्षातील नेत्यांना का आमंत्रित केले नाही ? असा सवाल कॉंग्रेसने केला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागत समितीचे अध्यक्ष कोण आहे ? असा प्रश्न देखील कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी उपस्थित केला. ट्रम्प यांना कधी आमंत्रित करण्यात आले आणि या आमंत्रणाचा स्वीकार त्यांनी कधी केला ?  ट्रम्प का म्हणत आहे की, त्यांच्या स्वागतासाठी ७० लाख नागरिक उपस्थित राहणार आहेत ? असे सवाल कॉंग्रेसने व्यक्त केले आहेत. एका खासगी संस्थेने आयोजित केलेल्या तीन तासांच्या कार्यक्रमांसाठी गुजरात सरकार १२० कोटी रूपये का खर्च करत आहे ? परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार म्हणतात, नमस्ते ट्रम्प हा कार्यक्रमाचे आयोजन 'डोनाल्ड ट्रम्प नागरिक अभिनंदन समिती'तर्फे करण्यात आले आहे. कार्यक्रमाला कोणाला आमंत्रित करायचे याचा निर्णय पूर्णपणे समितीचा आहे. डोनाल्ड ट्रम्प सिटीझन अबोलिशन कमिटी च्या वतीने 'नमस्ते ट्रम्प' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया (बीसीसीआय) ने मोटेरा स्टेडीयमबाबत म्हटले आहे की, हे जगातील सर्वात मोठे स्टेडीयम आहे. ट्रम्प येणार असलेल्या कार्यक्रमावेळी एक लाख १० हजारपेक्षा जास्त लोकांची बैठकीची व्यवस्था येथे केली आहे. एकूण ट्रम्प यांचा दौरा देशात चर्चेचा आणि वादग्रस्त ठरला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सदोष धोरणांमुळे भारतावर टीका होत असताना आता ट्रम्प दौराही चर्चेत आला आहे. या दौर्यातून काहीही निष्पन्न होणार नसल्याचेच दिसत आहे.