उदयनराजेंना लोकसभेच्या निवडणुकीत टक्कर दिलेले नरेंद्र पाटील पवारांना भेटले

उदयनराजेंना लोकसभेच्या निवडणुकीत टक्कर दिलेले नरेंद्र पाटील पवारांना भेटले

 

सातारा : माजी खासदार उदयनराजे भोसले यांचा भाजप प्रवेश होत असताना माथाडीचे नेते नरेंद्र पाटील यांनी शनिवारी (ता. 14) राष्ट्रवादीचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांची भेट घेतली. 
माथाडी कायद्याला 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आमची त्यांच्याशी पूर्वनियोजित भेट ठरली होती. त्यानुसार ही भेट घेतल्याचे त्यांनी सांगितले असले तरी सध्या राजकिय घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर ही भेट महत्वपूर्ण मानली जात आहे. कारण श्री. पाटील यांनी यापूर्वी उदयनराजेंविरोधात लोकसभेची निवडणुक लढवून चार लाख 46 हजारांवर मते घेतली होती. 
सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीसोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आता या जागेची पोटनिवडणुक विधानसभेसोबतच घेण्याचे सुतोवाच मुख्यमंत्र्यांनी केले आहेत. त्यामुळे या मतदारसंघात राजकिय हालचालींना गती आली आहे. उदयनराजेंविरोधात राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असेल याची उत्सुकता आहे.
सध्यातरी राष्ट्रवादीकडून माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, जिल्हा बॅंकेचे संचालक नितीन पाटील, पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांची नावे घेतली जात आहे. यासोबतच आघाडीचा उमेदवार म्हणून कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचाही उमेदवारीसाठी राष्ट्रवादीकडून विचार होऊ शकतो. या सर्व घडामोडीच्या पार्श्‍वभूमीवर आज शिवसेनेचे नेते व अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी मुंबईत राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार यांची भेट घेतली. ही भेट माथाडी कायद्याला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर होती असे ते सांगत असले तरी उदयनराजेंनी भाजप सोडण्यास आणि नरेंद्र पाटील यांनी श्री. पवारांची भेट घेण्याचा योगायोग कसा, असा प्रश्‍न राजकिय वर्तूळातून उपस्थित होऊ लागला आहे. 
यासंदर्भात श्री. पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ही भेट केवळ योगायोग असून माथाडी कायद्याला 50 वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्ताने श्री. पवार यांच्याशी आमची भेट घेण्याचे ठरले होते. त्यानुसार ही भेट असून आजच उदयनराजेंनीही राजीनामा दिला आहे. त्यामुळे या भेटीचा केवळ योगायोग आहे. मी मुख्यमंत्र्यांचा विश्‍वासू माणूस असल्याने मी कशाला गडबड करू, असे सांगून साताऱ्याच्या जागेचा निर्णय पक्षप्रमुख उध्दव ठाकरे व मुख्यमंत्र्यांनी घ्यायचा आहे. साताऱ्याची जागा शिवसेनेच्या वाट्याची आहे. उद्या निवडणुक लागली तर कोणत्या चिन्हावर ही निवडणुक लढविली जाईल, हे नेते ठरवितील, असेही त्यांनी स्पष्ट केले.