विनापरवाना उत्खनन वाहतूक प्रकरणी ८ डंपर २ पोकलँड जप्त

उंब्रज इंदोली मंडळ अधिकाऱ्यांची कारवाई,कोटींचा मुद्देमाल ताब्यात

विनापरवाना उत्खनन वाहतूक प्रकरणी ८ डंपर २ पोकलँड जप्त

महामार्ग सहापदरीकरणाच्या कामात लागणाऱ्या भरावासाठी कराड तालुक्यातील साबळवाडी बंधाऱ्यात बेसुमार उत्खनन सुरू आहे. या उत्खननासाठी संबंधित कंपनीने कोणतीही परवानगी घेतली नसल्याने उंब्रज ग्रामपंचायतीने आक्रमक भूमिका घेतली त्यानंतर बुधवारी महसूल विभागाच्या पथकाने साबळवाडी येथील बंधाऱ्यावर छापा टाकून दोन पोकलेनसह आठ डंपरवर कारवाई केली आहे. उंब्रज पोलीस ठाण्याच्या आवारात ही वाहने लावण्यात आली आहेत. रात्री उशिरापर्यंत या संदर्भात कारवाई सुरू होती. 

 

साबळवाडीतील बंधारा दुर्लक्षित

 

महामार्गाच्या कामाला मुरूम उत्खनन करण्यासाठी साबळवाडीतील तलावाची आठवण येते परंतु गेली कित्येक वर्ष पावसाळ्यानंतर काही दिवसात कोरडा ठणठणीत होणाऱ्या या तलावात कायमस्वरूपी पाणी साठून राहण्यासाठी कोणतीही उपाययोजना होत नाही.यामुळे महसूल विभाग खमक्या भूमिका घेऊन सातारी हिसका दाखवणार की नागपूरच्या आदेशापुढे लोटांगण घालणार याबाबत नागरिकांच्यात उलटसुलट चर्चा सुरू आहे.

 

        दरम्यान महसूल विभागाने दिलेल्या माहितीनुसार बुधवार दि. २६ रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. मंडल अधिकारी युवराज काटे व श्रीकांत धनवडे यांच्यासह तलाठी एस एस काळे यांनी साबळवाडी येथील बंधाऱ्यावर छापा टाकला. त्यावेळी तेथे जैन कंपनीचे चार डंपर व दोन पोकलेन मिळून आले.  तसेच अंधारवाडी रोडने मुरूम वाहतूक करणारे चार डंपर मिळून आले.  महसूल अधिकाऱ्यांनी एकू आठ डंपर व पोकलेन ताब्यात घेऊन ४४ ब्रास मुरूमासह या वाहनांवर कारवाई केली आहे.  कोणतीही परवानगी न घेता  मुरूम उत्खनन सुरू असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली होती.  त्यानुसार पथकाने सायंकाळच्या सुमारास साबळवाडी येथे छापा टाकला.  यावेळी बंधाऱ्यात डीपी जैन कंपनीचे चार डंपर व  दोन पोकलेन मिळून आले. तसेच अंधारवाडी रोडने मुरूम वाहतूक करणारे चार डंपर मिळून आले. महसूल पथकाने आठ डंपर व एक पोकलेन उंब्रज पोलीस ठाण्यात आणून लावले तसेच घटनास्थळी आणखी एक पोकलेन आहे. दरम्यान या कारवाईने परिसरात एकच खळबळ उडाली. पोकलेन व डंपर पोलीस ठाण्याकडे नेताना सुमारे १५ ते २० मिनिटे सेवा रस्तावर वाहतूक कोंडी निर्माण झाली. त्यामुळे या कारवाईच्या चर्चेला नागरिकांच्यात उधाण आले. 

 

पंचनामा महत्वाचा

 

प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार सुमारे सहाशे ते सातशे ब्रास उत्खनन झाले आहे परंतु पंचनामा एकशे सहा ब्रासचा झाला असल्याची चर्चा आहे तर सुमारे आठ वाहनांमधील सात मोठे डंपर एक छोटा डंपर आणि दोन पोकलँड अशी करोडो रुपयांचा मुद्देमाल उंब्रज पोलीस ठाण्यात लावला आहे. यामुळे विनापरवाना उत्खनन आणि वाहतूक करताना वाहने आढळल्याने पंचनामा महत्वाचा ठरणार आहे.

 

   सद्यस्थितीत उंब्रज-कराड परिसरात  महामार्ग सहा पदरीकरणाचे काम जोमात सुरू आहे.  मात्र या कामावेळी नियमांची पायमल्ली करून मोठ्या प्रमाणावर मुरूम उपसा केला जात आहे.  भरावासाठी स्थानिक गावातून काही ठिकाणी उपसा सुरू आहे.  या अनुषंगाने महसूल पथकाने आज साबळवाडी येथे बंधाऱ्यात कारवाई करून आठ डंपर ताब्यात घेतले. सदरची वाहने सायंकाळी उशिरा उंब्रज पोलीस ठाण्याच्या लावण्यात आली असून कारवाईचे काम सुरू होते. अशी माहिती मंडळ अधिकारी युवराज काटे यांनी दिली.