पंढरपूर तालुक्यातील वाळू तस्करांवर जिल्हा पोलिस पथकाची धाड...

पंढरपूर तालुक्यातील वाळू तस्करांवर जिल्हा पोलिस पथकाची धाड...

 

दहा जणांवर गुन्हे दाखल; ८० लाखांचा मुद्देमाल जप्त:

महसूल विभागाची मात्र गांधारीची भुमिका...

पंढरपूर /प्रतिनिधी 

           अवैध मार्गाने पैसा मिळवण्यासाठी कायदा धाब्यावर बसवून वाळू व्यवसाय करणाऱ्या बेफाम वाळू तस्करांवर पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने धाड टाकली. १० वाळू तस्करांवर गुन्हे दाखल करण्यात येऊन सुमारे ८० लाखांचा मुद्देमाल या धाडीत जप्त करण्यात आला. ही घटना २३ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली असून गुन्हेगारांवर पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेमुळे पंढरपूर तालुक्यातील महसूल विभागाची वाळू तस्करी बाबत मात्र गांधारीची भूमिका चव्हाट्यावर आली आहे.                                      पंढरपूर तालुक्यात गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेली वाळू तस्करी थांबण्याचे नाव घेत नाही. किंबहुना तस्करी रोखण्यात तालुका प्रशासन अपयशी ठरत असल्यानेच की काय २३ नोव्हेंबर रोजी पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने पंढरपूर तालुक्‍यात वाळू तस्करांवर धाडशी कारवाई केली. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आंबे येथील भीमा नदी पत्रात वाळू वाहतूक करणाऱ्या गुन्हेगारांना रंगेहात पकडले. त्यांच्याकडील टाटा कंपनीचे चार टिपर, बिगर नंबरचा एक जेसीबी, बिगर नंबरचा एक स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर, वाळू काढण्याची यारी आदींसह पाच आरोपींना जागेवरच ताब्यात घेतले. या आरोपींकडील वाहने ताब्यात घेऊन वाहनांच्या मालकांवर ही गुन्हे दाखल करण्यात आले. एकंदरीत या कारवाईत दहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. यामुळे वाळू तस्करांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.                                                                   पोलिसांच्या खास पथकाने केलेल्या कारवाईत प्रदीप विश्वास हाबळे (वय-२२), पांडुरंग प्रकाश गायकवाड (वय- २२) दोघे रा. सरकोली ता.पंढरपूर,  नितीन विष्णू कलेढोल (वय-३५) रा. म्हसवड, विशाल सुरेश घुले (वय-२३) रा. चळे या आरोपींना जागेवरच ताब्यात घेतले, तर या प्रकरणातील टिपर मालक आनंद पंडित भोसले, जीवन दत्तात्रय भोसले दोघे रा. सरकोली यांसह गणेश दत्तात्रय कोळेकर रा. महूद तसेच आंबे येथील अनिकेत कांबळे आणि तानाजी शिवाजी शिंदे यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात आले. या आरोपींविरोधात भादवि कलम ३७९, ३४ तसेच पर्यावरण कायदा कलम ९, १५ अन्वये येथील तालुका पोलीस ठाण्‍यात पो. कॉ. मनोज सुरेश राठोड यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पो. ना. काळे हे पुढील तपास करीत आहेत.

 

 *वाळूतस्करांची महसूल विभागाकडून पाठराखण*

पंढरपूर तालुक्याच्या ग्रामीण भागात नदीपात्रातून होणारी वाळू तस्करी रोखण्याचे काम महसूल विभागाकडून सहज होऊ शकते. याठिकाणी कार्यरत असणारे महसूल विभागाचे कोतवाल, तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्या संमतीशिवाय वाळूतस्करी होऊच शकत नाही. परंतु  वाळू तस्करांना याची अधिकाऱ्यांकडून सवलत मिळत असल्याने पंढरपूर तालुक्यातील वाळू तस्करी रोखणे शक्य होत नसल्याचे दिसत आहे.