परिवर्तनवादी कार्यकर्त्यांमध्ये ऐक्य हवे डॉ.आ.ह.साळुंखे:पुरोगामी संघटनांच्या पंचाहत्तरी निमित्त सत्कार सोहळा

आज घडीला प्रतिकुल परिस्थिती आहे, हे सत्य आहे, मात्र या परिस्थितीवर मात करून समता, बंधूता आणि स्वतंत्र्याची संस्कृती निर्माण करण्यासाठी सर्वात आधी परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्त्यांनी आपल्याच विचारांच्या मार्गाने जाणार्‍या इतर कार्यकर्त्यांचे खच्चीकरण न करता, ऐक्याची भूमिका घ्यायला हवी, अशी अपेक्षा डॉ.आ.ह.साळुंखे यांनी व्यक्त केली.

परिवर्तनवादी कार्यकर्त्यांमध्ये ऐक्य हवे   डॉ.आ.ह.साळुंखे:पुरोगामी संघटनांच्या पंचाहत्तरी निमित्त सत्कार सोहळा
डॉ. आ. ह. साळुंखे सत्कार / सांगली



सांगली/प्रतिनिधीः-
आज घडीला प्रतिकुल परिस्थिती आहे, हे सत्य आहे, मात्र या परिस्थितीवर मात करून समता, बंधूता आणि स्वतंत्र्याची संस्कृती निर्माण करण्यासाठी सर्वात आधी परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्त्यांनी आपल्याच विचारांच्या मार्गाने जाणार्‍या इतर कार्यकर्त्यांचे खच्चीकरण न करता, ऐक्याची भूमिका घ्यायला हवी, अशी अपेक्षा डॉ.आ.ह.साळुंखे यांनी व्यक्त केली.
येथील शांतिनिकेतन लोकविद्यापीठात डॉ.आ.ह.साळुंखे यांच्या पंच्चाहत्तरी निमित्त जाहिर सत्काराचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते. पद्मश्री गणेश देवी, बसवलिंग पट्टदेवरू यांच्याहस्ते फुले पगडी, काठी-घोंगड, सांगलीची हळद,बेदाणा,गुळ आणि मिरजेची सतार आणि मोडी व मराठी भाषेतील मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
ते म्हणाले, परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्त्यांकडून माझ्या काही अपेक्षा आहेत. सद्या शोषकांकडून अन्याय होतात, मात्र त्याचा केवळ निषेध करून ते थांबणार आहेत का ?, त्यासाठी आपल्याला त्यांच्यापेक्षा ताकदवान बनावे लागेल. अधिक कार्यक्षमतेने उत्तर द्यावे लागेल. त्यासाठी तुमच्यामध्ये ऐक्याची भूमिका असणे गरजेचे आहे. किरकोळ मतभेद असणार्‍या आणि आपल्याच उदिष्टाकडे-ध्येयाकडे जाणार्‍या कार्यकर्त्यांना आपण वेगळी वागणूक देतो; तसं न करता, मतभेदासह चर्चा करत राहणं, मतभेदाच्या पलिकडे जाऊन व्यवस्था बदण्यासाठी कार्यकर्त्यांकडे किमान ऐक्य तरी असावे. यासाठी आत्मपरिक्षण करावे, जे सैन्य आप-आपल्यातच भांडत राहते, ते शत्रू सैन्याचा पराभव करू शकत नाहीत,असेही डॉ.साळुंखे यांनी यावेळी सांगितले.
ते म्हणाले, खरचं प्रतिकुल परिस्थिती आहे. संभ्रम्हाची अवस्था देखील आहे. तरूण कार्यकर्ते युवकांशी बोलताना एक काळजीचा सूर जाणवतो; पण काळजी करण्याचे कारण नाही, उलट विवेक दृष्टीची जानिव ठेवून दुप्पट जोमाने काम केलं पाहिजे. कारण प्रत्येक क्रांतीनंतर प्रतिक्रांती होण्याचा इतिहास फार जून आहे. सम्राट अशोकानंतर अवघ्या पंचेचाळीस वर्षात मनुस्मृती आली. त्या मनुस्मृतीवर प्रहार करण्यासाठी त्यानंतर महात्मा फुले, आंबेडकर आलेच, त्यामुळे पराभूत झालो, असं मानू नका. असेही त्यांनी यावेळी सांगितले.
बसवलिंग पट्टदेवरू म्हणाले, आजचा सत्कार हा आ.ह.नावाच्या व्यक्तीचा नसून तो एका विचाराचा सत्कार आहे. आम्ही वैद्यीक संस्कृतीतून वेगवेळ्या संस्कृतीमध्ये अडकलो होतो, मात्र डॉ.साळुंखे यांनी आपल्याला सत्याचा मार्ग दाखविला आहे. बाराव्या शतकात महात्मा बसवेश्वर यांनी समतेचा विचार आपल्याला आचरणात आणून दाखविला. जातीव्यवस्थेचा बिमोड त्यांनी केला, त्यासाठी अनेकांनी रक्त सांडले, त्याच रक्ताच्या थेंबातून आ.ह.तयार झाले आहेत. तुकाराम हे परिवर्तनवादी व विद्रोही होते हे त्यांनी आपल्याला दाखवून दिले. त्यांचे विचार सर्वदुर जगभर पसरविणे ही आपली प्रत्येकीची जबाबदारी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी डॉ.आ.ह.साळूंखे सत्कार समितीचे अध्यक्ष व्ही.वाय.पाटील यांनी स्वागत केले. प्रस्ताविक धनाजी गुरव यांनी केले. मानपत्राचे वाचन प्रा.लक्ष्मण शिंदे यांनी तर सुत्रसंचलन प्रा.गौतम काटकर यांनी केले.