पर्यावरणाचे संवर्धन ही काळाची गरज - अशोकराव थोरात

पर्यावरणाचे संवर्धन ही काळाची गरज - अशोकराव थोरात
कोळे/वार्ताहर : 
                     सध्या विविध कारणाने पर्यावरणाचे असंतुलन होत आहे. त्याची ग्लोबल वॉर्मिंगचा वातावरणावर होणारा परिणाम, ॲमेझॉन जंगलाला लागलेला वनवा, अशी अनेक ज्वलंत उदाहरणे देता येतील. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखणे ही काळाची गरज असल्याचे मत शेतीमित्र अशोकराव थोरात यांनी व्यक्त केले. 
                   मलकापूर येथे श्री. मळाईदेवी शिक्षण संस्था संचलित, आदर्श ज्युनियर कॉलेज, विद्यालय, विज्ञान प्रबोधिनी व राष्ट्रीय हरित सेना यांचे वतीने पर्यावरणपूरक सायकल रॅली व पायी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमप्रसंगी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते. 
                   यावेळी श्री. मळाईदेवी शिक्षण संस्थेचे संचालक बी.बी. पाटील, प्राचार्य आर.आर पाटील,  उपमुख्याध्यापक एस.वाय.गाडे, शाखेचे कॉन्स्टेबल डी.पी.भोसले, कॉन्स्टेबल बी.व्ही.पवार, राजू मुल्ला, अण्णासो काशीद, सुहास कदम, आबासो गावडे, आबासो सोळवंडे, विश्वास चौगुले, अँड. दिपक थोरात, प्रमोद शिंदे, राहुल भोसले, रवी येडगे आदींची उपस्थिती होती. 
                  थोरात म्हणाले, पर्यावरणाच्या संवर्धनासाठी समाज प्रबोधन व्हावे, हाच या कार्यक्रमाचा उद्देश आहे. त्यामुळे पर्यावरणाचे जतन, संवर्धन, रक्षणाचा करण्याचा संदेश इतर सामाजिक संस्थांनीही समाजामध्ये देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी उपस्थितांना केले. 
                  संस्थेतर्फे गेली अठरा वर्षे हा रॅलीचा उपक्रम राबविला जात आहे. संस्थेतर्फे दरवर्षी प्रमाणे या सामाजिक उपक्रमाचे याहीवर्षीही आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, सायकल रॅलीस जखिनवाडी, नांदलापूर या ठिकाणी तर मलकापूर परिसरामध्ये पायी रॅली असे उपक्रमाचे स्वरूप होते. रॅलीचे उद्घाटन कराडचे महामार्ग पोलीस एस .डी. भोसले यांच्या हस्ते संपन्न झाले. 
                     पर्यवेक्षक ए.एन.शिर्के, कॉलेज प्रमुख प्रा.सौ. एस.डी.पाटील, सौ. सुरेखा खंडागळे, बी.बी. पाटील, वसंतराव चव्हाण, तुळशीराम शिर्के, आदर्श ज्युनिअर कॉलेजचे सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या उपक्रमात सहभागी झाले होते. या उपक्रमात संस्थेच्या 2 हजार 250 विद्यार्थ्यी सहभागी झाले होते. 
                  दरम्यान, मान्यवरांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व सांगून मार्गदर्शन केले व रॅलीस शुभेच्छा दिल्या. या उपक्रमासाठी विज्ञान प्रबोधिनीचे सचिव शेखर शिर्के, हरित सेनेचे प्रमुख श्री बी.आर.पाटील यांनी या रॅलीच्या यशस्वीतेसाठी विशेष प्रयत्न केले.