मरळी ग्रामपंचायत निवडणुकीत तिरंगी लढत

मंत्री शंभुराज देसाई यांची आजोबांच्या नावाला की वडीलांच्या नावाला पसंती..?

मरळी ग्रामपंचायत निवडणुकीत तिरंगी लढत

पाटण / प्रतिनिधी

 

राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय व मंत्रीमंडळातील प्रमुख समजले जाणारे मंत्री शंभुराज देसाई यांचे स्वतः चे मतदान असलेल्या मरळी गावची ग्रामपंचायत निवडणूकीत तिरंगी लढतीचा सामना होत असून या निवडणुकीत संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत मंत्री शंभुराज देसाई आजोबा लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या नावाने असणाऱ्या परिवर्तन पॅनेला पसंती देणार की वडील स्व. शिवाजीराव देसाई यांच्या नावाने असणाऱ्या सत्ताधारी पॅनेला पसंती देणार यावरून या निवडणूकीची रंगत वाढली आहे. 


              एकंदरीत मरळी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होईल असे सर्वांना वाटत होते. तसा प्रयत्न मंत्री शंभुराज देसाई आणि त्यांचे पुत्र यशराज देसाई यांनी केला मात्र अंतर्गत कलह वादविवादामुळे ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा प्रयत्न फसला.. असला तरी निवडणूकीचा निकाल सर्वज्ञात आहे. तरीही महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या मंत्री शंभुराज देसाई यांच्या विरोधात गावातील ग्रामपंचायत निवडणूकीत दोन पॅनल विरोधात लढती देत आहेत म्हणजे हा एक प्रकारे पराभव समजला जात आहे. 


                 मरळी ग्रामपंचायत निवडणुकीत एकूण २७२४ मतदान आहे. तीन वार्डात विभागल्या गेलेल्या या ग्रामपंचायत मधे एकूण ९ सदस्य आहेत. पैकी वार्ड क्रमांक १ मधे सर्वसाधारण महिला जागेसाठी बिनविरोध निवड झाली आहे. उर्वरित ८ सदस्य जागांसाठी व सरपंच पदाच्या जागेसाठी निवडणूक लागली आहे. पाटण तालुक्यात सद्या २६ ग्रामपंचायतीच्या निवडणूका लागल्या आहेत. यामध्ये ८ ग्रामपंचायती मंत्री देसाई यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण बिनविरोध झाल्या असल्याचा दावा मंत्री देसाई गटाने केला आहे. मात्र मंत्री शंभुराज देसाई यांचे स्वतः चे गाव व मतदान असलेले मरळी ग्रामपंचायतीत निवडणूक लागल्याने सर्वसामान्यांना आश्चर्य वाटत आहे. या निवडणुकीत सातारा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जे.ए.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्व. शिवाजीराव देसाई ग्रा.वि.पॅनेल निवडणूक लढवत आहे. देसाई गटाअंतर्गत झालेल्या बंडखोरीत लोकनेते बाळासाहेब देसाई परिवर्तन पॅनेल निवडणूक लढवीत आहे. तर  राष्ट्रवादी काँग्रेसचे निलेश मोरे, शेतकरी संघटनेचे प्रशांत पाटील यांनी एकत्र येत यांच्या मार्गदर्शनाखाली निनाई देवी ग्रा.वि.परिवर्तन पॅनेल उभे केले आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या निनाई देवी ग्रा.वि.परिवर्तन पॅनेलचा मतांचा आकडा पहावा लागणार आहे. तर मंत्री शंभुराज देसाई आजोबा लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या नावाने असणाऱ्या परिवर्तन पॅनेला पसंती देणार की वडील स्व. शिवाजीराव देसाई यांच्या नावाने असणाऱ्या सत्ताधारी पॅनेला पसंती देणार यावरून या निवडणूकीची रंगत वाढली आहे.