पोषण उपक्रमात आयसीडीएस करवीर 2 प्रकल्प देशात अव्वल !

*केंद्रीय महिला व बालविकास मंत्र्यांकडून शुक्रवारी दिल्लीत गौरव*
कोल्हापूर :
पोषण अभियानांतर्गत कुपोषण निर्मुलनाचा कार्यक्रम सातत्यपूर्ण राबविल्याबद्दल आयसीडीएस करवीर 2 प्रकल्प देशात अव्वल ठरला आहे. केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते शुक्रवार 23 ऑगस्ट रोजी बाल विकास प्रकल्प अधिकारी ज्योती पाटील आणि तालुका आरोग्य अधिकारी गुणाजी नलवडे यांना दिल्ली येथील समारंभात उत्कृष्ट प्रकल्प पारितोषिकाने गौरविण्यात येणार आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल आणि जिल्हा परिषदेचे महिला व बाल विकास अधिकारी सोमनाथ रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प राबविण्यात आला. पोषण अभियानांतर्गत 20 तीव्र कुपोषित मुलांसाठी ग्राम बाल विकास केंद्र राबविण्यात आले होते. यामध्ये 10 बालकं साधारण श्रेणी तर 6 मध्यम श्रेणीत सुधारली होती. तीव्र कुपोषित श्रेणी मध्ये तातडीने येणाऱ्या मध्यम कुपोषित बालकांसाठी प्रकल्प कुपोषण मुक्त करण्यासाठी सर्व्हेक्षण करण्यात आले. यामध्ये 105 मध्यम कुपोषित (एमएएम) बालकांसाठी सलग दोन महिने प्रतीदिन 5 ग्रॅम आयुर्वेदीक च्यवनप्राश दिले. तत्पूर्वी च्यवनप्राशमधील घटक, फायदे, वापरण्याची योग्य पध्दती, नोंदी ठेवणे याबाबत प्रबोधन करण्यात आले. यानंतर 52 बालके साधारण श्रेणीत आली, 101 बालकांचे वजन वाढले. त्यांच्या आरोग्य विषयक तक्रारी कमी झाल्या. 0 ते 6 वयोगटातील मुलांच्या पोषणासाठी केलेल्या पोषण उपक्रमासाठी 2018-19 सालाकरिता या पुरस्काराने आयसीडीएस करवीर 2 या प्रकल्पाला गौरविण्यात येत आहे.