वाढदिवस बाबांचा ; चर्चा मात्र फ्लेक्स बोर्डची

शहरात चर्चेला उधान:निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न, भल्याभल्यांना फटका सोसावा लागणार असल्याचीही चर्चा

वाढदिवस बाबांचा ; चर्चा मात्र फ्लेक्स बोर्डची

वाढदिवस बाबांचा;चर्चा मात्र फ्लेक्स बोर्डची


शहरात चर्चेला उधान

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न, भल्याभल्यांना फटका सोसावा लागणार असल्याचीही चर्चा



कराड/प्रतिनिधीः-


नगरपालिकेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे शहरातील राजकीय समीकरणांच्या जुळवाजुळवीला प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या सुरुवात झाली असून पालिकेत सध्या वाकयुद्ध सुरू आहे. सत्ताधारी कोण आणि विरोधक कोण या संभ्रम अवस्थेत कराडकर असून ते उघडया डोळयाने सगळेजण पाहत आहेत. मेहरबान मात्र आपल्याच तालात असल्याचे दिसत आहेत. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. टक्केवारीची चर्चा कराडात रंगली असतानाच आज माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा वाढदिवस असून या वाढदिवसानिमित्त शहरामध्ये फ्लेक्स बोर्ड झळकले आहेत. बोर्डावर आज दिवसभरात जोरदार चर्चा असून वाढदिवस बाबांचा मात्र चर्चा फ्लेक्सची अशी परिस्थिती झाली आहे. या सर्व घडामोडी आणि राजकीय आखाडे आखत आगामी नगरपालिकेची निवडणूक कशी होवू शकते याची झलकच आज कराडकरांना पाहायला मिळाली आहे.


माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वाढदिनी शहरातील विविध भागात शुभेच्छा फ्लेक्स लावण्यात आले आहेत. या फ्लेक्सवरील काहींचे चेहरे पाहिल्यावर नागरिकांच्या भुवया उंचावल्या नसत्या तर नवलच. मध्यंतरी, विधानसभा निवडणुकीवेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी वैचारिक फारकत घेत त्यांच्यावर टीका-टिपण्णी करणार्‍यांसह छुप्या रुस्तमांचीही फ्लेक्स उपस्थिती लागल्याने शहरात उलट-सुलट चर्चेला उधान आले आहे. गत नगरपालिकेच्या निवडणुकीवेळी पृथ्वीराज चव्हाण यांचा चेहरा घेवून आणि निवडुन आलेल्या 16 नगरसेवकांनी त्यांना तिसर्‍या दिवशी सोडचिठ्ठी देत आपला सवतासुबा मांडला होता. काहींचा या प्रक्रियेला विरोध होता. मात्र त्या क्षणी ते कोणताही निर्णय घेवू शकत नव्हते. तब्बल चार वर्ष अंर्तगत कुरगुडया करात जनशक्ती सत्तेत राहिली मात्र त्याची मने जुळलीच नाहीत. त्यातही दोन गट पडले. पाच एकीकडे उर्वरीत अकरा दुसरीकडे अश्यातच भाजपाने त्यांच्यावर टक्केवराचा वार करत त्यांना बैचेन केले. एकीकडे हे घडत होते तर दुसरीकडे आज हे घडले.


पालिकेच्या अर्थसंकल्पीय बजेट सभेनंतर यशवंत-जनशक्ती, लोकशाहीसह भाजपच्या नगरसेवकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडायला सुरुवात झाली. यावेळीही अनेकांनी एकमेकांची उनिधुनी काढल्याचे पाहायला मिळाले. यावेळी गत नगरपालिका निवडणूकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा आधार घेऊन त्यांच्या चेहर्‍यावर, नावावर निवडून आलेल्या नगरसेवकांनीच त्यांना दगाफटका केल्याची टीका भाजपचे गटनेते विनायक पावसकर यांनी केली. त्यावेळी अनेकांचा जळफळाट झाला. तसेच या गोष्टीमागची सत्यता कराडकर नागरिकांनाही माहित असल्याने आगामी पालिका निवडणुकीत भल्याभल्यांना याचा फटका सोसावा लागणार असल्याची चर्चाही नागरिकांमध्ये सुरु आहे.


दरम्यान, या सगळ्या गोंधळात काहींनी आपली बाजू सेफ करण्यासाठी वेगळी भूमिका घेतल्याचेही दिसून आले. काही दिवसांपासून यशवंत, जनशक्ती आघाडीमध्येही दोन गट पडल्याचे पहायला मिळाले. यातील एका गटाने विद्रोही भूमिका घेतली. तर दुसरा गट तटस्थ राहिला. त्यामुळे त्यांच्यातील वैचारिक दुफळी समोर आली. आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या सगळ्या गोष्टींची पूर्वकल्पना आल्याने काहींनी आत्तापासूनच नेत्यांच्या नजरेत आपली प्रतिमा  सुधारण्यासाठी प्रयत्न सुरु केले असून त्याची झलक नागरिकांना या शुभेच्छा फ्लेक्सवरून नक्कीच आली आहे. दिवसभर कराड शहरात पृथ्वीराज बाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छाचे फलक चर्चेचा विषय ठरले असले तरी याची रणनीती पूर्वीच ठरलेली होती. आगामी काळात बर्‍याच राजकीय उलथापालथी होतील. काय घडते ते पाहूया..



बाबा दिल्लीत..चर्चा कराडात


आज माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा वाढदिवस होता. मात्र, त्यांच्याकडे आसामच्या विधानसभा निवडणुकीची जबाबदारी असल्याने ते आसामला गेले होते. तेथून ते आज सकाळी दिल्लीत आले. मात्र ते कराडकरांना शुभेच्छा घेण्यासाठी उपलब्ध होवू शकले नाहीत. ते दिल्लीत असले तरी चर्चा मात्र कराडात चांगलीच झाली. कदाचित ते आज कराडात असते तर आणखी वेगळे चित्र कराडकरांना पहायला मिळाले असते.



फ्लेक्सवर आजी-माजी नगरसेवक

आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या वाढदिवसाचे फ्लेक्स बोर्ड आज कराडात मोठया प्रमाणात लावले आहेत. अनेक ठिकाणी जे चेहरे आजपर्यत दुसरीकडे होते ते चेहरे या फलकावर झळकत आहेत. अश्यातच ज्या जनशक्तीची सत्ता पालिकेत आहे त्या जनशक्तीच्या अध्यक्षासह माजी नगराध्यक्षा आणि विद्यमान काही नगरसेवकांचे फोटो कराडकरांच्या भुवया उंचावून गेल्या आहेत. यामुळे याची चर्चा दिवसभर सुरू होती.