माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते प्रसाद चौगुलेंचा सत्कार

माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते प्रसाद चौगुलेंचा सत्कार

कराड / प्रतिनिधी
 
कराड तालुक्याचे सुपुत्र प्रसाद चौगुले यांनी  MPSC परिक्षेमध्ये राज्यात प्रथम क्रमांक  प्राप्त केल्याबद्दल  माजी मुख्यमंत्री आ पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रसाद चौगुले यांचा सत्कार केला. याप्रसंगी प्रसाद यांचे वडील श्री बसवेश्वर चौगुले हे ही उपस्थित होते. 
पृथ्वीराज बाबांनी प्रसाद यांचे राज्यात प्रथम क्रमांक मिळविल्या बद्दल कौतुक केले तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा देत मार्गदर्शन ही केले. 

यावेळी आ पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि, आपल्या कराड तालुक्याचा सुपुत्र प्रसाद बसवेश्वर चौगुले यांनी प्रथम प्रयत्नातच MPSC स्पर्धा परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक मिळविला ही कराड तालुक्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. राज्यात अनेक विद्यार्थी अधिकारी होण्याच्या स्वप्नाने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत असतात, परीक्षाच स्पर्धेची असल्याने त्यामध्ये जो बाजी मारत पुढे येतो त्याचे अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण होत असते असेच स्वप्न पाहणाऱ्या आपल्या कराड तालुक्यातील प्रसाद चौगुले यांनी पहिल्या प्रयत्नातच MPSC परीक्षेत राज्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळविला. साहजिकच प्रसाद यांना हे यश सहज मिळाले नसणार यासाठी त्यांनी अभ्यासाची हातोटी आत्मसात करीतच हे यश मिळविले आहे. MPSC परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर प्रसाद चौगुले एक उत्तम उदाहरण आहे. 

यापुढे पृथ्वीराज बाबा म्हणाले कि, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासाची एक दिशा माहीत असते तसेच आपल्या आजूबाजूला काय सुरु आहे याची माहिती ते सतत घेत असतात तसेच एखाद्या विषयाची खोलात जाऊन अभ्यास करण्याची वृत्ती या विद्यार्थ्यांनी आत्मसात केलेली असते. यामुळेच स्पर्धा परीक्षेत जरी एखादा विद्यार्थी अपयशी झाला असला तरी त्याने खचून न जाता त्याच्या आयुष्यात त्याच्या अभ्यासाचा वापर करून जे करता येईल ते करण गरजेचं आहे, अश्या संधी आपल्या आजूबाजूला असतात फक्त त्या आपण शोधण गरजेचं असत.