पृथ्वीराजबाबांच्या निवासस्थानी काँग्रेसची खलबते, दोन मंत्र्यांसमवेत एक तास कमराबंद चर्चा

पृथ्वीराज चव्हाण मंत्र्यांसह मुंबईकडे रवाना

पृथ्वीराजबाबांच्या निवासस्थानी काँग्रेसची खलबते, दोन मंत्र्यांसमवेत एक तास कमराबंद चर्चा

कराड/प्रतिनिधीः-
महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर असून काँग्रेसला निर्णयप्रक्रियेत सहभागी करून घेतले जात नाहीत. अशी चर्चा सध्या राज्यभर सुरू आहे. या संदर्भात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी थेट आरोप केला आहे. तर प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसची अंतर्गत खलबत्ते कराड येथे पार पडले. पृथ्वीराज चव्हाण यांच्या निवासस्थानी राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यात सुमारे एक तास कमराबंद चर्चा झाली आणि त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण व गृहराज्यमंत्री बंटी पाटील हे मुंबईकडे रवाना झाले. यामुळे आज काँग्रेसचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. त्यामध्ये काय निर्णय होतो. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कराड येथील निवासस्थानी राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली. ते आल्यानंतर या तीन नेत्यांच्यात सुमारे एक तास कमराबंद चर्चा झाली. आज दुपारी 4 च्या सुमारास गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील हे पृथ्वीराज चव्हाण यांच्या निवासस्थानी आले आणि त्यानंतर सांगलीचा कार्यक्रम आटोपून वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख सांगलीवरून थेट पृथ्वीराज चव्हाण यांच्या निवासस्थानी आले. या दोन मंत्र्यांचे स्वागत आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. यावेळी मलकापूर नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष व कराड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, एनएसयुआयचे शिवराज मोरे हे उपस्थित होते. तर सांगलीचे पृथ्वीराज पाटील हेही याठिकाणी उपस्थित होते.
हे दोन मंत्री आल्यानंतर या दोघांचे प्रथम स्वागत करण्यात आले. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण, ना. अमित देशमुख, ना. सतेज उर्फ बंटी पाटील या तिघांच्यात सुमारे एक तास कमराबंद चर्चा झाली. या चर्चेचा तपशील जरी समजू शकला नसला तरी महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये काँग्रेस सहभागी असून काँग्रेसला निर्णयप्रक्रीयेत घेताना दुय्यम स्थान दिले जात आहे. यावर चर्चा झाली असावी, महाविकास आघाडीचे सरकार बनवण्यामध्ये माझी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा मोठा वाटा होता. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाची न्यायालयीन प्रक्रिया स्वतः पार पाडली. म्हणूनच राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येवू शकले. सरकार जरी महाविकास आघाडीचे आले तरी पृथ्वीराज चव्हाण सरकारीमध्ये सहभागी झाले नाहीत. त्यांनी बाहेर राहून पक्षाचे व्यासपिठ भक्कम करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. राज्याचे प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री झाल्याने पक्षाची बाजू मांडताना आज कोणीही दिसत नाही. ही जबाबदारी पृथ्वीराज चव्हाण पार पाडत आहेत. सरकारमध्ये ज्या काही अडचणीत येत आहेत. त्याची तक्रारच या दोन मंत्र्यांनी पृथ्वीराज बाबांच्याकडे मांडली असावी, त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण तातडीने या मंत्र्यांसोबत मुंबईकडे रवाना झाले. एकाच गाडीतून गृहराज्यमंत्री बंटी पाटील व बाबा गेले. यामुळे उद्या होत असलेली मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक वादळी होते की? समझोता होते हे पहावे लागेल.