बाबांच्या मनात नेमकं हाय तरी काय..!

बाबांच्या मनात नेमकं हाय तरी काय..!
काका आणि बाबांच्या भेटीचे संग्रहित छायाचित्र

कराड/प्रतिनिधी

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यातील काँग्रेस पक्षाची धुरा सांभाळताना गत दोन महिन्यांपासून केंद्र सरकारवर अभ्यासपूर्ण खुलाशांचा भडिमार केला आहे.कराड मधून काय ब्रेकिंग येणार याची उत्सुकता जवळपास दररोजच लोकांच्यात चर्चिली जाऊ लागली आहे.

सोमवारी दोन मंत्री कराड मध्ये डेरेदाखल झाले होते. तर तिसऱ्या मंत्र्यांना डायरेक्ट मुंबईला रवाना होण्याचे फर्मान सुटले होते.यामुळे डाव नक्कीच मोठा असणार, परंतु त्याचा सारीपाट कराडच्या बैठकीत आणि सोंगट्या सातारा येथील भेटीत तर ठरल्या नसतील ना अशा शंकाकुशंकाचा धुरळा सध्या सातारा जिल्ह्यात उडाला आहे.

काँग्रेस बळकटीकरनाला गती देण्याचे काम बाबांनी हाती घेतल्याची चर्चा सर्वच पक्षाचे कार्यकर्ते करताना दिसत आहेत.आणि हातचा राखून डाव खेळण्यात बाबा माहीर असल्याने कुठली सोंगटी कुठे बसणार हे वेळ आल्याशिवाय कळणार नाही.परंतु बाबा सावध आणि सक्रिय झाले हेच टॉनिक जिल्ह्यातील काँग्रेस प्रेमींना पुष्कळ असून सर्वात महत्वाचे म्हणजे काकांची त्यांच्या घरी जाऊन घेतलेली भेट जिल्ह्यातील राजकारणाची दिशा बदलणारी ठरणार असल्याचे मत राजकीय क्षेत्रातून व्यक्त होत आहे.

बाबा आणि काका गट सर्व मतभेद विसरून एकत्र आले तर काँग्रेसला उर्जितावस्था नाक्किच प्राप्त होईल, अशी आशा कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.आजपर्यंत दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होत होता, आणि काँग्रेस कार्यकर्त्याच्या हातात धुपाटने उरत होते. परंतु कराड आणि साताऱ्यातील दिलजमाई दक्षिणेत फायद्याची तर जिल्हयात काँग्रेस पक्ष वाढीची ठरणार आहे, एकमेकांचे पाय ओढणारे नेते आता लांब गेले आहेत उरली ती निष्ठावंत काँग्रेस अशी चर्चा कार्यकर्ते करत असून झाले ते चांगले झाले, होतंय ते चांगलं आहे आणि होणार आहे तेही चांगलंच असेल, बाबांनी ठरवलंय फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून भरारी घेण्याचे परंतु कसे, हे कार्यकर्त्यांना सुद्धा कळत नाही की बाबांच्या मनात नेमकं हाय तरी काय..!