काका,बाबा आणि बंटी पाटलांच्यात गुप्तगु

काका,बाबा आणि बंटी पाटलांच्यात गुप्तगु
काका,बाबा आणि बंटी पाटलांच्यात गुप्तगु

कराड/प्रतिनिधी

कराड मधून मुंबईकडे चाललेले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व गृहराज्यमंत्री बंटी पाटील यांच्या गाड्यांचा ताफा महामार्गावरून तडक  साताऱ्यात वळल्याने शासकीय यंत्रणेची धावपळ उडाली,निमित्त होते माजी मंत्री विलासराव पाटील यांच्या तब्बेतीच्या चौकशीचे  यावेळी उदयसिंह पाटील हेही उपस्थित होते.परंतु विधानपरिषदेच्या पार्श्वभूमीवर बाबा व काका यांच्यातील दुरावा दूर होऊन सूर जुळू लागल्याच्या चर्चेने काँग्रेसच्या गोटात चैतन्य पसरले असून या घटनेमुळे काँग्रेसला परत जिल्ह्यात सुगीचे दिवस येण्याची शक्यता काँग्रेस कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत.

काँग्रेसचे जेष्ठ नेते व माजी मंत्री विलासराव पाटील (काका) यांचा जिल्हयात मोठा वकुब आहे.एकहाती बाजी  पालटवण्यात काका हातखंडा आहेत,प्रत्येक तालुक्यातील कार्यकर्ता आणि नेता काकांना नावानिशी तोंडपाठ आहे, तसेच काकांना मानणारा गट आजही शाबूत आहे.परंतु काका व बाबा यांच्यातील काही गैरसमजुती मुळे दोघांच्यात दुरावा निर्माण झाला होता याची फार मोठी किंमत कॉंग्रेससह जिल्हयाला मोजावी लागली होती.परंतु काकांच्या घरी सोमवारी रात्री बाबा व बंटी पाटील यांनी दिलेली भेट व अर्धा तास केलेले गुप्तगु अनेक कटू स्मृतींना दूर सारणारी ठरली आहे.गेले काही दिवस झाले काका प्रकृतीच्या कारणाने साताऱ्यातील घरीच असतात.

काकांच्या तब्बेतीची विचारपूस करण्यासाठी बाबा आणि बंटी पाटील यांच्या गाड्या सातारा येथील घरी गेल्या खऱ्या परंतु त्यावेळी तिथे उदयसिंह पाटील उपस्थित असल्याने वेगळ्याच चर्चांना उधाण आले असून,पृथ्वीराज बाबांच्या विरोधात निवडणूक लढवून सुद्धा खुल्या दिलाने स्वागत करण्यासाठी उदयसिंह पाटील यांनी बाबांच्या घरी जाऊन शुभेच्छा दिल्या होत्या त्याचवेळी कराड दक्षिणसह जिल्ह्यात अशी चर्चा होती की कराड मलकापूर सोडून बाहेरची मत विभागणी करण्यासाठी बाबांनी उदयसिंह पाटील यांना उमेदवारी अर्ज भरायला सांगितला होता आणि विधान परिषदेच्या वेळी उदयसिंह पाटील यांच्या उमेदवारीचा विचार केला जाईल असा शब्दही दिला होता अशी चर्चा खाजगीत झाल्याची आवई उठली होती आजच्या घटनेने या चर्चेने पुन्हा उचल खाल्ली असून काका,बाबा,आणि बंटी पाटील यांच्या अर्ध्या तासाच्या बैठकीने जिल्हयाला अजून एक आमदार मिळणार या चर्चेने उचल खाल्ली असून काका व बाबा यांच्या मनोमिलणाने कृष्णेसह दक्षिणेत भूकंप होणार असल्याची चर्चा जोरात असून काँग्रेस कार्यकर्ते खुशीत आहेत.