वासनांध सैतान आणि स्त्रियांवरील वाढते अत्याचार

बलात्कारी आरोपींना छत्रपती शिवरायांच्या काळात ज्याप्रमाणे शिक्षा दिली जात होती, त्याप्रमाणेच शिक्षा दिली जावी, अशी अनेकांनी मागणी केली आहे. समाजात मुली सुरक्षित नाहीत, तर सरकार कोणत्या प्रकारची सुरक्षा करत आहे, हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. दिल्लीतील निर्भया हत्याकांड घडल्यानंतर हैदराबाद येथील प्रियंका रेड्डीच्या हत्याकांडानंतर देशातील समाजमन ढवळून निघाले आहे.                   

   वासनांध सैतान आणि स्त्रियांवरील वाढते अत्याचार

कृष्णाकाठ / अशोक सुतार

८६००३१६७९८   

हैदराबादमध्ये प्रियांका रेड्डी या २७ वर्षीय महिला पशुचिकित्सक डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी देशातील प्रत्येक नागरिकाकडून होत आहे. या चार आरोपीना समाजासह कुटुंबानेही बहिष्कृत केले आहे. समाजविघातक कृत्य करणाऱ्या मुलांना जर फाशीची शिक्षा होत असेल तर कुटुंबातील कोणीही व्यक्ती याला विरोध करणार नाही, अशा शब्दात सी केशवुलु या आरोपीच्या आईने निषेध केला आहे. ज्याप्रमाणे पीडित मुलीला जिवंत जाळून मारण्यात आले. त्याप्रमाणे आरोपींना जाळायला हवे, असे आरोपीच्या आईने म्हटले आहे. त्यामुळे देशातील नागरिकांमध्ये आरोपींबद्दल किती तीव्र संताप आहे, हे दिसून येते. हैदराबादमध्ये डॉक्टर तरुणीवर बलात्कार व त्यानंतर तिला जिवंत जाळण्यात आल्याच्या घटनेनंतर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. सोशल मिडीयावर संतापाचे वातावरण आहे. बलात्कारी आरोपींना छत्रपती शिवरायांच्या काळात ज्याप्रमाणे शिक्षा दिली जात होती, त्याप्रमाणेच शिक्षा दिली जावी, अशी अनेकांनी मागणी केली आहे. समाजात मुली सुरक्षित नाहीत, तर सरकार कोणत्या प्रकारची सुरक्षा करत आहे, हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. दिल्लीतील निर्भया हत्याकांड घडल्यानंतर हैदराबाद येथील प्रियंका रेड्डीच्या हत्याकांडानंतर देशातील समाजमन ढवळून निघाले आहे.                                                                            हैदराबाद येहील घटनेतील मुलगी पशूवैद्य होती. वासनेने वखवखलेल्या पशूंनी तिच्यावर झडप घालून तीचे जीवन संपवले, तिला जिवंत जाळून मारले. केवढे हे क्रौर्य ! समाजातील नीतिमत्ता संपली आहे की नव्या पिढीवर आपण संस्कार करण्याचे विसरून गेलो आहोत ? छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील आई-बहिणींची आबरू राखणारी महान संस्कृती हरवली कुठे ? देशात स्त्री- पुरुष समानतेची चळवळ तोंडदेखली सुरु असल्याचे दिसते. हैदराबाद येथील रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यासोबतच सोशल मीडियावरून आरोपींना कडक शिक्षा ठोठावण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे तर देशभरात विद्यार्थी, समाजसेवक, नागरीक या घृणास्पद घटनेचा निषेध करीत आहेत. केशवुलु, जोलू शिवा आणि जोलू नवीन, मोहम्मद आरिफ या चार नराधमांनी प्रियंका रेड्डीवर रात्रभर लैंगिक अत्याचार केले. नंतर  पहाटे तिचा मृतदेह जाळला होता. हैदराबाद शहरापासून ५० किलोमीटर अंतरावर शादनगर पोलीस स्टेशन आहे. या पोलीस ठाण्यात नराधम आरोपींना आणण्यात आल्याचे जमावाला समजताच शेकडोंच्या जमावाने पोलीस ठाण्याला घेराव घातला. विद्यार्थी आणि महिला यांनी गर्दी केली होती. यावेळी जमावाने जोरदार निदर्शने केली.                                                                                          दिल्लीत २०१२ साली बसमधील एका तरुण मुलीवर बलात्कार आणि हत्या प्रकरण घडले होते, तसेच समुहाने बलात्कार करण्याची प्रवृत्ती उघडकीस आली होती. सरकारच्या एका आकडेवारीनुसार, भारतात २०१७ साली बलात्काराच्या ३३,६५८ घटना पोलिसांत नोंदल्या गेल्या होत्या. यानुसार, भारतात दिवसाला ९२ बलात्काराची प्रकाराने घडतात, हेच देशाच्या प्रतिमेसाठी गंभीर आहे. हैदराबाद येथे एका पशूवैद्य महिलेवर बलात्कार झाल्याची घटना धक्कदायक आहेच परंतु मानवतेच्या दृष्टीकोनातून देशासाठी लज्जास्पद आहे. तेलंगणातील रंगा रेड्डी जिल्ह्यातील महामार्गानजीक एका सबवेमध्ये प्रियांकाचे जळालेले  शव मिळाले. मृत्यूपूर्वी सायंकाळी प्रियांकाने घरी बहिणीला फोन करून, माझी स्कूटर बिघडली असून काही लोक मला मदत करत आहेत, असे म्हटले होते. परंतु नंतर प्रियांकाचा मोबाईल बंद झाला होता. याप्रकरणी सायबराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. प्रियांकाच्या नातेवाईकांनी ती बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नाही, या प्रकरणी तेलंगणा सरकारने त्या तीन पोलिसांचे निलंबन केले आहे. तसेच बलात्काराचे खटले जलदगतीने चालवण्यासाठी न्यायालये उभारण्याचा निर्णय घेतला आहे. याप्रकरणी एका मेकॅनिकने पहिला पुरावा पोलिसांना दिला होता. त्याच्या मदतीने पोलिसांनी वेगवेगळ्या पेट्रोल पंपावरील आरोपींचे सीसीटीव्ही फुटेज पाहिले आणि आरोपींची ओळख पटवण्यात आली. अवघ्या ४८ तासांच्या आत मोहम्मद उर्फ आरिफ (लॉरी चालक), जोलू शिवा, जोलू नवीन, चिंताकुंटा चेन्नकेशवुलू (चालक) या आरोपींना अटक करण्यात आली. हे सर्व आरोपी नारायणपेट जिल्ह्यातील मकतल गावाचे रहिवासी आहेत. या सर्व आरोपींनी बलात्कार करण्यापूर्वी टोंडूपल्ली तोल प्लाझावर दारू प्यायली होती. पिडीतेच्या बहिणीने स्कूटरचा टायर पंक्चर काढणाऱ्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली होती. त्यावेळी एका टायरवाल्याने पोलिसांना एक लाल रंगाची स्कूटर आल्याचे सांगितले होते. तिथूनच आरोपींचा सुगावा लागला. हैदराबादमधील सामूहिक बलात्कार आणि हत्येच्या घटना म्हणजे क्रूरतेचा कळस आहे. आरोपींनी कामावरुन घरी परतणाऱ्या महिलेवर बलात्कार करुन तिची हत्या केली. नंतर निर्जन स्थळी नेऊन तिचा मृतदेह जाळला. राष्ट्रीय महामार्ग ४४ वरील चट्टनपल्ली गावात एका पूलाखाली आरोपींनी मृतदेहाची विल्हेवाट लावली. मृतदेह पेटवल्यानंतर आरोपी तिथून निघून गेले व पुन्हा काही वेळाने मृतदेह पूर्णपणे जळाला आहे की, नाही ते पाहण्यासाठी तिथे परत आले होते, अशी माहिती पोलीस तपासातून मोर आली आहे. पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने आरोपींनी हे कृत्य केले.                                                                      दिल्लीत घडलेल्या निर्भया बलात्कार व हत्याकांडात सर्वोच्च न्यायालयाने चार आरोपींची फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे. त्याचप्रमाणे प्रियांका प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आरोपीना तात्काळ फाशीची शिक्षा सुनावली पाहिजे. प्रियांका रेड्डी जळीत हत्याकांडामुळे देशातील मुली, माता सुरक्षित राहिलेल्या नाहीत, हे स्पष्ट झाले आहे. अनेक ठिकाणी बलात्कार, लैंगिक अत्याचार, छेडछाड, विनयभंगाची प्रकरणे घडत आहेत. देशातील सुरक्षा व्यवस्था एवढी थंड का पडली आहे ? राजकीय नेत्यांना या घटनेचे गांभीर्य जाणवत नाही, न्यायव्यवस्थेला लवकर न्याय देण्याची बुद्धी होत नाही, पोलीस घटना घडल्यानंतरच जागे का होतात, असे अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. दिल्लीतील निर्भया हत्याकांड, कोपर्डीतील बालिकेवरील बलात्कार आणि हत्या झाल्यानंतर लोकांचे मोर्चे निघाले होते. प्रियांकाला न्याय देण्यासाठी देशभरात अशी आंदोलने होत आहेत. केंद्र सरकारने या प्रकरणांची गांभीर्याने दखल घेणे महत्वाचे आहे.