पृथ्वीराजबाबा; कराड दक्षिणमधूनच निवडणूक लढवा

पृथ्वीराजबाबा; कराड दक्षिणमधूनच निवडणूक लढवा

कार्यकर्त्यांची जोरदार मागणी : मेळाव्याला प्रचंड गर्दी 

कराड/प्रतिनिधी : 
                        गेल्या काही दिवसांपासून सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. यासंदर्भात काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनीही बाबांना लोकसभा पोटनिवडणूक लढविण्याबाबत सांगितल्याची चर्चा आहे. मात्र, बाबांनी याबाबत कार्यकर्त्यांची बोलूनच सातारा लोकसभा की कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची, हा निर्णय जाहीर करणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात उपस्थित पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पृथ्वीराजबाबांकडे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातूनच आपण निवडणूक लढवावी, अशी जोरदार मागणी केली आहे. 
                       येथील पंकज लॉनमध्ये रविवारी 29 रोजी दुपारी 1 वाजता कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला काँग्रेस नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती. 
                      राज्यात लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्यानुसार विविध राजकीय पक्ष, नेते, कार्यकर्त्यांचे मेळावे सुरू आहेत. या विधानसभा निवडणुकीत सोबतच सातारा येथे माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्याने येथे लोकसभा पोटनिवडणूकही लागली आहे. या दोन्ही निवडणुका एकत्रितपणे होणार असून त्यासाठी 21 ऑक्टोबरला प्रत्यक्ष मतदान होणार आहे. तर 24 ऑक्‍टोबरला मतमोजणी व निकाल जाहीर होणार आहे. 
                    परंतु, सातारा लोकसभा पोटनिवडणूकीत उदयनराजे भोसले हे भाजपमधून निवडणूक लढविणार हे आता निश्चित झाले आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर तगडा, प्रतिस्पर्धी उमेदवार देण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार उदयनराजेंच्या विरोधात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्यासह सनबिम इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष सारंग पाटील व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्या नावाची चर्चा आहे. 
                        मात्र, नुकत्याच झालेल्या काँग्रेस नेत्या सोनिया गांधी व राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यामध्ये झालेल्या चर्चेनुसार व सोनिया गांधी यांनी पृथ्वीराज चव्हाण यांनी सातारा लोकसभा पोटनिवडणूक लढवावी, अशा सूचना दिल्याची चर्चा आहे. परंतु, पृथ्वीराजबाबांनी याबाबत कार्यकर्त्यांशी बोलूनच सातारा लोकसभा की कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची, हा निर्णय जाहीर करणार असल्याचे सांगितले आहे. 
                   त्यानुसार कराड येथे पंकज लॉनमध्ये रविवारी 29 रोजी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रीय काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास उपस्थित पक्षाचे नेते, स्थानिक नेते, पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पृथ्वीराजबाबांकडे आपण कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातूनच निवडणूक लढवावी, अशी जोरदार मागणी करत घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे कार्यकर्त्यांचा हाच निर्णय समजून पृथ्वीराज चव्हाण कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार, यावर आता जवळजवळ शिक्कामोर्तब झाले आहे.      
                         यासंदर्भात आता केवळ पृथ्वीराजबाबांनी प्रत्यक्ष घोषणा करणेच बाकी राहिले आहे. त्यामुळे आता बाबांच्या अंतिम निर्णयाकडे काँग्रेस नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह संपूर्ण कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील जनता, मतदार व जिल्ह्यातीलही लोकांचे लक्ष लागून राहिले आहे. 

नानांचे नाव घेताच कार्यकर्त्यांचा संताप 

या मेळाव्यात आपले मनोगत व्यक्त करताना एका कार्यकर्त्यांने आ. आनंदराव पाटील यांच्या नावाचा केवळ उल्लेख केला. मात्र, उपस्थित कार्यकर्त्यांनी यावेळी मोठा गलका करत, आम्हाला त्यांच्याबद्धल काही ऐकायचे नाही. त्यांचे नावही आता घेऊ नका, अशा कार्यकर्त्यांमधून जोरदार आरोळ्या उठल्या. त्यामुळे संबंधित कार्यकर्त्यांला आपले म्हणणेही नीट मांडता आले नाही. यावरून आ. आनंदराव पाटील यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यापासून फारकत घेतल्यामुळे लोकांमध्ये त्यांच्याबद्धल निर्माण झालेली कमालीची नाराजी, संताप दिसून आला.