महामार्ग,अपघात आणि यंत्रणा

रस्तावर तडफडून अपघातग्रस्त नागरिकांचा जीव जातोय

महामार्ग,अपघात आणि यंत्रणा
आशियाई महामार्गाचे ड्रोनच्या साह्याने टिपलेले इंदोली फाटा ते भुयाचीवाडी येथील छायाचित्र (छाया.अमोल जाधव तासवडे)
महामार्ग,अपघात आणि यंत्रणा

महामार्ग,अपघात आणि यंत्रणा

रस्तावर तडफडून अपघातग्रस्त नागरिकांचा जीव जातोय

 

शेंद्रे ते कागल आशियाई महामार्गावर गत तीन महिन्यात अनेक भीषण अपघात होऊन निष्पाप जीवांना आपल्या प्राणास मुकावे लागले आहे.यामध्ये उंब्रज येथील तारळी पुलावर झालेला टेम्पो ट्रॅव्हलरचा अपघात,पाचवड फाटा येथील दोन कारचा अपघात,वहागावच्या हद्दीतील स्विफ्टकारचा भीषण अपघात अथवा मंगळवारी रात्री खोडशी जवळ झालेला दुचाकीचा हृदयद्रावक अपघात यामध्ये झालेली जीवितहानी विचार करायला लावणारी आहे.रस्त्याच्या कामांकडे झालेले दुर्लक्ष,अन्यायकारक टोलवसुली आणि चिरीमिरीसाठी बोकाळलेले महामार्ग पोलीस पथक तसेच रस्ते विकास महामंडळ यामुळे महामार्गावरील सोयी सुविधा आणि 'स्ट्रेस मॅप'मध्ये ठरलेल्या नियमावली यांची हेळसांड होत असून फास्ट टॅग राबवताना शासन आदेश तंतोतंत पाळणारे टोल प्रशासन उपयोजनांच्या आदेशाकडे मात्र सोयीस्कर रित्या डोळेझाक करीत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

शेंद्रे ते कागल दरम्यान चारपदरी रस्त्याची निर्मिती होत असताना यामध्ये अनेक त्रुटी राहिल्या आहेत.शेंद्रे ते भुयाचिवाडी दरम्यान पुणे ते कोल्हापूर बाजूला सेवा रस्ताच तत्कालीन ठेकेदाराने खाल्ला असल्याची लोकांच्यात चर्चा आहे.फक्त गाव आहे त्या ठिकाणीच आत बाहेर जाण्यायेण्यासाठी नाममात्र रस्ता तयार आहेत तर भरतगाव ते बोरगाव दरम्यान तसेच भुयाचिवाडी ते काशीळ दरम्यान कोल्हापूर ते सातारा बाजूला सेवा रस्ता वाहतुकीसाठी खुला आहे.यामुळे सेवा रस्ताच नसल्याने नाईलाजाने दुचाकीस्वार यांना महामार्गावरून धोकादायक रित्या प्रवास करावा लागतो तसेच महामार्गावरून  डाव्याबाजूने दुचाकी अथवा तीनचाकी चालल्या असता जड वाहने ही दोन लेन मधील उजव्या बाजूने चालत असतात यामुळे वाहतूक कोंडी तसेच अपघात यांचे प्रमाण वाढत आहे.काही दिवसांपूर्वी गृहराज्यमंत्री यांनी उजव्या बाजूने चालणाऱ्या जड वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते परंतु महामार्ग पथकाने टोलनाक्यावर थांबून पावत्या फाडण्यातच धन्यता मानल्याने सदरची संकल्पना बारगळली आहे.

शेंद्रे ते कागल आशियाई महामार्गावरील रस्त्याच्या साईडपट्टीवर खडे मश्रित मातीचे साम्राज्य पसरले असून अनेक हॉटेल व्यावसायिकांनी आपले पार्किंग,साइन बोर्ड तसेच नाष्टा सेंटर महामार्गाच्या लगतच थाटली आहेत यामधील 'वरकमाई' वरून बरेच मोठे वादंग माजल्याची चर्चा आहे.महामार्ग पोलीस पथक,स्थानिक पोलीस स्टेशन तसेच रस्ते देखभाल विभागाचे कर्मचारी महामार्गावरून मोकळ्यात येरझाऱ्या घालण्यात निष्णात झाले असल्याने गांधारीच्या भूमिकेत गेले आहेत.मात्र रस्ते अपघात रोखण्यासाठी कोणतीही उपाययोजना कोणत्याही विभागाकडे नसल्याने नाहक नागरिकांचे बळी जात असून अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू पावणारांची संख्या लक्षणीय असून संबंधित पोलीस स्टेशन घटनेचा तपास गांभीर्याने करीत नसल्याची चर्चा आहे.

 

महामार्गावर सीसीटीव्ही,स्ट्रीट लाईट कधी..!

 

वाहनांच्या दंड वसुलीसाठी 'स्पीडगन' उपलब्ध होतात मात्र वारेमाप टोलवसुली राबवून सुद्धा सीसीटीव्ही यंत्रणा महामार्गावर नसल्याने अप टू डेट असणाऱ्या दळणवळण खात्याकडे नागरिकांची संशयाची सुई जात आहे.कारण सीसीटीव्ही यंत्रणा असेल तर महामार्गावरील होणारी चोरी,रॉबरी,अपघात तसेच देखभाल दुरुस्तीच्या कामावर नजर ठेवता येणार आहे.तसेच शेंद्रे ते पुणे मार्गावर स्ट्रीट लाईट असल्याने महामार्ग रात्रीचा उजेडात असतो परंतु शेंद्रे ते कागल दरम्यान महामार्ग रात्रीच्या वेळेत अंधारातच असतो,उंब्रज येथील भराव पुलावर स्ट्रीट लाईट बसवण्याची तरतूद आहे परंतु बत्ती गुल असल्याने ठेकेदारांनी झोल केला असल्याची चर्चा आहे.