राज्यात समन्यायी पाणी वाटपाचा आटपाडी पॅटर्न वापरावा - डॉ. भारत पाटणकर

राज्यात समन्यायी पाणी वाटपाचा आटपाडी पॅटर्न वापरावा - डॉ. भारत पाटणकर

कराड/प्रतिनिधी : 
                        20 वर्षाच्या संघर्षानंतर दुष्काळग्रस्त आटपाडी, सांगोला, तासगाव तालुक्यातील प्रत्येक कुटुंबाला 5 एकराचे बागायत मिळेल, एवढे प्रकल्प मिळाले आहेत. त्यामध्ये आटपाडी तालुक्यातील वगळलेली सर्व गावेही यात सहभागी होतील. पश्चिम महाराष्ट्रातील पाणी उचलून संबंध दुष्काळी भागात पोहचवल्यास येथील महापुराचा फटका सौम्य होईल. आटपाडी पॅटर्न राबवणल्यास शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील, त्यामुळे सरकारने राज्यभरात समन्यायी पाणीवाटपाचा आटपाडी पॅटर्न राबवावा, असे मत श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष व राष्ट्रीय संघटक डॉ. भारत पाटणकर यांनी व्यक्त केले. 
                        येथील शासकीय विश्रामगृहात 15 सप्टेंबर रोजी होणाऱ्या श्रमिक मुक्ती दलाचा वार्षिक मेळाव्याची माहिती देण्यासाठी बुधवारी 11 रोजी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पंजाबराव पाटील, आनंदराव जमाले, सिद्धेश्वर पाटील, चंद्रकांत पाटील, शिवाजी शिंदे, जयसिंग गावडे, संभाजी पाटील यांची उपस्थिती होती. 
                  डॉ. पाटणकर म्हणाले, या मेळाव्यात आगामी विधानसभा निवडनुकीसह पाटण तालुक्यातील समन्यायी पाणीवाटपाचा संघर्ष, कराड विमानतळ आणि तारळी धरणग्रस्तांची सध्या सुरू असलेली चळवळ, नवे कृषी औद्योगिक धोरण, बडवे हटवल्यानंतर चालू झालेल्या पुरुष सूक्त हटाव चळवळीचा कार्यक्रम, वारकरी संतांची संस्कृती हीच महाराष्ट्राची संस्कृती, या भूमिकेच्या आधारे केले जाणारे विचार मंथनाची प्रक्रिया, अशा विषयांबाबतचे विवीध ठरावही यावेळी घेण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी  दिली.