रोजगार संधींसाठी 'युथ फोरम' तयार करणार - डॉ. अतुल भोसले

रोजगार संधींसाठी 'युथ फोरम' तयार करणार - डॉ. अतुल भोसले

कराड/प्रतिनिधी : 

                        कराड दक्षिण मतदारसंघातील युवा पिढी ही प्रतिभावान आहे. अखंड परिश्रम करण्याची त्यांची तयारी आहे. अशा तरुणाईला योग्य संधी मिळाली तर ते मिळालेल्या संधीचे सोने केल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणूनच आपल्या भागातील युवा पिढीला रोजगार संधी उपलब्ध व्हावी, यासाठी 'युथ फोरम' या नावाचे स्वतंत्र व्यासपीठ तयार करणार असल्याचे प्रतिपादन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष ना. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी केले. 

                      जुळेवाडी (ता. कराड) येथील जयवंत इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्रांगणात आयोजित 'युथ कनेक्ट' कार्यक्रमात ते बोलत होते. तरुणाईच्या सळसळत्या उत्साहात पार पडलेल्या या कार्यक्रमात अतुलबाबांनी महाविद्यालयीन युवक-युवतींशी मनमोकळा संवाद साधत आपला जीवनप्रवास उलगडला. अतुलबाबांचे बालपण, शालेय व महाविद्यालयीन शिक्षण, समाजकारणातील प्रवेश, राजकीय वाटचाल, भाजपा सरकारची ध्येय्यधोरणे, कराड दक्षिणमधील विकासकामे आणि भविष्यतील व्हिजन याबाबत युवक-युवतींनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची त्यांनी दिलखुलास उत्तरे दिली.

                    शालेय जीवनातील आठवणी जागवताना अतुलबाबा म्हणाले, माझे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण कराडमध्ये झाले. लहानपणापासून मी माझे आजोबा जयवंतराव भोसले आप्पा आणि वडील डॉ. सुरेशबाबा यांचे सहकार, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील काम पाहत आलो आहे. तेव्हापासूनच समाजासाठी काम करण्याची उर्मी माझ्या मनात निर्माण झाली. पुढे मी राजकारणात प्रवेश केला. ‘प्रथम देश, नंतर पक्ष व त्यानंतर स्वत:’ असे देशहिताचे सूत्र डोळ्यांसमोर ठेऊन वाटचाल करणाऱ्या भाजपात मी प्रवेश केला. ज्यांना मी माझ्या जीवनातील आदर्श मानतो असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर विश्वास दाखवत मला पंढरपूरच्या श्री पांडुरंगाची सेवा करण्याची संधी दिली. या काळात विठुरायाच्या दर्शानासाठी येणाऱ्या वारकऱ्यांना अधिकाधिक सेवासुविधा देण्याचा प्रयत्न मी केला. भाजपा सरकारच्या भक्कम पाठबळामुळे आज कराड दक्षिणमध्ये कोट्यवधींचा विकासनिधी प्राप्त झाला असून, गतीमान विकास चालू आहे.

                 भारत हा तरूणांचा देश आहे. या तरूणाईच्या उत्कर्षासाठी कार्यरत राहण्याचा माझा संकल्प आहे. आपल्या भागातील तरूण-तरूणींना करिअरची दिशा निश्चित करण्याबाबत विशेष मार्गदर्शनाची आवश्यकता असून, त्याबाबत धोरणात्मक पातळीवर कृतीकार्यक्रम आखण्याचा माझा मनोदय आहे. आज भाजपा सरकार उद्योजक बनू पाहणाऱ्या युवकांना मुद्रा लोन व आण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून कर्जरूपाने भरीव अर्थसाहाय्य करत आहे. कौशल्य विकाससाठी लवकरच सरकार एक हेल्पलाईन सुरू करणार असल्याची माहिती देऊन, अतुलबाबांनी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालीच देश महासत्ता बनेल असे नमूद केले.