सैदापुरातील तीन सख्या बहिणींच्या मृत्यूचे अहवाल प्राप्त

सैदापूर ता. कराड येथील एकाच कुटुंबातील तीन सख्ख्या बहिणींचा डिसेंबर २०२० मधे संशयास्पद मृत्यू झाला होता. कराड पोलिसांनी त्यांच्या उलटीचे व व्हिसेराचे नमुने तपासणीसाठी पुणे व मिरज येथे पाठवले. हे अहवाल दोन महिन्यानंतर पोलिसांना प्राप्त झाले आहेत.

सैदापुरातील तीन सख्या बहिणींच्या  मृत्यूचे अहवाल प्राप्त

सैदापुरातील तीन सख्या बहिणींच्या मृत्यूचे अहवाल प्राप्त

विषबाधा झाली नसल्याची शक्यता : तज्ञांशी संवादानंतर पोलीस तपासाची पुढील दिशा ठरवणार 

कराड/प्रतिनिधी :
          सैदापूर ता. कराड येथील तीन सख्ख्या बहिणींचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली होती. डिसेंबर महिन्यात ही दुर्दैवी घटना घडली होती. मृत्यूनंतर तिनही मुलींच्या उलटीचे व व्हिसेराचे नमुने तपासणीसाठी पुणे व मिरज येथे पाठवण्यात आले होते. हे अहवाल दोन महिन्यानंतर कराड पोलिसांना प्राप्त झाले आहेत. याप्रकरणी पोलीस निरिक्षक राहूल वरूटे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. दरम्यान, सदर अहवाल प्राप्त झाले  असले तरी त्या अनुषंगाने कराड पोलीस शासकीय वैद्यकीय तज्ञांशी संवाद साधून तपासाची पुढील दिशा ठरवणार असल्याचे समजते.
         आयुषी सासवे (वय 3 वर्षे), आरूषी सासवे (8) व आस्था शिवानंद सासवे (9) अशी मृत्यू झालेल्या बहिणींची नावे आहेत.
         डिसेंबर २०२० मधे सैदापूर येथील एकाच घरातील तीन सख्ख्या बहिणींचा संशयास्पद मृत्यू झाला होता. यावेळी संबंधित मुलींच्या आईसह त्या तिनही मुलींना जेवणानंतर उलट्या झाल्या. त्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना एकापाठोपाठ तीन मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेने सैदापूरवर शोककळा पसरली होती. तसेच तीन सख्ख्या बहिणींच्या संशयास्पद मृत्यूने जिल्हाभर खळबळ उडाली होती.
        दरम्यान, या घटनेनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी रणजीत पाटील, वरिष्ठ पोलीस निरिक्षक बी. आर. पाटील, पोलीस निरिक्षक राहूल वरूटे यांनी वेगवेगळ्या पद्धतीने तपास केला. शवविच्छेदनानंतर व्हिसेरा राखून ठेवण्यात आला होता. तसेच त्या मुलींच्या उलट्यांचे नमुने तपासणीसाठी पुणे व मिरज येथे पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल तब्बल दोन महिन्यांनी कराड पोलिसांना प्राप्त झाला आहे. या अहवालावर पोलीस वैद्यकीय तज्ञांशी चर्चा करत असून त्यांनी हा अहवाल अत्यंत गोपनीय ठेवला आहे. या अहवालात नेमके काय आहे? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.