साखरपुड्यातुन 14 तोळे सोने असलेली पर्स लंपास

साखरपुड्याच्या कार्यक्रमातून  14 तोळे सोन्याचे दागिने असलेली पर्स लंपास झाल्याचा प्रकार घडला. पर्समध्ये एका महिलेचे सुमारे 5 लाख रूपये किमतीचे 14 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने होते. त्यावर अज्ञात चोरट्याने डल्ला मारला.

साखरपुड्यातुन 14 तोळे सोने असलेली पर्स लंपास
संग्रहित फोटो

साखरपुड्यातुन 14 तोळे सोने असलेली पर्स लंपास 

कराडात एका हॉटेल लॉनमधील प्रकार : अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दखल 

कराड/प्रतिनिधी : 
            साखरपुड्याच्या कार्यक्रमातून  14 तोळे सोन्याचे दागिने लंपास झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला. येथील एका हॉटेल लॉनमध्ये साखरपुड्याच्या कार्यक्रम सुरु होता. या कार्यक्रमातून एका महिलेचे सुमारे 5 लाख रूपये किमतीचे 14 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केले. रविवारी 21 रोजी दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. 
            सविता सुधीर पाटील (वय 41) रा. वारूंजी विमानतळ ता. कराड यांनी रात्री उशिरा याबाबतची फिर्याद शहर पोलिस ठाण्यात दिली आहे. 
            याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, येथील एका हॉटेल लॉनमध्ये सविता पाटील या त्यांच्या नातेवाईकाचा साखरपुडा होता. या कार्यक्रमासाठी त्या त्यांच्या मुलासोबत आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी त्यांच्या सोन्याच्या बांगड्या व ब्रेसलेट पर्समध्ये काढून ठेवल्या. 
            दरम्यान, साखरपुड्याचा कार्यक्रम सुरू असताना त्यांच्या नणंदेची मुलगी ऋतुजा साळुंखे हिने सविता यांच्याजवळ तिच्या भावाची जुनी अंगठी त्यांच्या पर्समध्ये ठेवायला दिली. त्यानंतर 1.30 वाजण्याच्या सुमारास सविता पाटील या त्यांच्या जवळची पर्स शेजारच्या सोफ्यावर ठेवून नवरीमुलीसोबत फोटो काढण्यासाठी गेल्या. फोटो काढून परत आल्यानंतर त्या पर्स घेण्यासाठी सोफ्याकडे गेल्या असता त्यांना सदर ठिकाणी पर्स दिसली नाही. त्यानंतर त्यांनी पर्सबाबत पै-पाहुण्यांना विचारणा केली. मात्र, त्यांच्या पर्सबाबत कोणालाच काही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. 
           यानंतर अज्ञात व्यक्तीने त्यांची पर्स चोरली असल्याबाबतची खात्री झाल्यानंतर सविता पाटील यांनी याबाबत शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या पर्समध्ये सविता पाटील यांचे  सुमारे 4 लाख 20 हजार रूपये किमतीचे सोन्याच्या 6 बांगड्या, 35 हजार रूपये किमतीचे 1 तोळे वजनाचे सोन्याचे ब्रेसलेट, 25 हजार रूपये किमतीची सोन्याची 7 ग्रँम वजनाची अंगठी असा एकूण  सुमारे 4 लाख 80 हजार रूपये किमतीचे सोन्याचे दागिने होते. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक स्वामी करीत आहेत. दरम्यान, ही पर्स अज्ञात चोरट्याने लंपास केल्याचे समजल्यावर साखरपुड्याच्या कार्यक्रमात एकच गदारोळ उडाला.