समाजमान्यतेने पत्रकारांच्या लेखणीला बळ येईल  - खा. श्रीनिवास पाटील

कृष्णाकाठी जन्मलेल्या व्यक्तींच्या मनामध्ये एक प्रकारची उर्मी आहे. ज्येष्ठ नेते आदरणीय यशवंतराव चव्हाण हे त्यातलेच असून तेही एक पत्रकार होते. याच भूमीत जन्मलेल्या गोपाळ गणेश आगरकरांनी आपल्या परखड लेखणीच्या माध्यमातून समाजाला एक नवी दिशा देण्याचे काम केले. तीच उर्मी अंगी बाळगत त्याला समाजमान्यतेची जोड मिळवल्यास पत्रकारांच्या लेखणीला बळ येईल.

समाजमान्यतेने पत्रकारांच्या लेखणीला बळ येईल  - खा. श्रीनिवास पाटील
कराड : खा. श्रीनिवास पाटील, भोजराज निंबाळकर, दत्तात्रय कोकरे यांच्या हस्ते व क्लबच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत क्लबचे अध्यक्ष पत्रकार खंडू इंगळे यांचा सन्मान करण्यात आला.

समाजमान्यतेने पत्रकारांच्या लेखणीला बळ येईल 

खा. श्रीनिवास पाटील : लायन्स क्लब ऑफ कराडच्या वतीने पत्रकारांचा सन्मान सोहळा संपन्न 

कराड/प्रतिनिधी :

         कृष्णाकाठी जन्मलेल्या व्यक्तींच्या मनामध्ये एक प्रकारची उर्मी आहे. ज्येष्ठ नेते आदरणीय यशवंतराव चव्हाण हे त्यातलेच असून तेही एक पत्रकार होते. याच भूमीत जन्मलेल्या गोपाळ गणेश आगरकरांनी आपल्या परखड लेखणीच्या माध्यमातून समाजाला एक नवी दिशा देण्याचे काम केले. तीच उर्मी अंगी बाळगत  त्याला समाजमान्यतेची जोड मिळवल्यास पत्रकारांच्या लेखणीला बळ येईल, असे प्रतिपादन माजी राज्यपाल खा. श्रीनिवास पाटील यांनी केले.

        येथील कराड अर्बन बँकेच्या शताब्दी हॉलमध्ये मंगळवारी 11 रोजी पत्रकार दिनानिमित्त लायन्स क्लब ऑफ कराडच्या वतीने आयोजित पत्रकार सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी लायन्स क्लबचे द्वितीय उपप्रांतपाल भोजराज निंबाळकर, सातारचे जिल्हा माहिती अधिकारी दत्तात्रय कोकरे, लायन्स क्लब ऑफ कराडचे सचिव संजय पवार, अध्यक्ष खंडू इंगळे, खजिनदार मिलिंद भंडारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

        खा. पाटील म्हणाले, मनापासून केलेले काम हे आयुष्यभर टिकते. पत्रकारांनीही अगदी तळमळीने केलेल्या कामाची समाजाकडून त्यांना कोणत्या ना कोणत्या माध्यमातून नक्कीच पोच मिळते. समाजाने पाठीवर दिलेली हीच कौतुकाची थाप अत्यंत महत्त्वाची असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 

        ते म्हणाले, कोरोना आणि लॉकडाऊनमुळे लोकांच्या राहणीमानात विलक्षण बदल झाला. त्यामुळे जीवनाचा आणि जगण्याचा खरा मतितार्थही लोकांना समजला आहे. त्‍यामुळे पत्रकारांनी चाकोरीबाहेर जाऊन स्वतःसह कुटुंबीयांनाही वेळ देणे  महत्त्वाचे आहे. त्यासाठी पर्यटन हे सर्वोत्तम माध्यम असून पत्रकारांनी पर्यटनाचीही लेखणी हाती घ्यावी, असे आवाहनही खा. पाटील यांनी यावेळी केले.

        भोजराज निंबाळकर म्हणाले, जसे कोरोनामुळे जगभरावर एक संकट ओढवले आहे. तसेच मानवी हस्तक्षेपामुळे आपण स्वतःहून अनेक नैसर्गिक संकटे ओढवून घेत असून या आपत्तींमागे ग्लोबल वॉर्मिंग हे महत्त्वाचे कारण आहे. ही परिस्थिती सुधारण्याच्या दृष्टीने विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली लायन्स क्लब, जिल्हा सहकारी बँक आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने 20 फेब्रुवारी 2022 रोजी एक वेबिनार आयोजित केले आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील ग्रामपंचायती आणि कृषी खात्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यासह लायन्स क्लबच्यावतीने वेळोवेळी करण्यात येत असलेली सर्व सेवाकार्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम पत्रकार करतात. त्यामुळे त्यांच्या कृतज्ञतेप्रती लायन्स क्लबच्या माध्यमातून दरवर्षी पत्रकारांचा गौरव करण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

        अध्यक्ष खंडू इंगळे म्हणाले, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी स्वातंत्र्य लढ्यात वृत्तपत्राची गरज भासल्याने पहिले मराठी वृत्तपत्र सुरू केले. त्यामुळे त्यांचा जन्मदिनी हा पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळातील पत्रकारीतेत काळानुरूप बदल होत गेला. सध्या, डिजिटल पत्रकारितेचे युग आले आहे. या डिजिटल माध्यमांकडे शासनही संवेदनशील दृष्टीने पाहात असून डिजिटल पत्रकारीतेनेही एकप्रकारची क्रांती घडवली असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

        दरम्यान, उपस्थित पत्रकारांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच लायन्स क्लब ऑफ कराडचे अध्यक्ष पत्रकार खंडू इंगळे यांचा मान्यवरांसह क्लबच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला. याप्रसंगी कराड, मलकापूरसह तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते. सूत्रसंचालन ला.  राजीव शहा यांनी केले. तर आभार ला. संदीप पवार यांनी मानले.