समविचारी शेतकरी पक्षांसोबत 288 जागा लढविणार - रघुनाथदादा पाटील

समविचारी शेतकरी पक्षांसोबत 288 जागा लढविणार - रघुनाथदादा पाटील

कराड/प्रतिनिधी : 
                         भाजप सरकारने शेतकऱ्यांचे पूर्णपणे वाटोळ केले आहे. काँग्रेसच्या काळात होणाऱ्या शेतकरी आत्महत्यांमध्ये भाजपच्या काळात दुपटीने वाढ झाली आहे. तसेच या सरकारकडून शेतकऱ्यांवर अन्यायकारक कायदे लादण्यात येत असून याबाबत भाजप-शिवसेनेसह काँग्रेस राष्ट्रवादीही एकत्र येत असतील तर शेतकरी संघटना गप्प बसणार नाहीत. त्यासाठी राज्यातील समविचारी शेतकरी संघटनांना सोबत घेऊन विधानसभेच्या सर्वच्या सर्व 288 जागा लढवणार असल्याचा निर्धार शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी व्यक्त केला. 
                       येथील हॉटेल अलंकार येथे शुक्रवारी 28 रोजी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथदादा पाटील आणि बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांची संयुक्तीक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.  याप्रसंगी विधानसभा निवडणूक धोरणाबाबत भूमिका जाहीर करताना ते बोलत होते. यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बी.जी पाटील, जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला, जिल्हा उपाध्यक्ष उत्तम खबाले, क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष विजय पाटील, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विकास जाधव, जिल्हा उपाध्यक्ष हिंदुराव पाटील, तालुकाध्यक्ष तात्या पाटील, किशोर जाधव, प्रकाश फडतरे आदी. पदाधिकारी उपस्थित होते. 
                      यामध्ये शेतकरी संघटना, बळीराजा शेतकरी संघटना, प्रहार संघटना, क्रांतिकारी कम्युनिस्ट पार्टी, बळीराजा पार्टी आदी. समविचारी संघटनांचा समावेश असणार असल्याची माहिती देत जेवणाचे पूर्ण भरलेले ताट या चिन्हावर ही निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठीही सर्वानुमते तगडा उमेदवार देणार असल्याचेही ते म्हणाले आहेत. दरम्यान, कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून पंजाबराव पाटील, तर कराड उत्तरेतून साजिद मुल्ला यांच्या उमेदवारीची घोषणाही त्यांनी या पत्रकार परिषदेद्वारे जाहीर केली.