संघर्ष यात्रा काढून सहकारमंत्र्यांच्या दारात ठिय्या देणार - पंजाबराव पाटील

सरकार व कारखानदारांनी शेतकऱ्यांच्या ऊसाला एक रकमी एफआरपी व अधिक सहाशे रुपये जादा दर जाहीर करावा. या मागणीसाठी रविवारी 7 नोव्हेंबर रोजी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पावन भूमीतून ऊस उत्पादक शेतकऱ्यांसोबत येडेमच्छिंद्र ते कराड अशी पायी संघर्ष यात्रेला काढणार आहोत. ही संघर्ष यात्रा थेट सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या दारात धडकणार असून त्याठिकाणी मागणी मान्य होत नाही, तोपर्यंत खर्डा-भाकर खाऊन बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करणार.

संघर्ष यात्रा काढून सहकारमंत्र्यांच्या दारात ठिय्या देणार - पंजाबराव पाटील

संघर्ष यात्रा काढून सहकारमंत्र्यांच्या दारात ठिय्या देणार 

पंजाबराव पाटील : क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या गावातून 7 रोजी पायी यात्रेस प्रारंभ 

कराड/प्रतिनिधी :  

           सरकार व कारखानदारांनी  शेतकऱ्यांच्या ऊसाला एक रकमी एफआरपी व अधिक सहाशे रुपये जादा दर जाहीर करावा. या मागणीसाठी रविवारी 7 नोव्हेंबर रोजी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पावन भूमीतून ऊस उत्पादक शेतकऱ्यांसोबत  येडेमच्छिंद्र ते कराड अशी पायी संघर्ष यात्रेला काढणार आहोत. ही संघर्ष यात्रा थेट सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या दारात धडकणार असून त्याठिकाणी ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच जोपर्यंत आमची मागणी मान्य होत नाही, तोपर्यंत खर्डा-भाकर खाऊन बेमुदत ठिय्या आंदोलन सुरूच ठेवणार असल्याची माहिती बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी दिली. 

         येथील शासकीय विश्रामगृहात मंगळवारी 2 रोजी ऊस दर व त्यासंदर्भातील बळीराजा शेतकरी संघटनेची भूमिका याबतची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बी.जी. पाटील, जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला, बळीराजा कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत यादव, उपाध्यक्ष अविनाश फुके, उत्तम खबाले, मनोज खबाले, सागर कांबळे आदींची उपस्थिती होती.  

         पंजाबराव पाटील म्हणाले, शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आम्ही जीवाची बाजी लावू. "उठा उठा; ऊस आंदोलनाची वेळ झाली", "घामाच्या दामासाठी विळा दोरी ठेवा बाजूला; चला आता ऊसदरासाठी भांडायला" या घोषवाक्यानुसार ही संघर्ष यात्रा काढण्यात येणार आहे. येडेमच्छिंद्र येथे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सकाळी ९ वाजता या यात्रेला प्रारंभ करण्यात येणार आहे. त्यानंतर शिरटे, नरसिंहपूर, खुबी, कृष्णा कारखाना, रेठरे बुद्रुक, गोंदी, शेरे दुशेरे, शेणोली, वडगाव हवेली, कोडोली, कार्वे, कापिल, गोळेश्वर व  कराड असा यात्रेचा मार्ग असून कराड येथे स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी पुष्पचक्र अर्पण करण्यात येणार आहे. त्यानंतर सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या निवासस्थानी बळीराजा शेतकरी संघटनेच्या माध्यमातून ठिय्या करण्यात येणार आहे. 

    तसेच जोपर्यंत सरकार व कारखानदार शेतकऱ्यांच्या ऊसाला एक रकमी एफआरपी व अधिक सहाशे रुपये जादा दर जाहीर करणार नाहीत.  तोपर्यंत सहकारमंत्र्यांच्या दारात खर्डा-भाकर खाऊन बेमुदत ठिय्या आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.