परदेशातील भारतीयांची आर्त हाक...

पैसा आहे, सर्व काही आहे, परंतु कोरोनाने दगावल्यास आपले काय होणार, याची निश्चिती नाही. केंद्र सरकार आणि राज्य सरकार परदेशातील भारतीयांना परत आणण्याचे प्रयत्न करत आहेत. ते परत येतीलही, पैसा खूप कमवला परंतु मायदेशाचे, जवळच्या माणसांचे, इथल्या मातीचे महत्व त्यांच्या नक्कीच लक्षात आलेले असेल. 

  परदेशातील भारतीयांची आर्त हाक...
file picture

कृष्णाकाठ / अशोक सुतार 

           तूने पैसा बहुत कमाया, इस पैसे ने देश छुड़ाया, देश पराया छोड़ के आजा, पंछी पिंजरा तोड़ के आजा, अशी भावना आज परदेशातील भारतीयांची झाली आहे. ही त्यांच्या मनातील आर्त हाक आहे. परदेशातील भारतीयांच्या मनाची घालमेल चाललेली पाहून जिंदगी किती क्षणभंगुर आहे आणि मायभूमीत राहणे, आपल्या माणसांत राहणे किती योग्य आहे, हे पटते.   मायदेशात येण्याची ओढ सर्वांना लागली आहे. पैसा आहे, सर्व काही आहे, परंतु कोरोनाने दगावल्यास आपले काय होणार, याची निश्चिती नाही. केंद्र सरकार आणि राज्य सरकार परदेशातील भारतीयांना परत आणण्याचे प्रयत्न करत आहेत. ते परत येतीलही, पैसा खूप कमवला परंतु मायदेशाचे, जवळच्या माणसांचे, इथल्या मातीचे महत्व त्यांच्या नक्कीच लक्षात आलेले असेल. 

          महाराष्ट्रातील अनेकजन नोकरीनिमित्त इराण, आखात, सौदी अरेबिया आणि इतर देशांत आहेत. परदेशात जाताना त्यांनी अनेक स्वप्ने पाहिलेली असतात. माणसाचे आयुष्य सुखकर व्हावे, अशी प्रत्येकाची इच्छा असते, त्यासाठी देश सोडणे मनाला पटत नसते. परंतु पापी पेट का सवाल है, बाबू ! जगात सर्वत्र चांगले सुरु असताना करोनाने दहशत माजवली आहे. त्यामुळे चीन, इटली, फ्रांस, जपान, स्पेन इत्यादी पृथ्वीवरील १७६ देशांत करोनाची लागण झाली आहे. प्रत्येक देशाने आपल्या सीमा बंद केल्या आहेत. अमेरिकेने तर सर्व विमानांची उड्डाणे बंद केली आहेत. तिथे कोरोनाच्या दहशतीमुळे राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. आखात, सौदी अरेबिया, अरब अमिराती, कुवेत, दुबई इ. ठिकाणी कामाला असलेले भारतीय कोरोनामुळे चिंतेत आहेत. कोरोनाची दहशत सुरु झाल्यानंतर अनेक राष्ट्रांनी भारतीय कामगारांना देश सोडून जाण्यास सांगितले आहे. देश सोडून जायचे म्हटले तर विमानांची आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद असल्यामुळे मायभूमीत लवकर परत येऊ शकत नाही. खाण्यापिण्यासाठी हॉटेल्स, मॉल्स बंद आहेत. तेथील सरकारने भारतीय लोकांची जबाबदारी घेण्याचे टाळले आहे. या आणीबाणीच्या परिस्थितीत कामगार मात्र तोंड दाबून बुक्क्यांचा मार सोसत आहे. मायदेशाची ओढ त्यांनाही लागलेली आहे. परदेशात राहून कमावलेले पैसे नकोत पण मायभूमीत लवकर परत ने, अशी प्रार्थना परदेशातील भारतीय लोक करत आहेत. विमानतळांवर सर्वत्र शांतता आहे. त्यामुळे हे कामगार, इंजिनिअर आपल्या गावाकडील नेते व जिल्हा प्रशासनाला विनंती करीत आहेत. हे सर्व पाहिल्यावर ‘नाम’ चित्रपटाची प्रकर्षाने आठवण आल्याशिवाय राहत नाही. त्यातील गाणी खूप गाजली होती. त्यातील गाणे लक्षात राहिले. आजही हे गाणे डोळ्यांत अश्रू आणते. या गाण्यातील ओळी अशा - तूने पैसा बहुत कमाया, इस पैसे ने देश छुड़ाया, देश पराया छोड़ के आजा, पंछी पिंजरा तोड़ के आजा, अशी भावना आज परदेशातील भारतीयांची झाली आहे. ही त्यांच्या मनातील आर्त हाक आहे. परदेशातील भारतीयांच्या मनाची घालमेल चाललेली पाहून जिंदगी किती क्षणभंगुर आहे आणि मायभूमीत राहणे, आपल्या माणसांत राहणे किती योग्य आहे, हे पटते.   
             अनेक भारतीय कामगारांना परदेशातील नोकरीच्या ठिकाणच्या प्रशिक्षणाचा कालावधी संपल्याने मायदेशी परतायचे आहे. कोणी वीस, पस्तीस वर्षे परदेशात काम केले आहे. आपले घर सुधारावे, भरपूर पैसा मिळावा यासाठी परदेशात जाण्याचे फॅड सर्वत्र सुरु होते. परंतु माणसाला पैसा महत्वाचा आहेच, परंतु परिसरात आपली माणसे असतील तर त्याला सामाजिक किंमत आहे. अन्यथा पैसा असूनही अशी माणसे एकटी पडतात. कोरोनामुळे सर्व देशांतील सीमा बंदिस्त करण्यात आल्या आहेत आणि परदेशातील भारतीय कामगारांच्या आरोग्य सुविधेकडे ते देश जास्त लक्ष देत नाहीत. कारण देशातील नागरिकांना अगोदर सुविधा द्यायच्या की परदेशी कामगारांना, असा नवीन प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या देशांत जावे, असा फतवाच काही देशांनी काढला आहे. जागतिक आरोग्य आणीबाणी लागू झाली की, प्रत्येक देश आपल्यापुरताच विचार करणार हे ठरलेले आहे. त्यामुळे पैसा कमावला परंतु दुसऱ्या देशात आपल्याला काहीच किंमत राहिलेली नाही, याची जाणीव परदेशातील भारतीय कामगारांना झाली आहे. त्यांना आता मायभूमीत परतायचे आहे, आपल्या लोकांशी संवाद साधायचा आहे. मनात अनेक भावभावनांना बंदिस्त करून जगणाऱ्या भारतीयांची मने कासावीस झाली आहेत.              विमानसेवा बंद असल्याने त्यांचे मार्ग बंद झाले आहेत. त्यामुळे आम्हाला भारत सरकारने देशात परत येण्यास मदत करावी, असा टाहो परदेशातील भारतीयांचा चालला आहे. नाम चित्रपटातील गाण्यांच्या या काही ओळी त्या कामगारांच्या मनातील भावना व्यक्त करतात. पंछी पिंजरा तोड़ के आजा, आजा उमर बहुत है छोटी, अपने घर में भी हैं रोटी, चिट्ठी आई है, या ओळींची आठवण आज विदेशातील भारतीयांना येत असल्यास त्यात नवल नाही. 
              मुंबईतील सौरभला मर्चंट नेव्हीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर इराणमधील एका कंपनीत नोकरी मिळाली. नोकरीच्या ठिकाणी काम करून ९ महिने झाले आहेत. त्यांना आता गावी परतायचे आहे. मात्र करोना आजाराचा संसर्ग होऊ नये, यासाठी गावी परतण्यासाठी त्यांना तेथील सरकारकडून परवानगी मिळालेली नाही. ते व्हॉट्सअॅपवरून आणि व्हीडिओ कॉलिंगवरून आई-वडिलांशी संवाद साधत आहेत. कुटुबांनाही मुलांची तीव्र ओढ आहे. इकडे येण्यासाठी त्यांनी विमानाचे तिकिट काढले. मात्र, विमानसेवा बंद आहे. भारतात येता येत नसल्याने ते कासावीस झाले आहेत. इराणमध्ये दि. १७ मार्चपासून सार्वजनिक जीवन २० दिवस बंद झाले आहे. त्यामुळे तेथील भारतीय कामगारांना सेवा, सुविधा चांगल्या मिळणार नाहीत. त्यांची वैद्यकीय तपासणीही अजून झालेली नाही. त्यामुळे तिघांनाही भारतात आणण्यासाठी सरकारने मदत करावी, अशी मागणी सौरभच्या आई, वडिलांनी केली आहे. त्यांनी पंतप्रधान कार्यालय, गृह विभागाशीही पत्रव्यवहार केला आहे. हे एक उदाहरण आहे. अशी परिस्थिती अनेक भारतीयांची परदेशात  झाली आहे. त्यामुळे मायदेशात येण्याची ओढ सर्वांना लागली आहे. पैसा आहे, सर्व काही आहे, परंतु कोरोनाने दगावल्यास आपले काय होणार, याची निश्चिती नाही. केंद्र सरकार आणि राज्य सरकार परदेशातील भारतीयांना परत आणण्याचे प्रयत्न करत आहेत. ते परत येतीलही, पैसा खूप कमवला परंतु मायदेशाचे, जवळच्या माणसांचे, इथल्या मातीचे महत्व त्यांच्या नक्कीच लक्षात आलेले असेल.