लाचलुचपतचा दणका 'खाकी'लाच दाखवला हिसका

लाचलुचपतचा दणका 'खाकी'लाच दाखवला हिसका
लाचलुचपतचा दणका 'खाकी'लाच दाखवला हिसका

अनिल कदम/उंब्रज

सातारा जिल्ह्यातील मागील काही दिवसातील लाचलुचपत खात्याच्या बेधडक कारवायांमुळे प्रशासनाची लक्तरे वेशीवर टांगली आहेत.शासनाच्या विविध विभागातील झारीतील शुक्राचार्य गोरगरीब जनतेच्या मुंड्या पिरघळून आपले घर भरण्यात व्यस्त असल्याचे कारनामे लाचलुचपत विभागाने चव्हाट्यावर आणले होते.यामुळे जनतेतील सर्व स्तरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.चिरीमिरीला सोकावलेली शासकीय यंत्रणा जनतेची पिळवणूक करण्यात धन्यता मानत आहे.

'खाकी'च्या हातात कायद्याचा दंडुका असल्याने तर भ्रष्टाचाराचे कुरण असल्याची चर्चा जनतेत आहे.चार पाच वर्षांपूर्वी भरती झालेली पोरं खाकीच्या जीवावर चारचाकी मधून मजेत फिरू लागली आहेत,खाकीचा धाक दाखवून  बंगला,गाडी,दुचाकी,सोनंनाणं या बाबी खरेदी करण तर चिल्लर झाले आहे.एकेकाळी वयाच्या साठ वर्षापर्यंत पर्यत चाकरी करून निवृत्त होऊन रिटायरमेंटच्या पैशावर घरदार,लग्नकार्य करणारे खाकीचे राखणदार काळाच्या पडद्याआड गेले आहेत.सोमवारी रात्री लाचलुचपतच्या जाळ्यात सापडलेला सहायक पोलिस निरीक्षक याने २५ लाखांची लाच मागितली होती आकडा ऐकूणच सामान्य जनतेच्या पोटात गोळा आला आहे,कुठून येत असलं धाडस याबाबत जनता अवाक झाली आहे.रिटायरमेंट नंतर मिळणाऱ्या रकमेपेक्षा चिरीमिरीची रक्कम जास्त असल्याने अशा अजून किती 'तोडी' झाल्या असतील याबाबत काय उलगडा होणार असा गहन प्रश्न निर्माण झाला आहे.

कारवाई करायची नाही द्या पैसे,अवैध दारू सापडली कारवाई सौम्य करायची आहे द्या पैसे,अपघात झालाय ड्रायव्हर बदलायचा आहे द्या पैसे,लॉकडाउन काळात दुकान उघडलंय,गुटखा तंबाखू विकली द्या पैसे,दोन नंबरचा धंदा करायचा आहे द्या मंथली,वाळू वाहतूक करायची आहे,चोरी करायची आहे,द्या हप्ता असे एक ना अनेक मार्ग आहेत चिरीमिरी गोळा करण्याचे यामुळे भ्रष्टाचार बोकाळला असून यामध्ये काही चिरीमिरी बहाद्दर कर्मचाऱ्यांच्यामुळे 'खाकी' बदनाम होत असून सातारा येथे झालेली कारवाई स्तुत्य असल्याची चर्चा जनतेत आहे.

लाचलुचपत विभागाने एवढ्या करवाईवर न थांबता प्रशासनातील 'ज्या' कर्मचाऱ्यांबाबत तक्रारी येतील त्यांच्या संपत्तीची चौकशी करून "दूध का दूध"करावे अशी लोकांच्यातून मागणी होऊ लागली.कायम चिरीमिरी साठी आडमुठी भूमिका घेणाऱ्या 'खाकी'ला यामुळे चाप बसेल तसेच सामान्य जनतेची पिळवणूक थांबेल व कायदा सुव्यवस्था राखताना सर्वसामान्य जनतेला योग्य न्याय मिळेल अशी मागणी जनतेतून होत आहे.