मापात पाप करणारे ठेकेदार प्रशासनाला चालतात कसे...!

शासकीय अधिकाऱ्यांच्या अंगावर धावून जायची पद्धत कुठली

मापात पाप करणारे ठेकेदार प्रशासनाला चालतात कसे...!

कराड/प्रतिनिधी

सातारा जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात हमरीतुमरीचा व्हायरल व्हिडिओ पाहिल्यावर जंगलराज साताऱ्यात अवतरले काय ? असा प्रश्न निर्माण झाला असून शासकीय अधिकाऱ्यांना दमबाजी होत असली तरी प्रशासकीय यंत्रणा साधी तक्रार दाखल करत नसेल तर दाल मे कुछ काला है या पुरी दालही काली है अशी खळबळजनक चर्चा पसरली आहे. एक ठेकेदार आणि क्लास वन अधिकारी यांच्यातील दमबाजी व्हायरल झाली आहे मुळात दमबाजी करणारे ठेकेदार यांनी कोणत्या अधिकाराने प्रशासकीय अधिकाऱ्यांवर हल्लाबोल केला याबाबत उलटसुलट चर्चा सुरू असून यामुळे जिल्ह्यातील शालेय पालन पोषण आहार योजनेची चौकशी होऊन स्वस्त धान्य वाहतूक ठेकेदार तसेच शासकीय धान्य गोदामांची सखोल चौकशीची मागणी होऊ लागली आहे.

बारदानासाहित पोत्याचे वजन स्वस्त धान्य दुकानदारांच्या माथी मारणारे ठेकेदार दिवसाढवळ्या शासकीय अधिकाऱ्यांच्या अंगावर धावून जात असतील तर जिल्हयात कायदा सुव्यवस्था अबाधित आहे काय ? याबाबत सर्वसामान्य नागरिकांच्या मनात शंका निर्माण होउ लागली आहे.गोर गरिबांच्या धान्यावर डल्ला मारून मोठे झालेले ठेकेदार चिरीमिरीच्या जोरावर पुरवठा अधिकाऱ्यांना वेठीस धरत असल्याच्या चर्चा आजपर्यंत अनेकवेळा चर्चिल्या गेल्या असून जानेवारी पासून धान्य वाहतुकीचे नियोजन मुंबईत होऊ लागल्याने काहींच्या पोटात गोळा आल्याची चर्चा असून दोन पाच किलोचा काटा मारण्यात पटाईत असणारे काही बहाद्दर सामान्य स्वस्त धान्य दुकानदारांच्या मुळावर उठले असल्याच्या प्रतिक्रिया दबक्या आवाजात उमटत आहेत.

जिल्ह्यातील शासकीय शालेय पोषण आहार योजनेचे गौडगंबाल प्रकरण मोठे असून अनेकांनी आपले हात यामध्ये ओले केले असल्याची चर्चा खुद्द सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात आहे.राजकीय दबाब आणि चिरीमिरीची मुक्तहस्ताने उधळण होत असल्याने हाताची घडी तोंडावर बोट असल्याची अवस्था प्रशासनाने करून घेतली आहे.वजन मापात कोणतेही परिमाण न बाळगता उघडमाथ्याने लूट चालली असल्याची माहिती काही बाधित संस्था आणि संबधित नागरिक आपले नाव न सांगण्याच्या अटीवर देत आहेत.

शासकीय धान्य वाटप योजनेत मूळ ठेकेदार आणि नामधारी ठेकेदार प्रतिनिधी असा सावळागोंधळ निर्माण झाला आहे.ठेकेदारांचे प्रतिनिधी उजळ माथ्याने जिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकांना हजेरी लावत असल्याने अधिकारी वर्गात खळबळ पसरली होती.तर बड्या राजकीय नेत्यांचा वरदहस्त असल्याने सरकारी बाबू मिळेल ती वरदक्षणा
पदरात पाडून घेत निमूटपणे चाललेला कारभार पाहत असल्याचीही चर्चा असून गोर गरीब जनतेच्या धान्यावर डल्ला मारून मोठे झालेले कथित ठेकेदारांना काळ्या यादीत समाविष्ट केले तरच फोफावलेला खेळ थांबणार असल्याची पीडित लाभधारक नागरिकांची मागणी आहे.

 

कराड रेशन दुकान संघटनेने पुढाकार घ्यावा

पोत्यात धान्य कमी येणे,शेवटच्या तारखेला धान्य मिळणे, वजनात तफावत आढळणे कमी प्रतीचे धान्य मिळणे अशा अनेक बाबींवर कराड येथील स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने आवाज उठविणे महत्त्वाचे असून लाभार्थ्यांना तोंड देताना नाकेनऊ येत असेल तर जिल्ह्यातील ठेकेदारांना वेळीच आवर घातला असता परिस्थिती सुधारण्यासाठी मदत होणार असून पोत्यामागे दोन पाच किलो जरी कमी धान्य मिळाले तर जिल्ह्यातील लाखो टनात मोठा आकडा पुरवठा ठेकेदार काटा मारत असल्याची चर्चा आहे.यामुळे कराड येथील संघटनेने यावर आवाज उठविला पाहिजे.