जिल्हा बँकेचे अध्यक्षपद भाजप की राष्ट्रवादीकडे..!

जिल्ह्यातील वर्चस्वाच्या नादात राष्ट्रवादी गोत्यातःभाजपाचे संख्याबळ वाढले

जिल्हा बँकेचे अध्यक्षपद भाजप की राष्ट्रवादीकडे..!

जिल्हा बँकेचे अध्यक्षपद भाजप की राष्ट्रवादीकडे..!


जिल्ह्यातील वर्चस्वाच्या नादात राष्ट्रवादी गोत्यातःभाजपाचे संख्याबळ वाढले

सातारा / प्रतिनिधीः


सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली असून यामध्ये 21 पैकी 11 संचालक बिनविरोध निवडून गेले तर दहा जणांनी मैदानात लढत देऊन जिल्हा बँकेवर निवडून जाण्याची अग्निपरीक्षा दिली आणि वर्चस्व सिद्ध केले आहे यामध्ये जावली,माण, कोरेगाव, पाटण आणि कराड येथील लढती लक्षवेधी झाल्या होत्या महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये राष्ट्रवादी व भाजप वगळता एकही उमेदवार संचालक म्हणून सरळ मार्गे जिल्हा बँकेत जाऊ शकला नाही.यामुळे तीनही राजांनी बिनबोभाट करेक्ट कार्यक्रम केला असल्याचा अप्रत्यक्षपणे निर्वाळा आ.शशिकांत शिंदे यांनी सातार्‍यातील पत्रकार परिषदेत दिला होता.यामुळे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी कोण विराजमान होणार याबाबत मोठा ट्वीस्ट निर्माण झाला असून राष्ट्रवादीचे वर्चस्व असले तरी भाजपाने ही आपली ताकद दाखविली आहे. यामुळे बँकेचे अध्यक्षपद भाजपाला मिळणार की राष्ट्रवादीला यावर खलबते सुरू आहेत. अशातच आज भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी काही निवडूण आलेल्या संचालकांच्या भेटी घेवून आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
रांजणे आणि आ.शशिकांत शिंदे यांच्या मधील एका मताच्या फरकाची झालेली लढत ही जिल्ह्यामध्ये चर्चेचा विषय ठरली होती तर कोरेगाव मधून खत्री यांनी अटीतटीच्या लढतीत महाडिक यांना चिठ्ठीच्या आधारावर मात दिली खटावमधून बंडखोर उमेदवार प्रभाकर घार्गे यांनी तुरुंगातून सूत्रे हलवत विकासाच्या मुद्यावर विजय मिळवला तर कराड तालुक्यातील अटीतटीच्या लढतीत काटे की टक्कर होऊन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचा विजय झाला तर पाटण मधून गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना सत्यजित पाटणकर यांनी धूळ चारत पारंपरिक लढत होऊन करेक्ट कार्यक्रम केला असल्याची चर्चा तालुक्यात चर्चिली जात आहे यामुळे भारतीय जनता पार्टीने न लढता ही महाविकास आघाडीतील तीनही पक्षात कलगीतुरा लावून  स्वतः गंमत बघत बसले असल्याची चर्चा जिल्ह्यांमध्ये चर्चिली जात आहे.


जिल्हा बँकेवर निवडून गेलेल्या संचालकांच्यामधून सर्वमान्य अध्यक्ष निवडीवर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले असून नितीन पाटील यांनी लॉबिंग करायला सुरुवात केली आहे तर राजे गट बहुमताची छुपी बेरीज करून धक्कातंत्र अवलंबण्याची शक्यता राजकीय पंडित व्यक्त करीत आहेत परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष यांनी सातारा येथील धावत्या भेटीत खा श्रीनिवास पाटील,विधानपरिषद अध्यक्ष रामराजे नाईक निंबाळकर पालकमंत्री बाळासाहेब पाटील आणि आ शशिकांत शिंदे यांना कोणता कानमंत्र दिला याबाबत उलटसुलट चर्चा असून ऐनवेळी पाटणचे सत्यजित पाटणकर यांचे नाव पुढे आल्यास आश्चर्य वाटायला नको असेही बोलले जात असल्याने खा शरद पवार यांच्या मर्जीतील कोणीतरी अध्यक्षपदावर विराजमान होण्याची शक्यता असून याला शह देण्यासाठी भाजपाने ही व्यूहरचना आखली असल्याचे दिसत आहे. ज्यांच्या आधिपत्याखाली बँकेची निवडणूक पार पडली ते आमदार शिवेंद्रराजे भोसले हे भाजपात आहेत. त्यामुळे त्यांनी या निवडणूकीत काही जागांवर आपला दावा सांगत तर काहींचा कार्यक्रम करत आपल्या समर्थकांचे संख्याबळ वाढविले आहे. राजे ठरवतील तेच या बँकेत होणार आहे.


सातारा जिल्हा बँकेच्या निवडणूकीत 11 जागा बिनविरोध झाल्या त्यामध्ये तीन जण भाजपाचे होते तर उर्वरीत 8 जण राष्ट्रवादीचे होते. प्रामुख्याने आ.मकरंद पाटील, शिवरूपराजे खर्डेकर, लहू जाधव, सुरेश सावंत, ना.रामराजे नाईक निंबाळकर, दत्तानाना ढमाळ, नितीन पाटील, राजेंद्र राजापुरे हे राष्ट्रवादीचे आहेत तर बँकेचे विद्यमान चेअरमन  आ.शिवेंद्रराजे भोसले, श्री.छ.खा.उदयनराजे भोसले, अनिल देसाई हे भाजपाचे असून ज्या दहा जागांसाठी निवडणूक पार पडली यामध्ये अटीतटीचा सामना पार पडला. यामध्ये कराड मधून सहकारमंत्री बाळासाहेब पाटील (राष्ट्रवादी), महिला प्रतिनिधी ऋतुजा पाटील-वाठारकर तर पाटणमधून सत्यजित पाटणकर हे राष्ट्रवादीचे निवडूण आले. तर उर्वरीत माण मधून शेखर गोरे (शिवसेना) हे चिठ्ठीवर विजयी झाले. त्याच पद्धतीने कोरेगांव मधून सुनिल खत्री हेही चिठ्ठीवर निवडूण आले. जावलीमधून आ.शशिकांत शिंदे यांचा पराभव करून केवळ एक मताने निवडूण आलेले ज्ञानदेव रांजणे हे राष्ट्रवादीचे असले तरी आ. शिवेंद्रराजे यांचे समर्थक आहेत. खटावमधून माजी आमदार प्रभाकर घार्गे हे राष्ट्रवादीचे म्हणून ओळखले जातात मात्र त्यांनीही बंडखोरी करून निवडणूक जिंकलेली आहे. तर नागरी बँकामधून रामराव लेंभे (राष्ट्रवादी) आणि इतर मागास प्रवर्गामधून प्रदिप विधाते व कांचन साळुंखे या ही शिवेंद्रराजेंच्या समर्थक असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आ.शिवेंद्रराजे भोसले बँकेचे पुन्हा चेअरमन होणार की शरद पवार भाकरी फिरवणार यावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.


भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी आज शिवेंद्रराजे भाजपबरोबर आहेत. असे सांगत ज्ञानदेव रांजणेंचा घरी जाऊन सत्कार केला. तर शेखर गोरे व निल खत्री यांच्याशी संपर्क साधण्याचाही प्रयत्न केल्याने राज्यातील आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेली बँक म्हणून सातारा बँकेकडे पाहिले जाते. त्या बँकेचा अध्यक्ष हा भाजपचा असावा असा प्रयत्न करताना दिसून येत आहेत. राष्ट्रवादीचे संख्याबळ जास्त असले तरी डावपेचात आणि निवडणूकीच्या केंद्रस्थानी आ. शिवेंद्रराजे भोसले हेच राहिले होते. त्यामुळे बँकेचा अध्यक्ष भाजपचा होणार की राष्ट्रवादीचा याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.