शिवाजी विद्यापीठाचा स्टार,साताऱ्याच्या वीर अविनाश टकले

अविनाश टकले सातारा जिल्हयातील असामान्य गुणवत्तेचा अष्टपैलू खेळाडू,ग्राउंड परफॉर्मन्स कायमच त्याच्या बाजूने राहिला परंतु मोठी संधी सतत हुलकावणी देत राहिली.

शिवाजी विद्यापीठाचा स्टार,साताऱ्याच्या वीर अविनाश टकले
शिवाजी विद्यापीठाचा स्टार,साताऱ्याच्या वीर अविनाश टकले

अनिल कदम/उंब्रज

एकेकाळी शिवाजी विद्यापीठाचा स्टार,साताऱ्याच्या वीर असणारा अवि कोल्हापुरात साताऱ्याची खरी ओळख निर्माण करणारा खरा क्रिकेट दूत आहे.जेमतेम उंची,उत्कृष्ट पदलालित्य,गोरा वर्ण आणि मैदानावर सर्वत्र फटके मारण्यात पटाईत असणारी फलंदाजी, संघाला आवश्यक त्यावेळी आपल्या कटर्स माऱ्याने हमखास विकेट मिळवून देणारी गोलंदाजी.अशा या सर्वगुणसंपन्न अष्टपैलू खेळाडूचे नाव आहे अविनाश टकले, इंग्लंडच्या विद्यापीठ संघविरुद्ध खेळणारा,धनंजय गाडगीळ महाविद्यालयाला मानाची ट्रॉफी आपल्या कल्पक नेतृत्वाखाली जिंकून देणारा खेळाडू तसेच संघ संकटात सापडला असताना आपल्या अष्टपैलू खेळाने हमखास यश मिळवून देणारा खेळाडू म्हणून सातारा जिल्ह्यातील क्रिकेट विश्वात अविनाश टकले हे नाव खूप आदराने घ्यावे लागते.अत्युच्च दर्जाचे क्रिकेट खेळण्याऱ्या या खेळाडूला रणजी ट्रॉफी संघात गुणवत्ता असूनही संधी का नाही मिळाली हा जिल्हावासीयांना पडलेले एक न उलगडणारे कोडे आहे.


९ नोव्हेंबर १९७० साली जन्म झालेल्या या प्रतिभावंत खेळाडुचे प्राथमिक शिक्षण महात्मा गांधी विद्यालय उंब्रज येथे झाले होते.वडील सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उंब्रज शाखेत शाखाप्रमुख असल्याने जिल्हयातील वेगवेगळ्या ठिकाणी बदली होत असत,५ वी व ६ वीचे शिक्षण उंब्रज येथे तर ७ वी ते १० वी पर्यंतचे शिक्षण न्यू  इंग्लिश स्कुल सातारा येथे झाले होते.महाविद्यालयीन शिक्षण धनंजयराव गाडगीळ कॉलेज मध्ये पूर्ण झाले असून,शिवाजी विद्यापीठाची मानाची ट्रॉफी सोलापूर सारख्या बलाढ्य संघाला नमवून डी.जी.कॉलेजला मिळवून देण्यात अविनाशचे कल्पक नेतृत्व कामी आले  होते.यावेळी कॉलेज व प्राध्यापक विलास गवळी यांनी केलेले मार्गदर्शन व सहकार्य तत्कालीन सर्वच खेळाडूंच्या चिरकाल स्मरणात राहीले आहे.


बालपणापासून खेळाची आवड असणारा अविनाशचे वडील स्वता एक उत्तम क्रिकेट खेळाडू होते.साताररोड येथे असताना शरद पानसे सर व चंदू बोर्डे सर यांचा एक क्रिकेट क्लब होता.अविनाशच्या क्रिकेट खेळातील जडणघडण दहावी नंतर गतिमान झाली आणि पाहिले गुरू होते शरद पानसे सर यांनी अविनाशला क्रिकेटची बाराखडी शिकवून पाया मजबूत केला होता.दररोजच्या सरावात हेमंत गुजर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले होते.तर प्रवीण कळकुंभे या सिनियर मित्राची साथ आणि मार्गदर्शन फार मोलाचे ठरले होते.तसेच राजू जाधव यांचे आक्रमक मार्गदर्शन लाभले होते.


अविनाश च्या क्रिकेट कारकीर्दीकडे पाहताना त्याने केलेली सर्वोत्कृष्ट खेळी म्हणजे ग्वाल्हेर येथे शिवाजी युनिव्हर्सिटी टीम मधून खेळताना संघाची अवस्था ५ बाद ३० होती. त्यानंतर ४ थ्या नंबरवर फलंदाजीला येऊन ३२ बॉल मध्ये नाबाद ८६ धावा व २ विकेट घेतल्या आणि या कामगिरीमुळे मुळे अविनाशची भारतीय युनिव्हर्सिटी संघामध्ये निवड झाली. तसेच फायनल मध्ये बडोदा विद्यापीठ विरुद्ध शतक झळकावत १०२ धावा केल्या होत्या.


अविनाशच्या आयुष्यातील खास घटना म्हणजे भारतीय विद्यापीठ संघातून खेळताना इंग्लंडविरुद्ध डॉमिनिक कोर्क व लेग स्पिनर इयान सलसबरी यांची बोलिंग खेळायला मिळाल्याची वेगळा आनंद आणि अनुभव होता,दुर्दैव म्हणजे इंग्लंड संघाचे हे दोन्ही खेळाडू काही काळानंतर इंग्लंडच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघात प्रमुख गोलंदाज म्हणून नावारूपाला आले.परंतु अफाट गुणवता अंगी भरलेल्या अविनाशला साधी रणजी ट्रॉफी साठी सुद्धा निवड होताना कायम वेटिंगवरच राहावे लागले.


आपल्या अनेक वर्षाच्या कारकिर्दीत अविनाशने  फलंदाजी आणि गोलंदाजी करताना नेहमीच संघ हिताला महत्त्व दिले होते.मग तो संघ विजी ट्रॉफीचा असो जिल्ह्यचा असो अथवा कॉलेजचा असो !!... अविनाश हा केवळ तडाखेबाज शैलीदार फलंदाजच नव्हता तर त्याच्याकडे एक नजाकत होती, एक लय होती. समोरच्याला कुठलीही दया माया न दाखवता तो त्याला उखळात कुटून काढायचा...आणि धावा लुटायचा मला त्याची सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे  त्याची धावांची भूक आणि सातत्यपूर्ण कामगिरी.समशेर बरसली नाही तर त्याचा विळा करून तो धावांचे गवत काढत बसला नाही !!तर संघाला गरज असेल तेव्हा बॅट समान समशेर कायमच प्रतिस्पर्धी संघावर बरसला होती.

भारतीय युनिव्हर्सिटी संघ विरुद्ध ब्रिटिश युनिव्हर्सिटी संघा दरम्यान झालेल्या सामन्यात इंग्लिश खेळाडूंबरोबर दोन हात करणारा साताऱ्यातील तो पहिला क्रिकेट खेळाडू,डोमनिक कोर्क व इयन सलासबरी यांना धीराने तोंड देणारा पहिला सातारकर फलंदाज होता ! गोवा तसेच महाराष्ट्र रणजी संघात स्थान न मिळालेल्या कमनशिबी खेळाडूंच्या यादीत अविनाशचे नाव खूप वरच्या पातळीवर येते,तो स्कोअरबोर्डकडे न बघता कायम खेळतच राहिला.ग्रामीण भागातील या खेळाडूचे क्रिकेट प्रेम हे  अलौकिक होते विक्रमांसाठी  तो खेळालाच नाही म्हणून त्याचे क्रिकेट सच्चे होते.

मान सन्मान खूप मिळाले

उत्कृष्ट क्रिकेटपटू १९९१/९२ सालच्या "मुन्शी प्राईज" (उत्कृष्ट फलंदाज) साठी शिवाजी विद्यापीठच्या वतीने तत्कालीन क्रिकेट खेळाडू अविनाश टकले यांची निवड झाली होती.यावेळी सदरचे बक्षीस "आवार्डिंग कलर्स" मोठया दिमाखदार समारंभावेळी प्रदान करण्यात आले होते.भारताच्या विद्यापीठ संघातून इंग्लंड विद्यापीठ संघाविरुद्ध खेळणारा अविनाश टकले हा एकमेव सातारकर खेळाडू आहे.


रथी महारथीच्या सहवासात 

सुनील जोशी,अनिल कुंबळे,मोहम्मद अझरउद्दीन अशा क्रिकेट विश्वातील दिगंजाच्या बरोबर खेळलेला अवी बंगलोरच्या संस्थानिक स्पर्धेत कोल्हापूरच्या संस्थानाकडून  खेळल्याचे फार कमी जणांना माहीत असेल परंतु कोल्हापूर संस्थानाच्या टीम मधून बेंगलोर आणि सांडूर येथील महाराजांच्या संस्थानिक टीममध्ये क्रिकेटची जुगलबंदी रंगत असत यामध्ये नामांकित आणि दादा खेळाडू सहभागी होत होते.
--------
सुनील पानसे सर,नरेंद्र पंडित,सुनील गाडेकर,हेमंत गुजर,राजू जाधव,प्रवीण कळकुंभे तसेच सिटी जिमखाना सातारा जिमखाना,टी सी सी,स्टार क्रिकेट क्लब आणि सर्व आजी माजी खेळाडूंनी गेल्या ३० वर्षात अलोट प्रेम दिले.या सर्वांच्या सहकार्याने जे काही क्रिकेट मी खेळू शकलो अनेक चांगले वाईट अनुभव आले,परंतु पराभवाने खचलो नाही आणि यश मिळाले म्हणून हुरळून गेलो नाही.यामुळे सध्या मुलांना क्रिकेटचे धडे देत असून शक्य आहे तो पर्यत क्रिकेटची सेवा करण्याचे व्रत हाती घेतले आहे.

अविनाश टकले
माजी VIGI ट्रॉफी खेळाडू.