'मुकद्दर का सिकंदर' राजा जाधव

'मुकद्दर का सिकंदर' राजा जाधव

'मुकद्दर का सिकंदर' राजा जाधव

अनिल कदम / उंब्रज

(भाग १ )

क्रिकेटचा सामना एक हाती जिंकून देण्याची किमया एकदा नव्हे तर अनेकदा करून दाखवण्याची जिगर बाळगणारा क्रिकेटर मी पाहिलाय.जगाच्या क्रिकेट इतिहासात असे मोजकेच दिग्गज खेळाडू आहेत. पण सातारा जिल्ह्याच्या क्रिकेट विश्वाचा इतिहास लिहायचे ठरवले तर अग्रपूजेचा मान मी देईन तो राजू जाधव यालाच. तो नावाप्रमाणे 'राजा' आहे क्रिकेटचा. अशक्य ते शक्य करतो तेही 'विनासायास' असंच त्याचे वर्णन करायला लागेल

क्रिकेट सारख्या बेभरवशी खेळात एकहाती सामना जिंकून देण्याची ताकद त्यांनी खूप दाखवून दिले आहे. मग स्फोटक फलंदाजी असो अथवा फलंदाजांची 'फिरकी' घेणारी गोलंदाजी असो, या जोडीला अप्रतिम, दक्ष क्षेत्ररक्षणाची चमकही. त्याने अनेकदा दाखवली आहे कव्हर पॉइंटला त्याचा वावर 'पॅंथर' प्रमाणे असतो.सावजा सारखी शिकार करताना 'जी' नजर लागते ती त्याच्याकडे आहे. सावज टप्प्यात आले की डोळ्याबरोबर त्याचे हात, पाय काम करतात.मग तो रनआउट असो की अशक्यप्राय झेल 'राजा'टिपणारच.

क्रिकेटच्या तिन्ही अंगात तो 'मास्टर' आहे. त्याचे फलंदाजीचे तंत्र 'कॉपीबुक' नसेल.तो शैलीदार जरी वाटत नसेल कदाचित.पण तो विक्रमवीर योद्धा आहे, गोलंदाजी ही काही अपवाद वगळता फोडून काढण्यासाठीच असते याच्यावर त्याचा विश्वास आहे मग तो गोलंदाज कोण आहे? कसा आहे ! या प्रश्नाचे उत्तर शोधायला त्याला वेळच नसतो. सध्याच्या फास्टफूडच्या जमान्यातली 'इन्स्टंट'ची केमिस्ट्री त्याच्या फलंदाजी दिसते.

तीक्ष्ण नजर लाभलेला हा 'राजा' माणूस चेंडूलाही दयामाया न दाखवता मैदानाबाहेर जाण्यासाठी 'तडीपारीचा' आदेश बजावतो. मैदानावरची एकही ही जागा अशी नसेल तेथून राजू चौकार-षटकार वसूल केला नसेल.

तेज गोलंदाजांना खेळताना हेल्मेट सोडा,साधी कॅपही घालत नाही.फिरकी गोलंदाजांनाही तोच नाचवतो. त्याची फलंदाजीतील हुकूमत सर व्हीव्हीयन रिचर्ड्स सारखी आहे. म्हणूनच खेळताना तो 'मुकद्दर का सिकंदर' वाटतो. क्रिकेटचे सर्व फटके तो लीलया खेळतो.पण त्याचे काही फटके 'मिडास'टच सारखे असतात. 'हात लावीन तेथे सोने काढिन' असा मिडास टच. त्याला खास 'राज'टच लागतो परीसारखा.


दोन चार पावलांचा निवांत स्टार्ट घेऊन टाकलेले त्यांचे ऑफब्रेक मधूनच 'तुफान' वेगाने फलंदाजाकडे झेपावतात.लेगस्पिन,गुगली यांचे वरदानही लाभलंय. मी मी म्हणणारे दादा खेळाडूंना त्याने मामा बनवले आहे. आणि त्याची भंबेरी उडालेली आम्ही पाहिली आहे. त्याचा 'गोल्डन आर्म' किती लाख मोलाचा आहे याचा अनुभव त्याचा सामना करणाऱ्या बरोबरच त्याच्या समवेत खेळणारांनी घेतलाय.त्याच्यासारखा खेळाडू संघात असला की कोणत्याही संघाने दिग्विजयी थाटात खेळत विजेतेपदाची स्वप्ने खुशाल पहावीत.

राजुचा हा थक्क करणारा प्रवास वाटतो तेवढा सोपा नाही. 'सम्राट' होण्यासाठी तो आधी लढवय्या सैनिक असावा लागतो.त्याचे शालेय शिक्षण सयाजीराव हायस्कूलमध्ये झाले, तर कॉलेज शिक्षण डी.जी. कॉलेजमध्ये झाले. लहानपणापासून त्याला क्रिकेट आणि फुटबॉलची आवड होती.१९८२ मध्ये त्याची जिल्हा ज्युनिअर संघात निवड झाली,तो उपकर्णधार ही झाला.जूनियर पाठोपाठ पहिल्याच वर्षी सीनियर संघातही निवड झाली १९८५-८६ साली शिवाजी विद्यापीठ संघात निवड झाल्यानंतर तो सलग तीन वर्षे आंतरविद्यापीठ स्पर्धेत चमकला.८७-८८ साली विद्यापीठ संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. परंतु क्रिकेट वर्ल्डकपमुळे स्पर्धाच रद्द झाली. विद्यापीठा संघाकडून खेळताना राजा जाधव याने जयपूर येथे गुजरात विरुद्ध केलेली खेळी आजही अनेकांच्या स्मरणात आहे शेवटच्या सात षटकात ७५ धावांची गरज असताना, राजूने झंजावती फलंदाजी करत ८८ धावांची खेळी केली होती.आणि नरेंद्र पंडित ३० धावा केल्या होत्या. खरंतर राजा जाधवने 'टी-ट्वेंटी' स्पर्धेची सुरुवात तेव्हाच केली होती.आणि आक्रमकतेला अधिक धार आली होती

राजूने नंतर ट्रिपल क्राऊन क्रिकेट क्लब स्थापन केला.त्या संघात शेखर पवार,युवराज जाधव,प्रशांत शहा,उदय मोहिते रियाजखान,प्रमोद कुरलेकर,भालचंद्र निकम,केतन दोशी, जयदीप महाजनी,प्रमोद जाधव,दीपक जाधव,गिरीश गाढवे असे दादा खेळाडू होते. 'टीसीसी' आणि 'राजू जाधव' यांच्यामधील नाते आजही घट्ट आहे "टीसीसी म्हणजे राजू जाधव आणि राजू जाधव म्हणजे टीसीसी"समीकरणच तयार झाले होते आणि हा अलिखित नियम सातारा जिल्ह्यातील क्रिकेट विश्वात बनून गेला.

सुप्रसिद्ध कोच कमल भंडारकर यांच्याकडे एक महिना पुणे येथे प्रशिक्षण घेण्याचा योग राजू जाधव व शेखर पवार यांना मिळाला.त्यावेळी रणजी ट्रॉफी प्लेयर श्रीकांत कल्याणी, मकरंद दीक्षित, सुनील गुदगे, प्रसाद कानडे, भूपेंद्र शर्मा, सुनंदन लेले, संजय कोढवळकर यांच्याबरोबर खेळण्याची संधी मिळाली.फिरकी गोलंदाज प्रदीप इंगळे यांच्याकडून ऑफस्पिन बरोबरच लेगस्पिन व गुगली ची कला अवगत करता आली.एका सराव सामन्यात याच गुगलीने कल्याणी व शर्मा यांच्या दांडया गुल केल्या होत्या. ती कला पाहून भांडारकर सरांनी राजाला पूना क्लब कडून खेळण्याची ऑफर दिली होती. परंतु पुण्यात जाऊन क्रिकेट खेळणे तत्कालीन परिस्थिती मुळे शक्य झाले नाही.

हेमंत गुजर यांचा माझ्या जडणघडणीत मोठा वाटा आहे. असे राजू नम्रपणे सांगतो,मार्गदर्शक आणि मित्र म्हणून त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे असेही तो सांगतो दिवंगत शरद पानसे, सुधाकर शानबाग, अफजल पठाण, सुनील गाडेकर ,नरेंद्र पंडित आधी खेळाडूंचा त्याने आवर्जून उल्लेख केला. तसेच पत्रकार शरद महाजन अण्णा यांनाही तो गुरुस्थानी मानतो.

सुवर्णकन्या नंदा जाधव कडून बरेच काही शिकला, यशासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागतात हा सल्लाही नंदाने दिला.शिस्त आणि सर्वस्व अर्पण करायची वृत्तीही त्याने कायम जोपासली.या शिस्ती पोटी प्रशांत शहा आणि प्रमोद जाधव यांना संघाबाहेर ठेवण्याचे धाडस त्यांने केले. त्याचबरोबर प्रशांत, प्रमोद,केतन यांची गोलंदाजी खेळण्याची संधी मिळाली नाही याची खंतही व्यक्त करतो.

सातारा जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या निवड समितीवर तो आहे.साताऱ्यात चांगले क्रिकेटर आहेत,परंतु मैदाना अभावी त्यांना खेळण्याची संधी मिळत नाही. याचे त्याला दुःख आहे. आता राजू वयाच्या ५७ व्या वर्षातही फिट असून, तो वरिष्ठ क्रिकेट संघात सातारा जिल्हा संघाकडून खेळतो.या संघाने सलग तीन वर्ष ही स्पर्धा जिंकली आहे. प्रशांत शहा, इर्शाद बागवान, प्रमोद जाधव, युवराज जाधव, धनंजय जाधव ,सतीश कोटील, शिवाजी वेलणकर, विनोद वांद्रे, भालचंद्र निकम, रमेश पाटील हे त्याचे संघ सहकारी आहेत

सेवानिवृत्तीनंतर नवोदित खेळाडूंना मार्गदर्शन करण्याची त्याची इच्छा आहे.कारण अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून तो यशापर्यंत पोचला आहे.'दात आहेत तर चणे नाहीत, चणे आहेत तर दात नाहीत' ही परिस्थिती त्याने अनुभवलीय.आर्थिक पाठबळ नाही, गॉडफादर नाही, असे असतानाही संपूर्ण महाराष्ट्र गाजवणारा हा 'शेर' आहे क्रिकेटच्या मैदानावर आणि मैदानाबाहेर 'राजा' आहे

राजाची ऐट राजाला शोभुन दिसते. त्याची मैदानावरच्या एन्ट्री तोच रुबाब आणि शतक किंवा विजय मिळवून मैदानावर परत येतानाही तीच एट. कॉलर उडवत,बॅट उंचावत त्याच्या चाहत्यांना वंदन करणारी राजाची मूर्ती आम्ही खूपदा अनुभवलीय. म्हणून खऱ्या अर्थाने तो 'मुकद्दर का सिकंदर' आहे

(शरद महाजनी आण्णा यांच्या नजरेच्या लेखणीतून)