इनस्विंग गोलंदाजीचा बादशहा ,सातारकर योगेश उर्फ केतन दोशी

इनस्विंग गोलंदाजीचा बादशहा ,सातारकर योगेश उर्फ केतन दोशी

अनिल कदम/उंब्रज

 

०२ मे १९७२ रोजी जन्मलेला केतन दोशी सातारा येथील रामाच्या गोटात लहानाचा मोठा झाला.वडील नटवरलाल दोशी हे सातारा जिल्ह्यातील नामांकित पेट्रोलियम व्यावसायिक,आई गृहिणी, बहीण उच्चशिक्षित अशा सुशिक्षित आणि खेळाची आवड असणारे घरातील वातावरण,वडिलांना क्रिकेटची आवड होती.केतनचे प्राथमिक शिक्षण १ ली ते ६ वी पर्यत नर्मदा मध्ये तर ७ वी ते १० पर्यत सातारा इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये झाले होते.तर ११ व १२ वी चे शिक्षण सायन्स कॉलेज सातारा येथे घेतले असून सिव्हिल इंजिनिअरिंग के.बी.पी.कॉलेज सातारा येथून पूर्ण केले आहे.

 

बालपणापासून क्रिकेटची आवड असणारा केतन गल्ली क्रिकेटमध्ये नाव कमवू लागला,त्याचवेळी वडिलांच्या क्रिकेटच्या जाणकार नजरेने केतनच्या अंगातील उपजत क्रिकेटचे बारकावे हेरले आणि या हिऱ्याला पैलू पाडण्यासाठी टी.सी.सी.च्या राजू जाधव व प्रशांत शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करण्यासाठी स्वाधीन केले आणि सुरू झाला प्रवास व्यावसायिक आणि शिस्तबद्ध क्रिकेट खेळण्याचा ,यानंतर १९९० ते १९९६ असे सलग सहा वर्षे जिल्हा क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले होते,त्याचबरोबर १९९३/९४ च्या सीझनमध्ये कॉलेज टीम मधून खेळताना आंतरविभागीय विद्यापीठ स्पर्धेत केलेल्या कामगिरीच्या जीवावर शिवाजी विद्यापीठ संघात जलदगती गोलंदाज म्हणून निवड झाली होती.

 

जिल्हा क्रिकेट संघातून खेळताना कर्णधार नरेंद पंडित यांनी कायमच संधी उपलब्ध करून दिली होती.युनायटेड वेस्टर्न बँक ट्रॉफी ही जिल्ह्यातील एक नामांकित स्पर्धा खेळवली जात असत यामध्ये अनेक नामांकित खेळाडू सहभाग घेत होते.असाच एक सामना सातारा जिल्हा क्रिकेट संघ विरुद्ध सेंट्रल बँक पुणे होता. यावेळी पहिल्याच चेंडूवर सेंट्रल बँकेचा दिग्गज आणि नामांकित फलंदाज छोटू शर्मा याला खूप आत आलेल्या इनस्विंग चेंडूवर बाद केले या संघात रियाज बागवान,हेमंत किणीकर,जयदीप नरसे,संजय कोंढाळकर,रवी येरवडेकर असे दिग्गज आणि नामांकित रणजी ट्रॉफी खेळाडू होते.याच सामन्यानंतर केतनचे नाव पुण्यातील क्रिकेट विश्वात घुमू लागले याची सुरुवात झाली ती छत्रपती शाहू स्टेडियम सातारा येथे.आणि केतन दोशी हे नाव महाराष्ट्रातील क्रिकेट विश्वाला माहीत करून देणारे माध्यम होते युनायटेड वेस्टर्न बँक ट्रॉफी.

 

केतन अप्रतिम गोलंदाजीच्या बळावर जिल्ह्यात नावलौकिक मिळवत असताना नरेंद्र पंडित यांनी त्याला पुण्यातील शर्मा इलेव्हन क्लब कडून क्रिकेट खेळायची संधी निर्माण करून दिली यावेळी केतनचा पुण्यात शर्मा इलेव्हन संघाचा नवीन चेंडूचा अप्रतिम फास्ट गोलंदाज म्हणून दबदबा होता आणि प्रथिष्टेची समजली जाणाऱ्या निमंत्रित साखळी लीग मध्ये सलग दोन सिझन ५०-५० विकेट घेत आपली उपयुक्तता सिद्ध केली होती.प्रत्येक सिझनला धारदार गोलंदाजी करत महाराष्ट्र रणजी क्रिकेट संघासाठी आपली पात्रता केतनने दाखवून दिली होती.

 

पुण्यातील जबरदस्त कामगिरीच्या बळावर केतन महाराष्ट्र संघात निवडला गेला पहिलाच सामना बलाढ्य बडोदा संघाबरोबर पुण्यातील नेहरू स्टेडियमवर होता.या सामन्यात भारतीय कसोटी संघात खेळलेले नयन मोंगिया,किरण मोरे,अतुल बेदाडे असे रथी महारथी होते, पहिलाच एकदिवसीय रणजी सामना खेळणाऱ्या केतनने भन्नाट आणि अप्रतिम गोलंदाजी करत १० षटके गोलंदाजी करत ३१ धवांच्या मोबदल्यात ५ विकेट घेतल्या होत्या आणि या पदार्पणाच्या सामन्यात क्रिकेट विश्वात खळबळ उडवून दिली होती.यानंतर सौराष्ट्र संघा विरुद्ध सामन्यात सुद्धा केतन याने उठावदार कामगिरी केली होती.

 

अफझल पठाण यांच्यानंतर सातारा जिल्ह्यातील जलदगती गोलंदाजीचा वारसा योगेश उर्फ केतन दोशी याने जपला होता.उजव्या हाताने भन्नाट इनस्विंग गोलंदाजीत माहीर असणाऱ्या या गोलंदाजाला  खेळताना भल्या भल्या फलंदाजांना कठीण जात होते.नवीन चेंडूचा पहिला स्पेल खेळताना आत येणाऱ्या चेंडूवर अनेकांच्या दांड्या गुल होत होत्या तर काहीजण पायचीत होऊन बाद होत होते,इन स्विंग न होता सरळ जाणारा चेंडू हे योगेशच्या भात्यातील एक प्रभावी अस्त्र होते त्याच बरोबर फलंदाजीतही अनेकवेळा त्याने प्रभाव दाखवला होता.

 

अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेतलेला केतन मजबूत शरीरयष्टीचा तसेच ताडमाड उंचीचा खेळाडू,बघता क्षणी फलंदाजांच्या उरात धडकी भरेल असा रणअप दोन स्लिप,विकेटकीपर प्रमोद कुरलेकर आणि पॉईंटला राजू जाधव दुसऱ्या एंडला मुन्ना मोहिते बॉलिंगला आणि चिअर अप करण्यासाठी युवराज जाधव,गिरीश गाढवे असे सहकारी खेळाडू क्लब क्रिकेट मध्ये योगेशला लाभले,तसेच अजय गुजर या डावखुऱ्या मध्यम गती गोलंदाजा बरोबर मैत्रीचे बंध जुळले होते.वडिलांना क्रिकेटची आवड असल्याने हमखास मॅच वेळी स्टेडियम वर हजर असणार आणि सहकारी अथवा विरुद्ध टीमच्या खेळाडूला योगेशच्या गोलंदाजीबाबत अभिप्राय विचारणार असा नित्यक्रम यामुळे योगेशच्या क्रिकेट आवडीला कुटुंबातुनच पाठिंबा मिळत होता.

 

ट्रिपल क्राऊन क्रिकेट क्लब सातारा कडून क्रिकेट खेळताना राजू जाधव (जिल्ह्यातील दादा खेळाडू याबाबत आपण व्यक्तिगत लिहणारच आहे) या मास्टर खेळाडूच्या देखरेखीखाली तयार झालेल्या या गुणवान खेळाडूला मौलिक मार्गदर्शन मिळाले जयदीप महाजनी, प्रशांत शहा,प्रमोद जाधव अशा जिल्ह्यातील क्रिकेट विश्वातील मातब्बर खेळाडूंच्या सानिध्यात आणि मार्गदर्शनाखाली योगेशची प्रगती उत्तरोत्तर बहरत गेली,अचूक टप्पा,धिप्पाड शरीर यष्टी आणि गोलंदाजी करताना कानामागून वेगात फिरणारा हात यामुळे चेंडूची सिम फलंदाजाला कायम बुचकळ्यात टाकायची हेच योगेशच्या यशाचे गमक होते.सातारा जिमखाना, सिटी जिमखाना,अशा वेगवेगळ्या क्रिकेट क्लब बरोबर तसेच जिल्ह्यातील सर्वच खेळाडूंबरोबर केतनचे मैत्रीपूर्ण संबध आजही पूर्वीइतके आहेत.

 

प्रथनश्रेणी क्रिकेट मधील कामगिरी

प्रथमश्रेणी क्रिकेट मधील ८ सामन्यांची छोटीशी परंतु नजरेत भरणारी कामगिरी केतनने केलेली आहे.केतन दोशी याने प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये १ सामना खेळला असून यामध्ये ३० षटके गोलंदाजी करताना ६९ धावांच्या बदल्यात २ विकेट ही सर्वोत्तम कामगिरी आहे.तर 'अ' श्रेणीचे ७ सामने खेळले असून ५९ षटके गोलंदाजी करताना ११ विकेट घेतल्या आहेत, ३१ धावात ५ विकेट ही सर्वोत्तम कामगिरी आहे.

 

कौटुंबिक कारणाने थांबलो..!

वडील नटवरलाल दोशी यांच्या प्रकृतीच्या अडचणी आणि व्यवसायाचा वाढलेला भार अशा द्विधा मनस्थितीत केतनच्या मनाची घालमेल होऊन शेवटी १९९६ मध्ये व्यावसायिक क्रिकेटला मुरड घालून वडिलांच्या व्यवसायात लक्ष केंद्रित केले.यामध्ये वडिलांनी विणलेले पेट्रोलियम व्यवसायाचे जाळे काहीशा नाईलाजाने स्वीकारावे लागले ऐन बहरातील क्रिकेट कारकीर्द कौटुंबिक अडचणीमुळे आटोपती घ्यावी लागली आणि क्रिकेटचा डाव अर्ध्यावरच सोडला परंतु सध्या व्यवसायात स्थिरस्थावर झालो असल्याने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सिलेक्टर म्हणून जबाबदारी पार पाडत असून अजय शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली रियाज बागवान,व सुधाकर शानभाग यांच्या सोबतीने क्रिकेटची सेकंड इनिंग सुरू आहे.आयुष्यातील क्रिकेट खेळण्याचे स्वप्न आई वडिलांच्या पुण्याईने पूर्ण करता आली तसेच पत्नी आणि बहीण, भाऊजी आणि मित्रांनी कठीण प्रसंगी कायमच पाठबळ दिले यामुळे चाळीशी नंतरचे जीवन सुखद आहे, मुलगी निमिशा आणि मुलगा सिद्धांत हे महाराष्ट्र क्रिकेट संघातून अंडर १४/१६/१९  खेळले आहेत अपुऱ्या राहिलेल्या इच्छा आकांशा मुलांच्या स्वरूपात निश्चितच पूर्ण होतील.

योगेश उर्फ केतन दोशी

महाराष्ट्र रणजी खेळाडू,सदस्य एम.सी.ए. क्रिकेट निवड समिती सदस्य