शुगर ४००,राहायला भाड्याचे घर सोबतीला २५ वर्षांचा 'सामना'

शिवसेनेच्या ज्वलंत विचारांनी भारावलेल्या युवकाची जीवनगाथा

शुगर ४००,राहायला भाड्याचे घर सोबतीला २५ वर्षांचा 'सामना'
शुगर ४००,राहायला भाड्याचे घर सोबतीला २५ वर्षांचा 'सामना'

उंब्रज/प्रतिनिधी

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर हिंदुत्ववादी विचारांनी प्रेरित होऊन अनेक युवकांनी घरादारावर तुळशीपत्र ठेऊन शिवसेनेचा भगवा हातात धरला,यापैकीच एक असणारे मूळचे विरवडे गावचे रहिवाशी आणि गेली अनेक वर्षे उंब्रज ता.कराड येथे लेडीज टेलर म्हणून कार्यरत असणारे कट्टर शिवसैनिक महेश पाटील १९८८ साली दहावीची परीक्षा देत असताना दै.सामना वाचण्याची आवड निर्माण झाली आणि साहेबांच्या विचाराने प्रभावित होऊन शिवसेनेच्या कार्याला जुंपून घेतले.अशी ही कट्टर शिवसैनिकाची कहाणी खरतर सध्याच्या युगात पक्षनिष्ठा त्याग बलिदान आणि समर्पण या फक्त भाषणातच राहिल्या असून पाटील यांच्या रूपाने सेनेची पाळेमुळे किती खोलवर रुजली आहेत याचीच प्रचिती येते.शुगर ४००,राहायला भाड्याचे घर सोबतीला २५ वर्षांचा 'सामनाअशी परिस्थिती असताना' शिवसेनेच्या ज्वलंत विचारांनी भारावलेल्या युवकाची जीवनगाथाच शब्दबद्ध करताना क्षणभर लिहिणारा हातही थरथरत होता.

 

शिवसैनिक महेश पाटील यांनी दै.सामनाच्या १९९० पासूनच्या अंकांची ठेवण अतिशय उत्तम पद्धतीने केली आहे भाड्याच्या घरात राहत असल्याने सहा वेळा घरांची बदलाबदली करताना काही अंकांना झळ लागली याचे दुःख आजही पाटील यांना बोचते. अनेकांनी पीएचडी करण्यासाठी संग्रहित अंकांचा वापर केला काहीजण अगदी दोन दोन दिवस मुक्कामी राहून गेले काहींनी पेपर ठेवण्यासाठी मोठ्या मनाने मदत करीत लोखंडी कपाट बनवून दिले पण जीवनाच्या गरजा अनंत असतात वयाची पन्नाशी गाठल्यावर विविध शारीरिक आजार डोके वर काढू लागल्याने शरीरातील साखरेचे प्रमाण ४०० पार करून पुढे गेले कामाच्या व्यापात दिवसातून एकवेळ जेवण पक्षाचे काम करीत असताना कुटुंबाला वेळ देता येत नाही यामुळे तरुणवयात बायकापोरे शिक्षणानिमित्त पुण्यात स्थायिक झाले मात्र पस्तीस वर्षे प्रामाणिकपणे पक्षाचे काम केल्यानंतर जिल्ह्यातून महेश पाटील यांचाही पाय निघत नसल्याने कुटुंब पुण्यात स्थिरस्थावर झाले.उंब्रज परिसरात भाड्याचे घर आणि तोकडे उत्पन्न परंतु मोडेन पण वाकणार नाही शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण असल्याने लाचारी पत्करून जीवन जगण्याची पद्धत आम्हाला माहीत नाही यामुळे येईल त्या प्रसंगाला तोंड देत कार्य करीतच राहणार या भूमिकेवर महेश पाटील ठाम आहेत.

 

टेलरिंगचे काम

 

शिवसैनिक महेश पाटील हे उंब्रज या गावी महिला टेलर म्हणून कार्यरत आहेत.प्रामाणिक सेवा बाजवून इमाने इतमारे आपला उदरनिर्वाह करीत असतात परंतु पक्षाचे कार्यक्रम असतील त्यावेळी आपले टेलरिंगचे दुकान बंद ठेऊन सश्रम हजेरी लावतात.महापूर,आरोग्य शिबीर यामध्ये विना अन्नपाण्याची भटकंती करून लोकांना सेवा देण्यासाठी अखंडित तळमळत असतात महापुराच्या काळात सांगली जिल्ह्यातील खेडोपाडी मदत पोचवणे असेल अथवा कोरोना काळात ना.एकनाथ शिंदे व खा.श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून आरोग्य किट वाटप कार्यक्रमात हिरीरीने सहभाग घेऊन मदत शेवटच्या घटकापर्यंत पोचवली आहे.

 

वाढदिवसाच्या फोनचे बिल

 

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना २३ जानेवारी २००६ रोजी वाढदिवसानिमित्त केलेल्या फोनचे बिल प्लॅस्टिकच्या कागदात आजही मोठ्या अभिमानाने खिशात जपून ठेवले आहे.तसेच अयोध्या येथील राममंदिराला दोन वेळा जाण्याचा योग आला असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले शिवसेनाप्रमुख हयात असताना महाराष्ट्रातील विविध भागांतील वीस सभा ऐकण्याचा योग आला होता 

 

पुस्तकात नोंद

 

डॉ.राधेश्याम जाधव लिखित वाघाच्या पाऊलखुणा या उद्धव ठाकरे यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकात शिवसैनिक महेश पाटील यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला असून खा.संजय राऊत यांनी प्रत्यक्ष मुंबईत भेटीला बोलावून दै.सामनाचे अंक जतन केल्याबाबत कौतुक केले होते. 

 

आणि कराड मध्येच थांबलो

 

२०१७ साली पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांची शेतकरी संवाद दौऱ्यानिमित्त कराडला सभा होती यावेळी माझे कुटुंब पुण्याला राहण्यासाठी गेले होते उन्हाळी सुट्टी संपली की मी ही पुण्याला स्थायिक होण्यासाठी जाणार होते पण ओगलेवाडी येथील भेटीची जबाबदारी असल्याने आणि शिवसेनेच्या कराड तालुक्यातील कार्यात गुंतवून घेतल्याने शेवटी कुटुंबाकडे आजअखेर दुर्लक्ष झाले कधीतरी भेटायला जायचा योग येतो पण आता सातारा जिल्ह्यातून पाय निघत नाही 

२३ जानेवारी २०१२ रोजी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची वाढदिवसाच्या निमित्ताने रुद्राक्षांनी वजन तुला करण्यात आली होती यावेळी साहेबांचे वजन ६२ किलो होते तर २२२३४ रुद्राक्ष तराजूत बसले होते यापैकी दोन रुद्राक्ष आजही माझ्याजवळ असून, एक गळ्यात आणि दुसरा कायमच खिशात असतो.शिवसेनेच्या माध्यमातून लोकांची सेवा करण्याचे भाग्य लाभले आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याशी विशेष स्नेह राहिला अजून जीवनात काहीही मिळण्याची अपेक्षा नाही श्वास असेपर्यंत शिवसेनेचे कार्य आणि साहेबांचे विचार तळागाळातील सामान्य जनतेत कायमच पोहोचवणार आहे

महेश भगवंत पाटील

शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष

कराड तालुका समन्वयक

 

जुन्या पिढीतील कट्टर शिवसैनिक आजही पक्षप्रमुखांच्या आदेशावर काम करण्यासाठी एका पायावर तयार असतात शिवसेनेची सत्ता असताना तळागाळातील शिवसैनिकांना बळ देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न होणे गरजेचे आहे जिल्ह्यात गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई आणि महेश शिंदे असे दोन मोठे नेते असून जिल्ह्यात शिवसेनेची पाळेमुळे खोल रुजण्यासाठी ठोस कृती करण्याची गरज आहे तालुक्यातील अनेक जेष्ठ नेत्यांच्या अकाली निधनांने निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी प्रयत्न होणे क्रमप्राप्त आहे

रवींद्र हजारे

माजी उपजिल्हाअध्यक्ष युवासेना सातारा जिल्हा