अजिंक्यताऱ्याचा 'हिरा'मुंबई क्रिकेट मधील 'तारा', एम.के.म्हणजेच महेश कारंजकर

अजिंक्यताऱ्याचा 'हिरा'मुंबई क्रिकेट मधील 'तारा', एम.के.म्हणजेच महेश कारंजकर
भारतीय संघाचा सलामी फलंदाज वसीम जाफर व महेश कारंजकर समवेत सातारा जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी व जिल्ह्यातील नामवंत खेळाडू
अजिंक्यताऱ्याचा 'हिरा'मुंबई क्रिकेट मधील 'तारा', एम.के.म्हणजेच महेश कारंजकर

अनिल कदम/उंब्रज

मुंबई म्हणजे क्रिकेटच्या रत्नांची खान अनेक नामांकित खेळाडूंनी मुंबई संघातून खेळून भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.सुनील गावसकर,दिलीप वेंगसरकर, रवी शास्त्री,संजय मांजरेकर, सचिन तेंडुलकर अशी एक ना अनेक नावे घेता येतील, मुंबईकर खेळाडूंची परंतु घाटावरील साताऱ्यातील एका खेळाडूने या बलाढ्य मुंबई संघात स्थान मिळवले, टिकवले आणि कमावले सुद्धा, त्याचे नाव महेश कारंजकर,जेमतेम उंची,सावळा रंग,१२ नोव्हेंबर १९७१ साली सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेला मुलगा भारतीय फिरकी गोलंदाजीची परंपरा जपत ऑफब्रेक गोलंदाजी करत लहानाचा मोठा झाला.बघता बघता अष्टपैलू म्हणून मुंबईच्या संघात निवडला गेला सारेच कसे स्वप्नवत होते. 

महेशचे प्राथमिक म्हणजे १ ली ते १० वी पर्यतचे शिक्षण नर्मदा एज्युकेशन अकॅडमी मध्ये झाले,तर  इयत्ता ११ वी साठी सातारा येथील सायन्स कॉलेजला प्रवेश घेतला, परंतु खेळाची आवड आणि धनंजयराव गाडगीळ वाणिज्य कॉलेजला असणारी खेळाची संधी यामुळे सायन्स सोडून कॉमर्स करण्याचा निर्णय घेतला.डी.जी.कॉलेजला प्रवेश घेतला परंतु क्रिकेट खेळण्याची आवड शांत बसून देत नव्हती.यामुळे पुन्हा बारावीसाठी पुण्यातील एस.पी. कॉलेजला प्रवेश घेतला,कारण क्रिकेटची आवड आणि पुण्यातील निमंत्रित साखळी क्रिकेट स्पर्धा त्या काळी खूप प्रसिद्ध होती.अनेक नामांकित खेळाडू त्याकाळी या स्पर्धेत खेळत असत,त्यावेळी पुण्यातील अनिल वाल्हेकर यांनी महेशला महिना महिना घरी मुक्कामाला ठेऊन घेत पुण्यात क्रिकेट खेळण्यासाठी पाठिंबा दिला.तसेच शाम ओक यांच्या वडीलांनी कायमच मदतीचा हात दिला.बँक ऑफ इंडिया कडून गेस्टप्लेयर म्हणून खेळताना एल.डो.राडो कप स्पर्धा खेळण्यासाठी अहमदनगरला महेश गेला असता, या स्पर्धेची फायनल मॅच आर.सी.एफ मुंबई विरुद्ध बँक ऑफ इंडिया पुणे अशी होती त्यावेळी महेश कारंजकर यांने केलेल्या ७० धावांच्या अफलातून खेळीमुळे आर.सी.एफ ची नजर या गुणी आणि मराठमोळ्या सातारकर खेळाडूवर पडली.आणि नोकरीची संधी ऑफर केली,यावेळी प्लेयर कम जॉब आणि मुंबई सारख्या ठिकाणी महेश मुंबईमध्ये खेळाडू म्हणून रुजू झाला,आणि श्री गणेशा झाला स्पर्धेचा आणि मेहनतीचा.

आर.सी.एफ मुंबई कडून खेळताना टाईम शिल्ड 'अ' डिव्हिजन या नामांकित स्पर्धेत खेळताना पहिलाच सामना टाटा संघाबरोबर होता.पद्माकर शिवलकर, अबी कुरुविला,मिलिंद गुंजाळ,लालचंद राजपूत,शिशिर हट्टंगडी,राजू कुलकर्णी असे एकापेक्षा एक सरस खेळाडू होते, परंतु यांच्या विरुद्ध आर.सी.एफ कडून खेळताना पहिल्या इनिंग मध्ये फलंदाजी करताना ५० धावा,आणि गोलंदाजी मध्ये ५ विकेट घेतल्या, तर दुसऱ्या डावात  ६६ धावा केल्या तर ४ विकेट घेतल्या,या मॅच मध्ये दोन्ही डावात चाबूक फलंदाजी करत ११६ धावा बॅटने केल्या. तर दमदार ऑफ ब्रेक मारा करीत ९ विकेट घेतल्या,आणि महेश कारंजकर हे नाव मुंबईच्या क्रिकेट इतिहासात तसेच टाइम्स शिल्ड स्पर्धेत सतत चर्चेत राहिले,अशीच भरीव आणि सातत्य पूर्ण कामगिरी मुंबई रणजी संघाचे दरवाजे उघडे करायला कारणीभूत ठरली.यानंतर महेशची निवड मुंबई रणजी संघाच्या नेट साठी झाली. 'षटकार' चे संपादक मकरंद वायगणकर यांनी त्यावेळी केलेले मार्गदर्शन कायमच दिशादर्शक ठरले,तसेच आर.सी.एफ कडून खेळत असताना या संघाचे कोच हे बलविंदरसिंग संधू होते.त्यांनीच महेशची शिफारस मुंबई रणजी टीम साठी केली होती.कारण मुंबईकडे ऑफ ब्रेक गोलंदाज नव्हता,तसेच एक अष्टपैलू म्हणून नावलौकिक महेशने अल्पावधीतच मिळवला होता.त्याचवेळेस फ्रॅंक टायसन यांनी सनग्रेस मफतलालच्या वतीने बॉलिंग मार्गदर्शन शिबिर चालू होते,त्यांच्या देखरेखीखाली महेशची बॉलिंग प्रॅक्टिस वानखेडे स्टेडियमवर चालू झाली.आणि गुणवत्तेच्या जोरावर मुंबई रणजी संघात समावेश झाला. त्यावेळी नरेन ताम्हणे यांच्या दादर पारसी क्लब कडून महेश क्रिकेट खेळत होता, मंगेश भालेराव,रमाकांत देसाई,विजय चौगुले,सुधीर नाईक,दिलीप वेंगसरकर अशी क्रिकेट जगातील मान्यवर मंडळी मुंबई रणजी निवड समितीला शिफारस करत होती.

क्रिकेटचा लळा लागला.

लहानपणी साताऱ्यातील गल्लीतील टीम मधून छत्रपती शाहू स्टेडियम वर एका सामन्यात खेळताना थोर क्रिकेट समीक्षक शरद महाजनी(आण्णा) हे अंपायर होते.त्यांच्या समोर ८० धावांची खेळी महेशने साकारली होती.आणि बक्षीस म्हणून १० रुपये सुद्धा शरद महाजनी यांनी दिले होते,जीवनातील हेच पाहिले पारितोषिक आयुष्याची वाटचाल ठरवून गेले,पुढे सिटी जिमखाण्याचे वतीने क्रिकेट खेळायला चालू केल्यावर हेमंत गुजर व प्रवीण कळकुंभे यांनी खेळातील बारकावे शिकविले जे पुढे आयुष्यभर महेशच्या कामी आले.

सातारा जिमखाण्याने जडणघडण केली.

सातारा जिमखाण्याचे प्रमुख व माजी खेळाडू सुधाकर शानभाग यांनी वेळोवेळी सहकार्य केले, तर अफजल पठाण,नरेंद्र पंडित,सुनील गाडेकर,काशीनाथ राव,दीपक पाटील,विनोद वांद्रे,अनिल कदम,निलेश गोयल,अरविंद पटेल यांनी सातारा येथील सरावावेळी कायमच सहकार्याची व नेटमधील चुका बारकावे सांगण्याची भूमिका घेतली.

नाना पाटेकर यांची कौतुकाची थाप

महेश आर.सी.एफ ला जॉब करीत असताना पुणे पोलीस कमिशनर विक्रम बोके यांनी पोलीस कमिशनर टुर्नमेंट आयोजित केली होती,अंतिम सामना सेंट्रल बॅंकेच्या सोबत होता यावेळी प्रथम फलंदाजी करताना आर.सी.एफ ने २८० धावा केल्या,यामध्ये महेशने नाबाद १२१ धावा केल्या होत्या.समोरच्या टीम मध्ये रवी येरवडेकर,रियाज बागवान,हेमंत किणीकर,असे प्रमुख खेळाडू होते.सदरचा सामना आर.सी.एफ ने चुरशीच्या लढतीत गमावला,आणि सामनावीर हा पुरस्कार सेंट्रल बँकेच्या शर्मा नामक खेळाडूला ८० धावा केल्या म्हणून दिला गेला,त्या क्षणी प्रमुख पाहुणे असणारे नाना पाटेकर यांनी संयोजकांना सांगितले की महेशची बॅटिंग मी संपूर्ण पहिली आहे.फक्त त्याची टीम हरली म्हणून त्याची शतकी खेळी नजरेआड करता येणार नाही.सामनावीर पुरस्कार त्यालाच दिला गेला पाहिजे,आणि संयोजकांनी आपला निर्णय बदलत सामनावीर म्हणून महेश कारंजकर याची निवड केली.

महाराष्ट्र ऐवजी मुंबई का ?

पुण्यातील काही सामान्यावेळी तत्कालीन महाराष्ट्र रणजी संघाचे मुख्य सिलेक्शन कमिटी प्रमुख बाळ दाणी यांनी, महेशला महाराष्ट्र की मुंबई संघाकडून रणजी ट्रॉफी खेळणार असा प्रश्न केला असता,त्यावेळी समयसूचकता दाखवत महेशने अभ्यासपूर्ण उत्तर दिले होते.ते म्हणजे महाराष्ट्र संघासाठी दोन ऑफ स्पिनर आहेत,एक म्हणजे संतोष जेधे आणि दुसरे श्रीकांत जाधव, यामुळे स्पर्धा टोकाची आणि संधी मर्यादित असणार आहे. तर मुंबई संघात सध्या ऑफ स्पिनर कोणीही नाही, तसेच अष्टपैलू असल्याने चांगली संधी आहे.यामुळे मी मुंबई संघाला प्राथमिकता देणार असून १५ जणांच्या संघात असण्यापेक्षा चांगले आणि मैदानावरील क्रिकेट खेळण्यावर भर आहे.या चाणाक्ष उत्तराने बाळ दाणी यांनी सुद्धा महेशच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली होती.

समुद्राकडेची मुंबई क्रिकेटचाही समुद्र

मुंबईला नुसताच समुद्र किनारा नसून क्रिकेटच्या खेळाडूंचाही समुद्र आहे.सुनील गावसकर यांचा खेळ बघत लहानचा मोठा झालेल्या महेशला, मुंबईच्या क्रिकेट बद्दल कायमच कुतूहल असायचे आणि त्याच क्रिकेटच्या पंढरीत खेळायची इच्छा होती.आणि त्याच्या सुदैवाने ती पूर्ण झाली,कारण रवी शास्त्री,संजय मांजरेकर, सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी,समीर दिघे,साईराज बहुतुले,पारस म्हाम्बरे, अबी कुरुविला,सलील अकोला अशा दिगग्ज खेळाडू सोबत बडोदा विरुद्धचा सामना प्रत्यक्ष मैदानात खेळायला मिळाला होता. यामुळे हा रोमहर्षक सामना माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा असल्याचा उल्लेख महेश कायमच करीत असतो.

आर.सी.एफ ते इंडियन ऑइल प्रवास

क्लब क्रिकेट खेळत असताना संधी आणि उपयुक्तता या दोन्ही बाजूंचा विचार करावा लागतो.नेमकी अशी अवस्था महेश बाबत घडली होती,चेंबूरला आर.सी.एफ. विरुद्ध इंडियन ऑइल असा सामना असताना महेशने आर.सी. एफ. कडून खेळताना फलंदाजी करताना १०० धावा केल्या होत्या, तर गोलंदाजी करताना ५ विकेट घेतल्या होत्या.त्याच वेळी इंडियन ऑईलच्या नजरेत ही कामगिरी भरली आणि त्यानी कायमस्वरूपी नोकरीची संधी देऊ केल्याने, एका ठराविक वयोमर्यादेपर्यत क्रिकेट खेळू शकतो पण भविष्याचा विचार करून ही संधी महेशने स्वीकारली, आणि आज सन्मानाचे आयुष्य जगताना सिनियर मॅनेजर म्हणून इंडियन ऑइल मध्ये तो बडोदा येथे कार्यरत आहे.याच संघाकडून रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे,चेतनेश्वर पुजारा,वसीम जाफर,झहिरखान हे सुद्धा कधीकाळी महेशचे सलग १० वर्षे सहकारी खेळाडू होते.

आईने पहिली बॅट घेऊन दिली.

महेशला क्रिकेट खेळण्यासाठी आईने सर्वप्रथम क्रिकेटची बॅट घेऊन दिली,वडील मिलिटरी मधील रिटायर्ड कॅप्टन चीन आणि बांगलादेश युद्धात सहभाग घेतला असल्याने घरात कायमच सैनिकी शिस्त,मोठा भाऊ एम.फिल. करून प्राध्यापक,तर दोन बहिणी सुशिक्षित असल्याने घरातील वातावरण कायमच खेळीमेळीचे अशातच लग्नानंतर उच्च शिक्षित पत्नीसह पुण्यातच स्थायीक झाला असून एक मुलगी सध्या फोटोग्राफी मध्ये करिअर करत असून नुकतीच सिंगापूरहून शिक्षण घेऊन आली आहे.

जवागल श्रीनाथ यांच्या सोबत छत्रपती शाहू स्टेडियमवर

साताऱ्याचे तत्कालीन उपनगराध्यक्ष संजय जोशी यांच्या प्लस पॉईंटचे उदघाटन करण्यासाठी जलदगती गोलंदाज जवागल श्रीनाथ सातारा येथे आले होते,यावेळी सातारा जिल्हा क्रिकेट असोसिएशनने आयोजीत केलेल्या एका प्रदर्शनी सामन्यात महेशने फलंदाजी मध्ये ९८ धावा आणि विनोद वांद्रे याने ५३ धावा केल्या होत्या,सर्व स्टेडियम दर्शकांनी खचाखच भरले होते आणि टाळ्या आणि शिट्याच्या गजरात उदंड प्रतिसाद दिला होता.यामुळे सातारकर क्रिकेटचे भुकेले आहेत त्यांना चांगले आणि दर्जेदार क्रिकेट पाहायला आणि खेळायला मिळाले पाहिजे.
I am very thankful to all this international cricketers they help me,i got selected of my merrit, i was really very lucky thanks for all of them.

महेश कारंजकर
मुंबई रणजी खेळाडू