सातारा लोकसभा भाजप हुकमी एक्क्याच्या शोधात..!

राष्ट्रवादी शरद पवार गट निश्चिंत,भाजपची चाचपणी सुरूच

सातारा लोकसभा भाजप हुकमी एक्क्याच्या शोधात..!

कराड तालुका वगळता सातारा,कोरेगाव,पाटण,वाई या ठिकाणी महायुतीच्या विचारांचे लोकप्रतिनिधी विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करीत आहेत.लोकसभेला सहा महिन्यांचा अवधी शिल्लक असताना लोकसभेच्या उमेदवारीची चाचपणी  करण्यात व्यस्त असणारी भाजपची यंत्रणा अजून कोणत्याही अंतिम निष्कर्षापर्यंत आली नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट निश्चिंत असून,अजून भाजपची चाचपणी सुरूच असल्याने ऐनवेळी उमेदवारी जाहीर झाल्यावर दमछाक होणार असल्याची जिल्ह्यातील मतदारांच्यात चर्चा आहे.

 

कराड पाटणची गोळाबेरीज

 

कराड तालुका दक्षिण आणि उत्तर अशा दोन मतदारसंघात विभागाला गेला आहे याठिकाणी आघाडी घेणारा उमेदवार लोकसभेत जात असतो हे आजपर्यंतच्या निकालाने सिद्ध झाले आहे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांचा कराड तालुक्यातील जनसंपर्क दांडगा असून याठिकाणी मिळणारे मताधिक्य जिल्ह्यातील इतर तालुक्यात कमी करणे विरोधी उमेदवाराला अडचणीचे ठरणार आहे.तसेच खा.पाटील यांचे मूळ गाव पाटण तालुक्यातील असल्याने स्थानिक उमेदवार म्हणून मिळणारी सहानुभूती बोनस ठरणार असून भाजपला पाटण तालुक्यात मिळणार अत्यल्प प्रतिसाद अडचणींचा ठरणार आहे.यामुळे विद्यमान खासदारांची कराड पाटण तालुक्यातील गोळाबेरीज आणि मिळणारे मताधिक्य तोडणे विरोधी उमेदवाराला अडचणीत आणणारे ठरणार आहे.

 

दोन राजांचा संघर्ष

 

आमची भागली असे म्हणणारे खा.उदयनराजे भोसले आणि त्यांना कायमच खिंडीत गाठणारे आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यातील खंडाजंगी जिल्ह्याला परिचित आहे.यामुळे उमेदवारी देताना एकमेकांची जिरवाजिरवी करण्याची दोघांची भूमिका एकमेकांना पूरक असणार की विरोधाची हे भाजपची उमेदवारी कोणाला मिळणार यावर अवलंबून असून भविष्यात आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना मंत्रिपदाची खुर्ची हवी असेल तर सातारा जिल्ह्याचा खासदार भारतीय जनता पार्टीचा करण्यासाठी कंबर कसावी लागणार आहे अन्यथा दिल्लीतील भाजप पक्षश्रेष्ठींची नाराजी त्यांना कायमच वेटिंग लिस्टवर ठेवणार आहे.तर खा.उदयनराजे भोसले यांनी आहे त्यात समाधानी आहे अशीच काहीशी भूमिका घेतल्याने भाजपची उमेदवारी नक्की कोणाला मिळणार याबाबत ट्विस्ट निर्माण झाले आहे.

 

राष्ट्रवादीचे दोन्ही गट पडद्यामागे एकच ..?

 

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि अजित पवार गट हे एकमेकांना पूरक भूमिका घेताना दिसत आहेत जिल्ह्यात कुठेही संघर्षाची भूमिका घेतली जात नसून परस्पर संमतीने बऱ्याच ठिकाणी निर्णय घेतले जात असल्याने राष्ट्रवादीचे दोन्ही गट पडद्यामागे एकच असल्याची शंका मतदार व्यक्त करीत असून दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ नको काहीशी अशीच भूमिका असल्याने भाजपला लोकसभेचा उमेदवार निवडणूक आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे.

 

दांडगा जनसंपर्क

 

खा.श्रीनिवास पाटलांचा दांडगा जनसंपर्क ही त्यांची जमेची बाजू आहे.कोणत्याही विषयावर परिपूर्ण विश्लेषण आणि प्रश्न समजून घेण्याची पद्धत मतदारांना भुरळ घालत आहे.रांगड्या ग्रामीण ढंगात संवाद साधण्याची कला आणि प्रशासकीय अधिकारी म्हणून बजावलेली सेवा विकासकामे राबवित असताना उपयोगी पडत आहे.प्रशासकीय सेवेतील काहीकाळ अधिकारी म्हणून नागपूरला केलेली सेवा नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा भुरळ घालणारी होती.यामुळे सातारा जिल्ह्याच्या उमेदवारी बाबत भाजपचे वरिष्ठ नेतृत्व थोडं मागच्या पावलावर असल्याची चर्चा घडत आहे. 

 

विधानसभेची भीती

 

जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघात शरद पवारांना मानणारा मोठा वर्ग आहे यामुळे लोकसभेला विरोधात भूमिका घेतली तर विधानसभेला अडचण निर्माण होणार याची धास्ती असल्याने काही ठिकाणी आतून मदत होण्याची शक्यता व्यक्त आहे. काठावरील लढती होणारी ठिकाणे वरकरणी भाजपला हम साथ है असेही म्हणतील परंतु प्रत्यक्ष लढाईत कानाडोळा करण्याची भूमिका घेतील अशीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे.