गडकरी साहेब महामार्ग बांधा पण सुरक्षेचे काय ..?

टोलचा झोल,अपघातांची मालिका महामार्गाची चाळण

गडकरी साहेब महामार्ग बांधा पण सुरक्षेचे काय ..?

 

स्ट्रेस मॅप कुठे आहे

सामान्य माणसाला स्ट्रेस मॅप म्हणजे काय आहे हे माहीत नसते परंतु यामध्ये महामार्गावर दिल्या गेलेल्या सुविधा आणि सुरक्षेचे मार्किंग असते परंतु याची अंमलबजावणी कधीही होत नाही तर स्ट्रेस मॅप कधीही दाखवला जात नाही या स्ट्रेसमॅप मध्ये महामार्गावरील टोइंग,अंबुलन्स पार्किंग,रस्त्यावरील साइन बोर्ड,पूल,धोकादायक कॉर्नर,अपघाती ठिकाण,सेवा रस्ते,स्वच्छतागृह, दवाखाने,तातडीचीसुविधा,क्रॉसिंग,याबाबत उल्लेख केलेला असतो आणि याप्रमाणे रस्ते विकास महामंडळाला योग्य त्या उपाययोजना कराव्या लागतात यामुळे स्ट्रेस मॅप हा महत्वाचा दस्तऐवज आहे.परंतु दुर्दैवाने याबाबत कोणतीही माहिती शासकीय अधिकारी जाणीवपूर्वक देत नाहीत.


माझ्याकडे पैशांची कमतरता नाही तुम्ही फक्त प्रस्ताव द्या अशी भाषणबाजी करणारे केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी टोलचा झोल,अपघातांची मालिका महामार्गाची चाळण झाल्याबद्दल मात्र सोयीस्कर मौन बाळगत असल्याने नागरिकांच्यात संताप निर्माण झाला आहे.शिवसंग्रामचे नेते आणि मराठा समाजाची धडधडती तोफ माजी आमदार विनायक मेटे याच्या अपघाती निधनाने महामार्गावरील अपघातांच्या मालिकेबाबत सुरक्षेचे  प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.बांधा वापरा आणि हस्तांतरित करा या योजनेमुळे अनेक धनदांडगे धनिक रस्ते बांधणीच्या व्यवसायात दाखल झाले आहेत.वर्क ऑर्डर प्रमाणे काम न करता घाईगडबडीत टोलबूथ कसे चालू करता येतील यासाठी प्रयत्न होताना दिसत आहे.यासाठी उदाहरण म्हणून पुणे सातारा आणि शेंद्रे ते कागल या महामार्गाचे देता येईल अनेक ठिकाणी स्ट्रेस मॅप प्रमाणे उपाययोजना नाहीत यामुळे गडकरी साहेब महामार्ग बांधा पण सुरक्षेचे काय ..? टोलचा झोल,अपघातांची मालिका महामार्गाची चाळण झाली आहे अशी आर्त साद नागरिक देत आहेत.

केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी हे आधुनिकतेची कास धरून विकास करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून लोकांच्यात प्रसिद्ध आहेत.परंतु प्रशासकीय यंत्रणा आणि ठेकेदार यांचे साटेलोटे असल्याने पैसे कमावणे हा एकमेव उद्देश समोर ठेऊन रस्ते निर्मीती केली जाते आणि सुरक्षेचे नियम पायदळी तुडविले जात आहेत.पुणे ते सातारा रस्त्याचे चाललेले काम आजही काही ठिकाणी चुकीच्या पद्धतीने झाले आहे एखादा मोठा पाऊस झाल्यानंतर महामार्गावर तलाव सदृश परिस्थिती निर्माण होते पाणी निचरा होण्यासाठी कोणतीही सुविधा संबधित ठरकेदाराने अवलंबली नाही.खड्डे तर पाचवीलाच पुजले असल्याने कोणता चुकवायचा प्रश्न निर्माण होतो आनेवाडी आणि शिवापूरचे टोलनाके तर पैसे कमावण्याचा धंदा होऊन बसले आहेत सुविधा कमी आणि वसुली जास्त अशी गत होऊन बसली आहे.

इंदोली आणि शिवडे फाटा येथील उड्डाणपूलाचे काम सुरू आहे याठिकाणी पावसाळा सुरू झाल्यापासून वाहन धारकांची कसरत सुरू आहे.ब्लॅक स्पॉट असल्याने केंद्र सरकारने तातडीची बाब म्हणून या पुलांची कामे सुरू केली आहेत अनेक चुकीच्या बाबी संबधित ठेकेदाराने केल्या आहेत यामध्ये सेवा रस्ते कमी दर्जाचे निर्माण केलं असून १ किलोमीटर प्रवास करण्यासाठी जवळपास एक तास खर्चला जात आहे संबधित ठेकेदार उंब्रज पोलिसांसह प्रशासनाला तारीख पे तारीख देत असून पोलीस प्रशासनाला जागता पहारा रात्रंदिवस ठेवावा लागत आहे.तर काही वेळेला वाहतूक इतर मार्गाने वळवावी लागत आहे यामुळे वाहनधारक आम्ही टोल नेमका कशाचा भरतोय असा सवालही करीत असून काहीही संबंध नसताना यासाठी पोलीस यंत्रणेलारोष पत्करावा लागत आहे.

शेंद्रे ते कागल दरम्यान असणारा चार पदरी महामार्ग तर मृत्यूचा सापळा बनला आहे दररोज चार पाच बळी रस्ते अपघातात ठरलेले आहेत.अनेक ठिकाणी सेवा रस्ते ठेकेदाराने खाल्ले आहेत.तर काही ठिकाणच्या प्लॅन मध्ये ऐनवेळी बदल केल्याने महामार्गाची अवस्था बिकट झाली आहे.तासवडे आणि किणी टोलनाक्याची मुदत संपून सदरचा महामार्ग एम एस आर डि सी कडून एन एच आय कडे हस्तांतरित झाला आहे टोल वसुलीचे कॉन्ट्रॅक्ट संपले तरी नव्याने वसुली सुरू आहे याबाबत शासन कोणताही खुलासा देत नाही सहापदरी करण सुरू झाले नसताना टोल आकारणी कशासाठी याचे कोणतेही उत्तर संबधित प्रशासनाकडे नाही यामुळे मिळेल तिथे लुटायचे असा सावकारी धंदा सरकारी यंत्रणेने सुरू केला असून टोल ठेकेदार,प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय पुढारी यांची मिलीभगत झाली असल्याने प्रवाशांच्या खिशावर संघटित दरोडे टाकण्याचे प्रकार रस्ते विकास महामंडळ करीत आहे.केंद्रिय दळणवळण मंत्री नितीन गडकरी माईक समोर आला की हेड लाईन होईल अशी बतावणी करीत असून नवीन मार्ग बांधण्यापूर्वी आहे त्या मार्गावर सुरक्षा पुरवा अशी तक्रार नागरिक करीत आहे.

अनेक सेलिब्रिटींचा द्रुतगती मार्गावर अंत

पुणे मुंबई द्रुतगती मार्ग निर्मितीनंतर शेकडो लहान मोठे अपघात या मार्गावर घडले आहेत.यामध्ये भक्ती बर्वे,आनंद अभ्यंकर,अक्षय पेंडसे,विजया पाटील आणि विनायक मेटे यांच्यासारख्या नामांकित व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला आहे. याची प्रमुख कारणे म्हणजे महामार्ग वाहतूक पोलिसांची अंमलबजावणी साठी टाळाटाळ,प्रमाणापेक्षा जास्त वेग,सिमेंटचा रस्ता असल्याने ब्रेक लागताना अडचण निर्माण होणे,लेन कटिंग,वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन,यांत्रिक दोष अशी असली तरी यासाठी केंद्रीय दळणवळण खात्याने यासाठी उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे.एखाद्या नामांकित व्यक्तीचे अपघाती निधन झाल्यावर मुद्दा चर्चेत येतो आणि पुन्हा 'ये रे माझ्या मागल्या'अशी गत होऊन बसते.  ९० किलोमीटरचा महामार्ग प्रवासासाठी असुरक्षित असल्याची भावना वाहनधारक व्यक्त करीत असून उर्से आणि खालापूर  या ठिकाणी टोलनाके आहेत.महिन्याला ८० ते १०० कोटी टोलवसुली केली जात असल्याची माहिती  आर टी आय कार्यकर्ते देत आहेत.लहान वाहने २७०,हलकी वाहने ४७०,मध्यम वाहने ५२०,बस ट्रक सहा चाकी वाहने ७९७,दहा चाकी वाहने १३८०,आणि मल्टी एक्सल वाहने १८३५ असा टोलदर आहे मात्र सुविधांची फरफट होत आहे.