शिस्त...जीवनावश्यक वस्तूंची आणि चैनीच्या वस्तूसाठीची,गरजेचं नेमकं काय ?

शिस्त...जीवनावश्यक वस्तूंची आणि चैनीच्या वस्तूसाठीची,गरजेचं नेमकं काय ?

अनिल कदम/उंब्रज

प्रशासन गेले महिनाभर जनतेला सोशल डिस्टन्स आणि हँड सॅनिटायझर वापराचे महत्व सांगण्यात व्यस्त आहे.पोलिसांचा घसा सांगून सांगूनच दुखायला लागला,परंतु जनता येड पांघरून पेडगावला जाताना काही थांबत नाही,परंतु दारू दुकानापुढील शिस्त बघितल्यावर जवळपास किराणा दुकानासमोर उभे राहणारेच दारूच्या रांगेत निमूटपणे उभे आहेत मग हा विरोधाभास का? असे नाना प्रश्न निर्माण झाले आहेत.जनतेला जीवनावश्यक वस्तूला शिस्त पाळता येत नाही परंतु चैनीच्या वस्तूसाठी शिस्त पाळली जाते हा फार मोठा विरोधाभास आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दोन कॉन्स्टेबल आणि एक निरीक्षक उंब्रजच्या तीन दुकाणासाठी झटताना पाहून काहीतरी चुकतंय याबाबत लोकांच्यात चर्चा आहे.

उंब्रज परिसरातील मद्य विक्रेत्यांनी मंगळवारी मध्यरात्री बांबू लावून सकाळी दहा वाजताची तयारी धामधुमीत असल्याची चुणूक दाखवली होती.सॅनिटायझर, मास्क,थर्मल टेस्टिंग,रांगेचे महत्व यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कर्मचारी सावलीत बसून आरामात नजर ठेवून होते.लाईन वाढली की तेवढ्यापुरते काठीचा धाक दाखवला जात होता परंतु जवळपास दोन महिन्याची कोरड पडलेला तळीराम निमूटपणे लायनीत येत होता.गेला आठवडाभर तळीरामांची सोशल मीडियावर धूम असून देशाच्या अर्थव्यवस्थेला कसे सावरू शकतात याबाबत अनेक व्हाट्सएप तज्ञ अनेक भन्नाट किस्से पाठवून करमणूक करत आहेत.जगण्यासाठी आवश्यक दारू आहे का किराणा याचा सोयीस्कर विसरच जणू सर्वाना पडला आहे.

जिल्हाधिकारी यांनी थर्मल टेस्टिंग सर्वच मद्य विक्रेत्यांना ठेवणे बंधनकारक केले आहे कारण किमान लपवाछपवी करणारा तरी ताप असणारा यामधून निदर्शनास येईल अशी भाबडी आशा आहे. परंतु मद्य विक्रेत्यांनी या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या असून ते थर्मल टेस्टिंग मशीन चालू आहे का बंद आहे याबाबत शंका आहे.कारण लायनीत येणार जाणारा याची कोणतीही लिखित नोंद ठेवली जात नसल्याने असे थर्मल टेस्टिंग मशीन शोभेची बाहुली ठरले आहे.दुकान दाराला माल विकायचा आहे तळीरामाला घ्यायचा आहे दोघेही गरजू यामुळे 'तेरी भी चूप मेरी भी चुप'अशी परिस्थिती असल्याने सगळा सावळागोंधळ निर्माण झाला आहे.

बहुतांश वाईनशॉप चालकांनी लॉकडाउन काळात लॉक ओपन करून बराच काळाबाजार केला असल्याची चर्चा आहे.परंतु राज्य उत्पादन शुल्क विभाग दुकानदारांची तळी उचलत असून याबाबत अवाक्षर काढत नाही.माहिती विचारली असता उडवाउडवीची उत्तरे मिळत असून मार्च ला असणारा क्लोझिंग स्टॉक द्यायला काय अडचण आहे.याबाबत दारूबंदी विभाग संशयाच्या भोवऱ्यात येत असून दुकानदारांना वाचवण्यासाठी धडपड करून नक्की काय साध्य होणार आहे याबाबत चर्चा आहे.

थंड बियरचे काय ?

थंड पदार्थ श्रीखंड,कोल्ड्रिंक्स,इत्यादींना विक्रीसाठी बंदी आहे परंतु थंड बियर विक्रीचे काय याबाबत सर्वसामान्य चर्चा करत असून बियर विक्री चालू असेल तर कोल्ड्रिंक्स आणि दुग्धजन्य पदार्थांनी काय घोडे मारले आहे असा खोचक सवाल जनतेतून व्यक्त होत आहे.