सातार्‍यातील पत्रकारांसाठी पत्रकार नगर उभारणार - खा. उदयनराजे भोसले

सातार्‍याच्या विकासात पत्रकारांचे मोठे योगदान राहिले आहे. पत्रकारांच्या विविध सूचनांमुळे अनेक प्रकल्पही मार्गी लागले. लोकप्रतिनिधींवर अंकुश ठेवण्याचे काम डोळस पत्रकारांनी केले आहे. सातार्यामत पत्रकारांसाठी पत्रकार भवनाला आम्हीच जागा दिली. पत्रकार आणि आमच्यात असलेल्या बॉन्डींगला कुणाचीही दृष्ट लागू नये. ज्याप्रमाणे पोलिसांसाठी पोलिस वसाहती आहेत. त्याप्रमाणेच सातार्याडतील पत्रकारांसाठी पत्रकार नगर उभारणार आहे.

सातार्‍यातील पत्रकारांसाठी पत्रकार नगर उभारणार - खा. उदयनराजे भोसले
खा. उदयनराजेच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना पत्रकार मनोज पवार

सातार्‍यातील पत्रकारांसाठी पत्रकार नगर उभारणार

खा.श्री.छ. उदयनराजे भोसले : उत्कृष्ठ पत्रकारिता पुरस्कार वितरण समारंभात घोषणा, 29 पत्रकारांचा गौरव 

सातारा/प्रतिनिधी :

      सातार्‍याच्या विकासात पत्रकारांचे मोठे योगदान राहिले आहे. पत्रकारांच्या विविध सूचनांमुळे अनेक प्रकल्पही मार्गी लागले असून त्यामध्ये त्यांनी अनेक सुधारणाही सुचवल्यात. तसेच लोकप्रतिनिधींवर अंकुश ठेवण्याचे काम डोळस पत्रकारांनी केले आहे. सातार्‍यात पत्रकारांसाठी पत्रकार भवनाला आम्हीच जागा दिली. पत्रकार आणि आमच्यात असलेल्या बॉन्डींगला कुणाचीही दृष्ट लागू नये. ज्याप्रमाणे पोलिसांसाठी पोलिस वसाहती आहेत. त्याप्रमाणेच सातार्‍यातील पत्रकारांसाठी पत्रकार नगर उभारणार असल्याची घोषणा खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी केली.

      येथील सातारा नगरपालिका आणि सातारा शहर पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने नुकताच श्री. छ. प्रतापसिंह महाराज (थोरले) उत्कृष्ठ पत्रकारिता पुरस्कार सोहळा 2021 संपन्न झाला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्षा सौ. माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे, सातारा  पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, जिल्हा पत्रकार संघाचे सरचिटणीस दिपक प्रभावळकर, साविआचे प्रतोद अ‍ॅड. डी. जी. बनकर यांची प्रमुख उपस्थिती होती.  

      खा. श्री. छ. उदयनराजे भोसले म्हणाले, लोकप्रतिनिधींकडून काम करताना चुका होतात. किंबहुना निवडून गेल्यावर नगरसेवक, आमदार, खासदार जनतेची  सेवा नीट करतात का? यांच्यावर अंकुश ठेवण्याचे काम  डोळस पत्रकार करत असतात. त्यांचा सन्मान  करणे ही सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे पत्रकारांसाठी पुरस्कार सोहळा सुरु करण्यात आला. त्यात नगरपालिकेप्रमाणे पत्रकार संघाचेही योगदान आहे. सातार्‍यात पत्रकार भवन  निर्माण करण्याच्या मागणीचीही पूर्तता आम्ही केली आहे. पत्रकार अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पत्रकारिता करतात. त्यांचे वास्तव्य शहरात झाले पाहिजे. आता शहराची हद्दवाढ झाल्यामुळे पुरेशी जागा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे पोलिस सोसायटीच्या धर्तीवर पत्रकारांच्या मागणीनुसार पत्रकार नगर झाले पाहिजे, यासाठी आम्ही पुढाकार घेवू, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले आहे.

      ते म्हणाले, पत्रकारांचे लिखाण निर्भीडपणे असणे आवश्यक आहे. लोकप्रनिधींच्या चुका लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम त्यांचे आहे. मी तर पत्रकारांना माझे  मित्र म्हणून संबोधतो. माझ्या वाटचालीत पत्रकार मित्रांचा मोठा वाटा आहे.  माझा राजकीय प्रवास नगरसेवक पदापासून झाला. मी नगराध्यक्ष कधी होवू शकलो नाही. गेले अनेक वर्षे सातारा विकास आघाडीला सातारकरांनी आशीर्वाद दिला. पत्रकारांनी दाखवलेल्या चुकांमुळे आम्ही सुधारणा केली. त्यामुळे अनेक वर्षांपासून बहुचर्चित असलेले प्रकल्प मार्गस्थ लावण्याचे काम सातारा विकास आघाडीने केले.  त्यामध्ये सातारकरांचा मोठा वाटा असून पत्रकारांचेही मोठे योगदान आहे.

      ते पुढे म्हणाले, आपल्या सर्वांचे चांगले बॉन्डींग आहे. पत्रकारांच्या सुचनेमुळे स्वच्छता कामात सुधारणा झाली. पूर्वी सफाई कर्मचार्‍यांची वाईट अवस्था होती. आता कचरा संकलनासाठी घंटागाड्या सुरु करण्यात आल्या. ग्रेड सेपरेटरचे काम झाले. पत्रकारांशी विचारविनिमय करत अनेक कामे मार्गी लावली. सातारा पालिकेने उत्कृष्ठ पत्रकार पुरस्काराची प्रथा पाडली. कुणाला सांगावे लागत नाही. काही बाबी अंत:करणातून याव्या लागतात. पत्रकारांच्या माध्यमातून सातार्‍याचे चांगले प्रोजेक्शन व्हावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

     दरम्यान, सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे, सातारा  पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, जिल्हा पत्रकार संघाचे सरचिटणीस दिपक प्रभावळकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्तविक अ‍ॅड. डी. जी. बनकर यांनी केले. सूत्रसंचालन व आभार संपदा देशपांडे यांनी मानले.

     यावेळी सातारा शहरातील प्रिंट व इलेक्ट्रॉनिक माध्यमातील 29 पत्रकारांना पुरस्काराने गौरवण्यात आले. सन्मानचिन्ह, धनादेश, शाल व श्रीफळ देवून त्यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमास  सभापती सीता हादगे, स्नेहा नलावडे, अनिता घोरपडे, नगरसेवक श्रीकांत आंबेकर, सुनील काटकर, प्रताप शिंदे आदींची उपस्थिती होती.