सत्तेचा पोरखेळ

सत्तेचा पोरखेळ

 

         अग्रलेख / ३ नोव्हेंबर २०१९ 

 गेल्या आठ दिवसांपासून महाराष्ट्रात सत्तेचा पोरखेळ सुरु आहे. निवडणूकपूर्व युती करून ज्यांनी निवडणूक लढवली, ते सत्तेत आले आहेत, मात्र जे काय व्हायचे ते ठरल्याप्रमाणे ५०-५० च्या फार्मुल्याने मुख्यमंत्री पद शिवसेनेला मिळाले पाहिजे, अशी घोषणा शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केली आणि त्यानंतर आत्तापर्यंत उभा महाराष्ट्र सत्तेच्या समीकरणाची चव चघळत बसल्याचे दिसत आहे. सत्तेत कोण येणार, सत्ता कोणाची होणार याकडे राज्याचे लक्ष लागले असले तरी राजकारण मात्र नवनवीन वळणे घेताना पाहायला मिळत आहे. पवार पॉवर आज महाराष्ट्र पहात बसला आहे.                                                                                                               राज्यात विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. राज्यातील जनतेनेही विचारांती मतदान केले. भाजपनेही निवडणूक ३७० कडे वळवत प्रचाराचा धुळ्ळा उडवला. तर मुख्यमंत्र्यांनी महाजनादेशाची चाचपणी करत मी पुन्हा येनारची हाक दिली. दुसरीकडे आपली सत्ता येणारच नाही, अशा मानसिक स्थितीत असलेच्या कॉंग्रेसने आपले मतदारसंघ सोडले तर कोणत्याही नेत्याने कोठेही जाऊन प्रचार केल्याचे पाहायला मिळाले नाही. एकीकडे भाजप- शिवसेनेचे वारे वाहत असतानांच मिडीयाने तर कहर केली आणि निवडणूकपूर्व चाचणीत २२० च्या वर जागा महायुतीला मिळतील, अशी भविष्यवाणी केली. एकीकडे कॉंग्रेस-राष्ट्रवादीला सोडून जाणार्यांची संख्या वाढतच होती. अशा मानसिक स्थितीत प्रचाराची रणनीती आखून ही निवडणूक जनतेच्या प्रश्नाकडे वळवून आपला करिष्मा निर्माण करण्यामध्ये शरद पवार बाजीगर ठरले. तीन नंबरचा पक्ष म्हणून राष्ट्रवादी उदयास आला. सर्वाचीच भविष्यवाणी खोटी ठरवून आज बहुमत मिळूनही उद्धव ठाकरेचा निशाणा एकीकडे तर भाजपची रणनीती दुसरीकडे अशी परिस्थिती निर्माण करण्यात कॉंग्रेस- राष्ट्रवादीच्या नेत्यांना यश आल्याचे दिसत आहे. यामुळेच आज सत्तेचे समीकरण दिवसेंदिवस गुंतागुंतीचेच निर्माण झाले आहे. राज्य मोठ्या संकटाला सामोरे जात आहे. संपूर्ण राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. याकडे लक्ष द्यायला सरकारच नाही. तर दुसरीकडे मुख्यमंत्री १० कोटीची घोषणा करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहेत. अशातच पवारांनी पुन्हा एकदा आपला करिष्मा सिद्ध करत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांची व्यथा जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.                                                                                   शिवसेनेने आमचाच मुख्यमंत्री होणार म्हटले तर बहुमत सिद्ध करू शकतो, असा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. याला शह देताना भाजपने शपथविधीची तयारी सुरु केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला पंतप्रधान, अमित शहा यांच्यासह तीन राज्याचे मुख्यमंत्री आणि केंद्रातील सुमारे डझनभर मंत्री उपस्थित राहणार असल्याची चर्चां रंगत आहे. जरी मोठा पक्ष म्हणून भाजपने हा शपथविधी सोहळा केलाच तर पुन्हा वाघाला डीवचल्यासारखे होणार आहे आणि वाघानेही वाघनख्या बाहेर काढल्या असल्याने त्याचा फटकारा मात्र भाजपला बसणार, हे निश्चित दिसत आहे. राष्ट्रवादीच्याही तातडीच्या बैठका पार पडत आहेत. तर कॉंग्रेसवाले दिल्ली दरबारी आपले म्हणणे मांडताना उभा महाराष्ट्र पाहत आहे. सत्तेची समीकरणे किरकोळ शाब्दिक चकमकीमुळे वाढतच चालली आहेत. दि. ९ नोव्हेंबरला विधानसभेची मुदत संपत आहे. त्याच्या आत सरकार स्थापन झाले पाहिजे तरी पवार पॉवर नेमका खेळ कोणता करत आहेत याचे आराखडे आखणे सोपे नाही. तुमच्याकडे येऊन शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद मिळणार असले तर पवार गेम हे सहजपणे करू शकतो. कारण आघाडीची संख्या शिवसेनेपेक्षा मोठी आहे आणि जे भाजप देत आहेत ते सर्व दिले तर कदाचित राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री बनू शकतो. किंबहुना राज्यातील सर्व गंभीर प्रश्नांना सामोरे जाण्याची ताकद शरद पवारांच्यातच आहे. आपत्ती कोणतीही असो, त्यावर तोडगा काढण्याची क्षमता राज्यातील या एकमेव नेत्याकडे असल्याने आणि भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शरद पवार गेम पॉवर खेळणार.                                                                                                                       शिवसेनेला मुख्यमंत्रीपद दिले तर भाजप उद्याचा शपथविधी सुरळीतपणे पार पाडून युती सत्ता सुरळीतपणे चालवू शकते. झुकून आणि वाकून भाजप सेनेला हे पद देईल असे वाटत नाही. भाजपने केंद्राच्या जोरावर गोवा, कर्नाटक राज्यांत कशा सत्ता स्थापन केल्या आहेत, याची जाणीव महाराष्ट्रातील सर्वच पक्षांना आहे. त्यामुळे सध्या राज्यात सुरु असलेला सत्तेचा पोरखेळ लवकरच थांबवावा आणि राज्यात स्थिर सरकार स्थापन व्हावे यासाठी नवीन समीकरणे उदयास आल्याचे पाहायला मिळेल. राष्ट्रपती राजवटीची धमकी देऊन भाजप नेते आपल्या तोंडाची वाफ वाया घालवत आहेत. अशा या धमक्यांना मतदानावेळी राज्यातील जनता भुलली नाही, तर नेते काय भुलणार ? जनता हुशार आहे, म्हणूच त्यांनी मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार असे म्हणणे व ऐकवणे थांबवले आहे. राज्यात पुढे काय राजकारण घडत आहे, ते पाहू.