सत्तेचा सारीपाट ...

भाजपने अखेर सत्तास्थापनेत पुढाकार घेतला असून सत्तेत सहभागी होत शिवसेना आपल्यामागे फरफटत येईल, असा आत्मविश्वास भाजपला वाटू लागला आहे. त्यादृष्टीने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथील वानखेडे स्टेडीयमवर भाजपने मुख्यमंत्र्यांचा शपथविधी घेतला आहे.

सत्तेचा सारीपाट ...

     

 

         कृष्णाकाठ / अशोक सुतार 

            भाजपने अखेर सत्तास्थापनेत पुढाकार घेतला असून सत्तेत सहभागी होत शिवसेना आपल्यामागे फरफटत येईल, असा आत्मविश्वास भाजपला वाटू लागला आहे. त्यादृष्टीने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथील वानखेडे स्टेडीयमवर भाजपने मुख्यमंत्र्यांचा शपथविधी घेतला आहे. युतीमध्ये अजून सत्ता स्थापनेबाबत सकारात्मक चर्चा झाली नसल्याने २०१४ ला या पद्धतीने भाजपने सत्तास्थापना केली होती, त्याचीच पुरावृत्ती आता होणार आहे. मंगळवारी दि. ५ नोव्हेंबर रोजी भाजपने शपथविधी सोहळा घेतला आहे. यावेळी विधानसभा निवडणुकीत युतीला एकूण १६१ जागा मिळाल्या असून शिवसेना व भाजपच्या युतीला पहिले प्राधान्य देण्यात आले आहे. दुसरा पर्याय हा की, सद्यस्थितीत शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी हे सत्ता स्थापनेत पुढाकार घेत नाहीत तर भाजप काही अपक्ष आमदार सोबत घेऊन सर्वात मोठा पक्ष असल्याचा दावा करीत सत्ता स्थापना करण्याची शक्यता आहे. सध्या मात्र भाजपने सत्ता स्थापना करताना शिवसेनेला विचारात घेतलेले नाही. मुख्यमंत्रीपदावरून सेना- भाजपमधील दुरावा वाढतच चालला आहे. राज्यात हे सर्व प्रश्न बाजूला होऊन सत्ता स्थापना झाली तर अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना लवकर मदत मिळेल. तसेच अन्य प्रश्न सुटतील. त्यामुळे राज्यात स्थिर सरकार यावे ही जनता जनार्दनाची इच्छा आहे. मंगळवारी भाजपने आयोजित केलेल्या सोहळ्यात शिवसेना नेमकी काय भूमिका घेणार, यावर राज्यातील पाच वर्षाचे भवितव्यातील राजकारण ठरणार आहे.                                                                          भाजप व शिवसेनेचे नेते एकमेकांविरोधात बोलत आहेत. मुख्यमंत्रीपद आम्हालाच पाहिजे असा हट्ट शिवेसेनेने धरला आहे. भाजपने यावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देतो, असे आश्वासन आम्ही दिलेले नाही. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाचा वाद राज्यात गाजत आहे. असे असताना भाजपने आता नवीन राजकीय खेळी सुरु केली आहे. या खेळीचा फायदा भाजपला नक्कीच होऊ शकतो. एकतर शिवसेना मागील वेळेसारखी पुन्हा सत्तेत सामील होऊ शकते. काही अपक्ष आमदार भाजपला पाठिंबा देऊ शकतात. २०१४ साली राष्ट्रवादीने विनाअट भाजपला पाठिंबा दिला होता. आत्ताही कोणता पक्ष आपल्याला पाठिंबा देऊ शकेल, याची चाचपणी भाजपकडून सुरु आहे. शिवसेना सत्तास्थापनेबाबत ठोस निर्णय घेत नसल्यामुळे आणि विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून सात दिवस उलटल्याने आता सत्तेचा दावा करण्यासाठी राज्यातील जास्त संख्याबळ असलेल्या पक्षास म्हणजेच भाजपला राज्यपालांनी निमंत्रण दिले आहे. शिवसेनेला भाजपने गृहीत धरले आहे काय, असा प्रश्न निर्माण होत आहे.                                                                       भाजपने केलेला सत्ता स्थापनेचा दावा म्हणजे जुगार आहे, असे वाटते. कारण जर भाजपने शपथविधी सोहळा घेतला आणि त्यांना सरकारवर विश्वास प्राप्त करण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत आहे. शिवसेनेने लवकर स्वबळाची तयारी केली नाही तर मात्र भाजप सत्तेवर येण्याची शक्यता निर्माण होत आहे. शिवसेनेला कॉंग्रेस व राष्ट्रवादीचा पाठिंबा असल्याचे मत आघाडीने व्यक्त केले आहे. कॉंग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे की, भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही शिवसेनेला पाठिंबा देऊ शकतो. तसेच शिवसेनेचा मुख्यमंत्री होण्यासाठी आघाडीचा विरोध नाही. शिवसेनेला जर भाजपचे मत पटत नसेल तर त्यांनी आघाडीतील पक्षांना सोबत घेऊन सत्ता स्थापन करणे गरजेचे आहे.परंतु शिवसेनेतील काही आमदारांचा आघाडीला सत्तेत घेण्यासाठी विरोध असल्याचे समजते. शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्ता स्थापनेसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन आघाडीतील पक्षांच्या नेत्यांनी केले होते. पण शिवसेनेने त्यावर विचार केलेला नाही. शिवसेनेने हे धाडस केले असते तर राज्यात आघाडीच्या मदतीने सरकार स्थापन झाले असते. भाजपाध्यक्ष अमित शहा हे मातोश्री निवासस्थानी गेल्यास भाजप व शिवसेनेमध्ये निर्माण झालेला सत्तास्थापनेचा तिढा सहज सुटू शकतो, असे मत  राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले आहे. हरयाणात दहा आमदार असलेल्या दुष्यंत चौताला यांना उपमुख्यमंत्रिपद देऊन भाजपने नमते घेतले आहे. खुद्द अमित शाह यांनी निकालानंतर चौताला यांची मनधरणी केली होती. मात्र, महाराष्ट्रात शिवसेनेच्या बाबतीत भाजपच्या वरिष्ठांनी वेगळे धोरण अवलंबले असल्याचे दिसते. शिवसेनेला हे खटकत असल्याची चर्चा आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठ दिवस उलटल्यानंतरही राज्यात सरकार स्थापनेची चिन्हे दिसत नसल्याने भाजपने सत्ता स्थापनेत पुढाकार घेतला आहे, हे भाजपचे म्हणणे पटण्यासारखे आहे. अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद या फार्म्युल्यावर शिवसेना ठाम आहे. तर, मुख्यमंत्रिपदाबरोबरच महत्त्वाची खाती सोडायला भाजप तयार नाही. मुख्यमंत्रिपद भाजप सहजासहजी सोडणार नाही, याची जाणीव शिवसेनेला नाही, असे नाही. काही गोष्टी पुढे करून  महत्त्वाची खाती पदरात पाडून घेण्याची सेनेची रणनीती दिसत आहे. राज्यात सत्ता स्थापण्यापुर्वी  भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी शिवसेनेची मनधरणी करावी, अशी सेनेची अपेक्षा आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असताना भाजपचे वरिष्ठ नेते प्रत्येक कामासाठी मुंबईला मातोश्रीवर धाव घेत असत. या भेटीगाठींनंतर दोन्ही पक्षातील तणाव निवळत असे. मात्र, राज्यात भाजपचा मुख्यमंत्री झाल्यापासून शिवसेनेला दुय्यम स्थान देण्याचे धोरण भाजपने अवलंबले असल्यामुळे शिवसेनचे आणि भाजपचे गेल्या पाच वर्षात पटलेले नाही ही वस्तुस्थिती आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणूक निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा मिळवत व शिवसेनचे आम्हाला गरज नाही असे भासवत भाजपने सेनेला सत्तेत सहभागी होण्यास भाग पाडले होते. तसेच सेनेला कमी महत्वाची खाती दिली होती.                                                                                                                      राज्य विधानसभा निवडणुकीचा निकाल संमिश्र लागला असून आता राजकीय परिस्थिती वेगळी आहे. भाजपच्या जागा गत वेळेपेक्षा कमी झाल्या असून त्यांना शिवसेनेची अधिक गरज आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी मुख्यत: भाजपच्या विरोधात लढली आहे आणि आघाडीतील पक्षांची विचारसरणी शिवसेनेशी जुळेल असे नाही. आघाडीने पाठिंबा दिला तरी शिवसेनेला तो पाठिंबा सातत्याने पाच वर्षे राखणे जमेल, असे नाही. त्यामुळे आघाडी आणि शिवसेना एकत्र येण्याचा पर्याय अशक्य वाटतो. तर, शिवसेना ही काँग्रेस-राष्ट्रवादीशी जुळवून घ्यायच्या मन:स्थितीत आहे. अशा परिस्थितीत राज्याची सत्ता राखायची तर भाजपच्या नेत्यांना सेनेशी जुळवून घ्यावे लागेल. शिवसेनेने मुख्यमंत्रीपदाचा हट्ट सोडून भाजप सरकामध्ये सामील होणे, हा सर्वात चांगला पर्याय वाटतो. शिवसेनच्या काही मागण्या असतील तर त्यांनी त्यासाठी भाजपच्या वरीष्ठांसोबत चर्चेला बसावे आणि सुसंवादाने यातून मार्ग काढण्याची गरज आहे. भाजपचा राज्यातील मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा मंगळवारी पार पडत आहे, शिवसेनेने योग्य, ठोस निर्णय घेऊन स्वतःची राजकीय प्रतिमा अबाधित राखावी, असे वाटते.