चार टेकड्या जमीनदोस्त बांधकाम अभियंता ठेकेदार मालामाल

शहापूर वडोली निळेश्वर रस्त्यासाठी वारेमाप मुरूम उपसा

चार टेकड्या जमीनदोस्त बांधकाम अभियंता ठेकेदार मालामाल
संग्रहित छायाचित्र

चार टेकड्या जमीनदोस्त बांधकाम अभियंता ठेकेदार मालामाल

शहापूर वडोली निळेश्वर रस्त्यासाठी वारेमाप मुरूम उपसा

कराड / प्रतिनिधी

कराड तालुक्यातील मंदावलेला अवैध गौनखनिज उपसा पुन्हा नवीन जोमाने शासकीय कामांच्या रुपात उग्र रूप धारण करीत  आहे.याबाबत कराड तालुका भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे संदीप बाबर यांनी प्रांताधिकारी उत्तम दिघे यांना दिलेल्या निवेदनात वर्कऑर्डर पेक्षा अतिरिक्त मुरूम उत्खनन करून चार टेकड्या ठेकेदारांनी गिळंकृत केल्याचे म्हटले आहे.तत्कालीन तहसीलदार राजेंद्र शेळके आणि अमरदीप वाकडे यांच्या वादळी कारकिर्दीनंतर विकासाभिमुख कारभार राबविणारे विजय पवार यांची वर्णी कराड तहसीलदार म्हणून लागली आहे.कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून नागरिकांच्यात चर्चा असताना मंडलाधिकारी, गावकामगार तलाठी व लिपिक मंडळी वरकमाईला बळी पडली असल्याची चर्चा आहे.याच खाबूगिरीतून शहापूर ते  वडोली निळेश्वर रस्त्याच्या कामासाठी प्रमाणापेक्षा जास्त मुरूम उत्खनन करून शासनाची फसवणूक केल्याची तक्रार बाबर यांनी केली असून संबधित ठेकेदार,बांधकाम अभियंता यांच्यावर कडक कारवाई होऊन गावकामगार तलाठी, मंडलाधिकारी व कोतवाल यांची खातेनिहाय चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे.

याबाबत दिलेल्या तक्रारीत म्हणाल्या प्रमाणे शहापूर ते वडोली निळेश्वर या दोन किलोमीटरच्या रस्त्यासाठी दिलेल्या कार्यादेशातील मंजूर मोजमापापेक्षा जास्तीचे मुरूम,दगड हे गौण खनिज उत्खनन केले जात असून सदरचे गौण खनिज अवैधरित्या विक्री केले जात आहे.यामुळे बांधकाम ठेकेदार दिलीप चव्हाण यांचेवर कारवाई होऊन त्यांचेकडून दंड आणि स्वामित्व धनाची रक्कम वसूल करावी व कायदेशीर प्रक्रिया होऊन गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी बाबर यांनी केली आहे. सदर तक्रारीच्या अनुषंगाने संबधित विभागातील मंडलाधिकारी, गावकामगार तलाठी आणि कोतवाल यांनी शासकीय कामात कामचुकार पणा केला असल्याचे तक्रारदार यांचे म्हणणे असून महसूल विभाग याबाबत नेमकी काय भूमिका घेणार याकडे परिसराचे लक्ष लागून राहिले आहे.

कराड शहराचे तलाठी सागर पाटील यांना दोनच दिवसांपूर्वी ४० हजारांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडल्याने कराड महसूल विभागात खळबळ पसरली आहे.कराड तालुक्यातील अवैध गौण खनिज उपसा नेहमीच चर्चेत राहिला असून काही मंडलाधिकारी व गावकामगार तलाठी हे अवैध उत्खनन करणारांचे बटीक असल्यासारखे वागत असल्याने शासन महसुलाला कात्री लागत आहे.यामुळे ठेकेदार,अधिकारी,कर्मचारी मालामाल तर जनता,शासन कंगाल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.यामुळे महसूल प्रशासनावर वचक ठेवण्याचे काम तहसीलदार विजय पवार यांना पार पाडावे लागणार आहे.

 

शासकीय कामांचा देखावा

महसूल विभागातील काही अतीविद्वान पंडित कराड तालुका म्हणजे आपली पाटीलकी असल्याचा आव आणत असून चुकीच्या कामांना पाठबळ देत असल्याने नियमबाह्य कामे नियमात बसवून मलिदा लाटला जात आहे.पर्यावरण विभाग व हरित लवादाने गौण खनिज उत्खनन बंदी घातले तरी शासन नियमाला बगल देत शासकीय कामांना मुरूम व दगड गरजेच्या असल्याच्या खोटी प्रकरणे कराड गौण खनिज विभागाने बिनबोभाट मंजूर केल्याची चर्चा आहे.यामुळे शासकीय कामांचा देखावा उभा करून उखळ पांढरे केले जात आहे.

अन्यथा जनहितासाठी आंदोलन करणार

शहापूर-वडोली निळेश्वर रस्त्याच्या कामासंदर्भात ठेकेदारावर कारवाई करावी यासाठी निवेदन देवूनही प्रांताधिकार्‍यांनी अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. जर दोन दिवसामध्ये संबंधित ठेकेदारावर दंडात्मक कारवाई आणि गुन्हा नोंद न केल्यास कराड येथील प्रांत कार्यालयासमोर जनहितासाठी आंदोलन करणार असल्याचे निवेदनच आज किसान मोर्चा भाजपाच्या वतीने दिले आहे.

संदीप बाबर
कराड तालुका किसान मोर्चा