पुरग्रस्त शेतकºयांना कर्जमाफी द्या-शरद पवार

पुरग्रस्त शेतकºयांना कर्जमाफी द्या-शरद पवार


सांगली / प्रतिनिधी
सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात इतका मोठा महापूर आलेला आहे. यामध्ये सगळं उदध्वस्त झालेलं आहे. यामध्ये शेतकरी, छोटे व्यापारी मोडून पडले आहेत. त्यामुळे शासनाने तत्काळ शेतकरी व छोटे व्यापारी यांची कर्ज माफ करावीत, अशी मागणी करणार असल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. अलमट्टी धरणातून पाणी सोडण्याबाबत केंद्र शासनाने धोरण ठरविणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
शनिवारी पवार यांनी पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त सांगली, सातारा जिल्ह्यातील गावांना भेटी देऊन, लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी बारामती अ‍ॅग्रोतर्फे रोहित पवार यांनी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.
शरद पवार म्हणाले, शेतकºयांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. घरं गेली, पिकांमध्ये भाज्या,  हळद, उसाचे मोठे नुकसान आहे. लोकांना मदत करण्यासाठी केंद्र आणि राज्याने आपत्ती निवारण करणे गरजेचे आहे. आम्ही पूरग्रस्त भागाची गेल्या दोन- तीन दिवसांपासून माहिती घेत आहोत. यानंतर काय मागण्या करायच्या त्या आम्ही शासनाकडे करणार आहोत. तसेच काही संस्था आणि कंपन्या यांच्याकडे आम्ही मदतीसाठी आवाहन करीत आहोत. रयत शिक्षण संस्थेकडून पुरग्रस्तांची राहण्याची सोय केली आहे. एक दिवसाचा पगार सर्व कर्मचारी पूरग्रस्तांना देणार आहेत.
अलमट्टी धरणातून सोडण्यात येणारे प्रत्यक्ष पाणी आणि वास्तव यामध्ये तफावत आहे. धरणातून कमी प्रमाणात पाणी सोडल्यामुळे सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात फुगवटा येऊन फटका बसतो आहे, याबाबत आम्ही यापूर्वी काही निकष घालून दिलेले होते, मात्र ते पाळले जातात की नाही, हे पाहण्याची जबाबदारी पूर्णपणे शासनाची आहे. कर्नाटककडून विसर्ग सांगितला जातो, मात्र प्रत्यक्ष  वेगळा अनुभव असल्याची आम्ही खातरजमा केली आहे. शिवाय कर्नाटक ५ लाख क्यूसेक सांगताना, मात्र त्यांच्याच बेबसाइटवर  साडेतीन लाख विसर्ग दिसतो आहे.