शासकीय रुग्णालयात रेबीशिल्ड इंजेक्शनचा तुटवडा

शासकीय रुग्णालयात रेबीशिल्ड इंजेक्शनचा तुटवडा

शासकीय रुग्णालयात रेबीशिल्ड इंजेक्शनचा तुटवडा 

शहरातील सलग चौथी घटना : नुतन मराठी शाळेजवळ भटक्या कुत्र्याने घेतला चावा, कराड साताऱ्यातही रुग्णाची फरपट, नातेवाईकांचा संताप

कराड/प्रतिनिधी :
          शहरात दोन दिवसांपूर्वी भटक्या कुत्र्यांनी दोन लहान मुलांवर हल्ला केल्याची घटना घडली होती. यातील नुतन मराठी शाळेजवळ खेळत असलेल्या 6 वर्षीय लहान मुलाला चावलेले कुत्रे पिसाळलेले असल्याचे जखमी मुलाच्या नातेवाईकांच्या लक्षात आले. अशा रुग्णासाठी आवश्यक रेबीशिल्ड इंजेक्शन कराड शासकीय उपजिल्हा रुग्णालयात नसल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. सातारा शासकीय रुग्णालयातही त्यांची परवड चालूच होती. त्यामुळे पुन्हाएकदा शासकीय रुग्णालय प्रशासनाचा हलगर्जीपणा समोर आला आहे. 
           येथील मंगळवार पेठेत नुतन मराठी शाळेजवळ खेळताना भटक्या कुत्र्याने शिवे़द्र कदम या 6 वर्षीय लहान मुलावर हल्लाकरत त्याचा चावा केला. त्यानंतर जखमी मुलाला उपचारासाठी येथील वेणूताई चव्हाण शासकीय उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. याठिकाणी जखमी मुलावर केवळ प्राथमिक उपचार करण्यात आले. तसेच रुग्णालयात सध्या रेबीशिल्ड इंजेक्शन उपलब्ध नसल्याचे जखमी मुलाच्या नातेवाईकांना रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे नातेवाईकांचा काही काळ संताप झाला. परंतु, पिसाळलेला कुत्रा चावल्यानंतर रुग्णाला 24 तासाच्या आत रेबीशिल्ड इंजेक्शन देणे आवश्यक असल्याने त्याला तात्काळ सातारा येथील शासकीय रुग्णालयात हलवा, असेही उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून रुग्णाच्या नातेवाईकांना सांगण्यात आले. त्यानंतर नाईलाजानेच जखमी मुलाच्या नातेवाईकांनी त्याला घेऊन सातारा शासकीय रुग्णालयाकडे धाव घेतली.
         दरम्यान, जखमी मुलाला सातारा येथे उपचारासाठी घेऊन जाण्यास त्यांच्या नातेवाईकांना चारचाकी वाहन उपलब्ध होत नव्हते. त्यामुळे त्यांच्या जीवाची चांगलीच घालमेल सुरु होती. तत्पूर्वी, सदर घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते व ‘दक्ष कराडकर’ व्हाट्सअप ग्रुपचे अॅडमीन प्रमोद पाटील यांनी समजली होती. त्यानंतर तात्काळ त्यांनी कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मुलाच्या नातेवाईकांशी संपर्क केला. यावेळी नातेवाईकांनी त्यांना सदर हकीकत सांगून रुग्णाला उपचारासाठी सातारा शासकीय रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी आपणाला चारचाकी वाहन उपलब्ध होत नसल्याची हकीकतही सांगितली. यावेळी क्षणाचाही विलंब न करता प्रमोद पाटील यांनी त्यांना स्वतःचे चारचाकी वाहन देऊ केले. परंतु,  नातेवाईकांपैकी कोणालाही ते वाहन चालवता येत नसल्याने वाहन चालकाचा प्रश्न निर्माण झाला. यावरही पाटील यांनी त्वरित तोडगा काढत त्यांचे मित्र इंद्रजित घोलप यांना त्यांच्यासोबत सातारा येथे जाण्याची विनंती केली. त्यावर, घोलप यांनीही वेळ न दवडता रुग्ण व त्याच्या नातेवाईकांना घेऊन थेट सातारा शासकीय रुग्णालय गाठले.
           परंतु, सातारा शासकीय रुग्णालयात पोहोचल्यानंतरही रुग्ण व त्याच्या नातेवाईकांची परवड काही थांबली नाही. जखमी शिवे़द्र कदम याला सातारा शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याठिकाणी प्रथम रुग्णालयातील परिचारिकेने रुग्णाला टेस्टिंग डोस देऊन त्याचा काही विपरीत परिणाम येतो, हे पाहण्यासाठी 1 तास थांबण्यास सांगितले. त्यानंतर काही परिणाम न जाणवल्याने परिचारिकेने नातेवाईकांकडे एक इंजेक्शन देऊन ते मुख्य डॉक्टरांना दाखवण्यास सांगितले. मात्र, डॉक्टरांनी सदर इंजेक्शन मुदतबाह्य झाल्याचे सांगत दुसरे इंजेक्शन आणण्यास सांगितले. परत, नातेवाईक सदर परिचारीकडे इंजेक्शन आणण्यासाठी गेले असता, त्यांनी इंजेक्शन रुग्णालयात शिल्लक नसून ते उद्या उपलब्ध होईल, असे सांगितले. यावेळी रुग्णाच्या नातेवाईकांना संताप अनावर झाला. 
          मात्र, रुग्णाला तात्काळ योग्य उपचार मिळणे आवश्यक असल्याने इंद्रजित घोलप यांनी बाहेरच्या औषध दुकानात सदर इंजेक्शन उपलब्ध होतेय का? यासाठी प्रयत्न सुरु केले. सुदैवाने त्यांना साताऱ्यातील एका औषध दुकानात एक इंजेक्शन उपलब्ध झाले. परंतु,  शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत मिळणाऱ्या इंजेक्शनसाठी खासगी औषध दुकानात 2 हजार रुपये मोजावे लागले. ते इंजेक्शन डॉक्टरांना दाखवल्यानंतर त्यांनी हे इंजेक्शन रुग्णांना देण्यास काही हरकत नसल्याचे सांगितल्यानंतर घोलप यांच्यासह रुग्णाच्या नातेवाईकांचा जीव भांड्यात पडला.
          सदर रेबीशिल्ड इंजेक्शन कराडच्या उपजिल्हा शासकीय रुग्णालयासह साताऱ्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयात मोफत उपलब्ध होणे गरजेचे होते. परंतु,कराडसह साताऱ्यातील शासकीय रुग्णालयातही रेबीशिल्ड इंजेक्शन उपलब्ध न झाल्याने शासकीय रुग्णालय प्रशासनाच्या भोंगळ कारभाराची चांगलीच प्रचीती रुग्णाच्या नातेवाईकांना या प्रसंगामुळे आली. त्यामुळे त्यांनी या दोन्ही रुग्णालय प्रशासनाच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला. तसेच शासकीय रुग्णालयांच्या या शंकास्पद कारभाराला कराड नगरपालिकेसह कराड शासकीय उपजिल्हा रुग्णालय व सातारा जिल्हा शासकीय रुग्णालय प्रशासन जबाबदार असल्याची संतप्त भावनाही त्यांनी व्यक्त केली.
          त्याचबरोबर या संपूर्ण संकटकाळात रुग्णासह त्याच्या नातेवाईकांच्या मदतीला सामाजिक कार्यकर्ते प्रमोद पाटील व त्यांचे मित्र इंद्रजित घोलप देवदूतासारखे धावून आल्याचे भावनिक मत व्यक्त करत या दोघांमुळेच रुग्णाला वेळेवर योग्य उपचार मिळाल्याने रुग्णाच्या नातेवाईकांकडून प्रमोद पाटील व इंद्रजित घोलप या दोघांचेही आभार व्यक्त करण्यात आले.
           दरम्यान, दुसऱ्या घटनेत बुधवार पेठेतील लहान मुलीच्या कानाला कुत्र्याने चावा घेतला होता. तिलाही सातारा येथे रेबीशिल्ड इंजेक्शन देण्यासाठी नेण्यात आले होते. तिला सातारा शासकीय रुग्णालयात स्टॉक चेक केल्यानंतर सुदैवाने एक इंजेक्शन सापडले. ते इंजेक्शन दिल्याने वेळ मारून निघाली. अन्यथा तिच्या नातेवाईकांनाही सदर इंजेक्शनसाठी फरफट करावी लागली असती. एकंदरीत शासकीय रुग्णालयांच्या या गलथान कारभाराबाबत रुग्णांच्या नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त केला.

....................................................................

गेल्या दोन-तीन दिवसात लहान मुलांवरही भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. अशा परिस्थितीत कराड शासकीय उपजिल्हा रुग्णालयात रेबीशिल्ड इंजेक्शन उपलब्ध नसणे ही गंभीर बाब आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून त्यांना नाहक त्रास सोसावा लागत आहे. यापुढे नागरिकांवर अशी वेळ येऊ नये, याची रुग्णालय प्रशासनासह पालिका प्रशासनानेही दक्षता घ्यावी.

      – प्रमोद पाटील (सामाजिक कार्यकर्ते, कराड)

.......................................................................
पिसाळलेले कुत्रे चावल्याने शिवे़द्रला उपचारासाठी कराड शासकीय उपजिल्हा रुग्णालयात नेले. परंतु, त्याठिकाणी रेबीशिल्ड इंजेक्शन नसल्याचे सांगण्यात आले. साताराशासकीय रुग्णालयातही ते उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत मिळणारे इंजेक्शन खासगी औषध दुकानातून 2 हजारांना विकत घ्यावे लागले. या सगळ्यामध्ये मोठा मनस्ताप सहन करावा लागला. शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांची परवड होणे, ही बाब नवीन नसून या व्यवस्थेत बदल व्हायला हवा.

       – गणेश कदम (रुग्णाचे नातेवाईक)