शिराळा विधानसभा मतदारसंघात कमळ फुलणार - देवेंद्र फडणवीस

शिराळा विधानसभा मतदारसंघात कमळ फुलणार - देवेंद्र फडणवीस

शिराळा/प्रतिनिधी :

                         शिराळा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार शिवाजीराव नाईक यांच्या सोबत आता सत्यजित देशमुखही भाजप मध्ये आल्याने शिराळा विधानसभा मतदारसंघात कमळ फुलणार  ही  काळया दगडावरील पांढरी रेष आहे. कोकरूड येथे शिवाजीराव देशमुख यांचे भव्य स्मारक उभारणार असुन आमदार शिवाजीराव नाईक यांनी शिराळा, वाळवा तालुक्यास वरदायी ठरणाऱ्या वाकुर्डे योजनेसाठी पंधरा वर्षे संघर्ष केला. ती योजना आम्ही पाचवर्षात पुर्णत्वास आणली  असल्याचे प्रतिपादन  राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

                       कासेगांव ता. वाळवा येथे महाजनादेश यात्रेमध्ये ते बोलत होते. यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार शिवाजीराव नाईक, सत्यजित देशमुख,  कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, मंत्री सुरेश खाडे, आमदार विलासराव जगताप, आमदार निरंजन डावरे, माजी आमदार रमेश शेंडगे, माजी आमदार भगवानराव साळुंखे, युवा नेते रणधीर नाईक आदी उपस्थित होते. दरम्यान, महाजनादेश यात्रेचे कासेगाव येथे मोठ्या जलोशात स्वागत करण्यात आले. यावेळी शिराळा विधानसभा मतदारसंघातील आमदार शिवाजीराव नाईक व सत्यजित देशमुख यांचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.

                        मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, शिराळा विधानसभा मतदारसंघातील जेष्ठ नेते कै.शिवाजीराव देशमुख हे निष्टावंत व संयमी नेतृत्व होते. तळागाळातील लोकांशी त्यांची नाळ जोडलेली होती. देशमुख साहेबांनी कधीही गटातटाचे राजकारण केले नाही. सत्यजित देशमुखही आता आपल्या सोबत आले आहेत. त्यामुळे काहीही काळजी करण्याचे काम नाही. आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा कमळ फुलनार ही  काळ्या दगडावरील पांढरी रेष आहे. या विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव नाईक यांनी मतदारसंघात अनेक समाजोपयोगी कामे केली आहेत. त्यांनी आघाडीच्या काळात शिराळा, वाळवा तालुक्यातील लोकांना वरदायी ठरणाऱ्या वाकुर्डे योजनेसाठी खस्ता खाल्या आहेत.  त्यासाठी त्यांनी एकदोन नव्हे तर पंधरा वर्षे संघर्ष केला आहे. परंतु, युतीचे सरकार येताच आम्ही पाच वर्षांत ही योजना पुर्णत्वास आणली असून येत्या दिवाळीपर्यंत  शेतकर्यांच्या शेतात या योजनेचे पाणी पडले, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

                         यावेळी आ. शिवाजीराव नाईक  1995  ला दोन शिवाजीराव गट वेगळे झाले होते.  त्यानंतर डिसेंबर  2006 ला ते एकत्र आले होते. पुन्हा 2009 मध्ये हे गट वेगळे झाले आणि आता आज 15 सप्टेंबर ला हे दोन गट एकत्र आले आहेत.  त्यामुळे शिवाजीराव देशमुख यांचा जवळचा कार्यकर्ता व सत्यजित देशमुख याचा मोठा भाऊ म्हणून आपली भूमिका महत्वाची असून त्यांच्या विजयासाठी आपण सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी आ. शिवाजीराव नाईक व सत्यजित देशमुख यांच्या उद्योग समुहातील संचालक,  पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. प्रास्ताविक व सुत्रसंचालन विनायक गायकवाड यांनी केले. तर आभार रमेश गिरी यांनी मानले. 

              दरम्यान, सांगली जिल्ह्यात शिराळा तालुक्यातील काँग्रेसचे नेते सत्यजित देशमुख यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. कऱ्हाड येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.  त्यानंतर  कराडहून कोल्हापूरकडे  जाताना, शिराळा मतदारसंघातील कासेगाव या सांगली जिल्ह्यातील पहिल्याचा गावात देशमुख गटाने जोरदार शक्ती प्रदर्शन करत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या महाजनादेश यात्रेचे जोरदार स्वागत केले. यावेळी भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक,  महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, नेते उदयनराजे भोसले आदी प्रमुख उपस्थित होते.