शिवसेनेचे नेते अशोकराव भावके यांचे अपघाती निधन

शिवसेनेचे नेते अशोकराव भावके यांचे अपघाती निधन झाले. कराड-रत्नागिरी महामार्गावर घोगाव येथे मंगळवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या घटनेने घोगाव, उंडाळे परिसरासह तालुक्यावर शोककळा पसरली आहे. गुरुवारी 17 रोजी घोगाव येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

शिवसेनेचे नेते अशोकराव भावके यांचे अपघाती निधन
शिवसेना नेते अशोकराव भावके

शिवसेनेचे नेते अशोकराव भावके यांचे अपघाती निधन

घोगाव, उंडाळे परिसरासह तालुक्यावर शोककळा, शिवसैनिकांना शोक अनावर 

कराड/प्रतिनिधी : 

          घोगाव ता. कराड येथील श्री संतकृपा शिक्षण संस्था व मातोश्री सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अशोकराव भावके (वय 52) यांचे अपघाती निधन झाले. कराड-रत्नागिरी महामार्गावर घोगाव येथे मंगळवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. ते महामार्गावर उभे राहिले असताना एका भरधाव वेगाने आलेल्या कारने त्यांना जोरदार धडक दिली. यामध्ये ते गंभीर जखमी होऊन त्यांचे अपघाती निधन झाले. या घटनेने घोगाव, उंडाळे परिसरासह तालुक्यावर शोककळा पसरली आहे. 

       याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, घोगाव येथे श्री संतकृपा शिक्षण संस्थेसमोर कराड-रत्नागिरी महामार्गावर अशोकराव भावके यांचे मातोश्री हॉटेल आहे. या हॉटेलसमोर मंगळवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास ते  महामार्गावर उभे होते. यावेळी महामार्गावरून भरधाव वेगाने आलेल्या एका कारने त्यांना जोरदार धडक दिली. यामध्ये ते महामार्गावर डांबरी रस्त्यावर पडल्याने ते गंभीर जखमी झाले. ही घटना निदर्शनास येताच हॉटेलमधील लोकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत त्यांना उपचारासाठी मलकापूर (कराड) येथील कृष्णा रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. 

       दरम्यान, याबाबतची माहिती तालुक्यासह जिल्हाभरात पसरली. त्यानंतर अनेक शिवसैनिकांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. त्यांच्या निधनाची वार्ता समजल्यावर अनेक शिवसैनिकांना शोक अनावर झाला. शुक्रवारी १८ रोजी घोगाव येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

कराड दक्षिणेत भगवा झळकला 

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून 1995 साली आशोकराव भावके यांनी शिवसेनेच्या चिन्हावर विधानसभा निवडणूक लढवली. कराड दक्षिण हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. मात्र, या मतदारसंघात 1995 मध्ये पहिल्यांदाच भावके यांनी काँग्रेसच्या स्व. विलासकाका पाटील-उंडाळकर यांच्या विरोधात शिवसेनेतून लढत दिली होती. त्यावेळी त्यांनी कराड दक्षिणमध्ये शिवसेनेचा झंझावात निर्माण करत भगवा झळकवला. परंतु, त्यांना यश आले नाही. मात्र, या निवडणुकीनंतरच खऱ्या अर्थाने त्यांच्या राजकीय वाटचालीस सुरुवात झाली. 

श्री संतकृपा शिक्षण संस्थेची स्थापना 

अशोकराव भावके यांनी 1995 मध्ये शिवसेनेच्या माध्यमातून कराड दक्षिण विधानसभेची निवडणूक लढवली. त्यानंतर त्यांनी अल्पावधीतच घोगाव येथे त्यांच्या जन्मगावी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंजिनीअरिंगचे शिक्षण मिळावे, या उद्देशाने त्यांनी श्री संतकृपा शिक्षण संस्थेची स्थापना केली. या संस्थेमधून आतापर्यंत घोगाव, उंडाळे, येळगाव, शेडगेवाडी भागातील अनेक विद्यार्थ्यांनी इंजिनीअरिंगची पदवी संपादन केली आहे.