महादेव लोहार यांचे गणेशमूर्तीतून कोरोनालढयाचे प्रबोधन

कलाशिक्षक महादेव काशिनाथ लोहार हे सध्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या तळमावले ता. पाटण जि. सातारा येथील श्री वाल्मिकी विद्यामंदिर या हायस्कुलमध्ये ज्ञानदानाचे काम करतात. कलाकार महादेव लोहार यांनी लॉकडाऊनच्या कालावधीत श्री गणेशाची अभूतपूर्व मूर्ती बनवली आहे. ही मूर्ती ‘कोरोना वध’ हा विषय घेऊन तयार केल्यामुळे सर्वत्र चर्चेचा विषय बनली आहे. तसेच या मूर्तीतून कोविड- १९ विषाणूशी सर्वसामान्य नागरिकाने लढा कसा दिला पाहिजे, याचे प्रबोधन होते.

महादेव लोहार यांचे गणेशमूर्तीतून कोरोनालढयाचे प्रबोधन
श्री गणेश मूर्ती / कोरोना वध / मूर्तिकार महादेव लोहार

कराड / अशोक सुतार       

                                                                                                 कलाशिक्षक महादेव काशिनाथ लोहार हे सध्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या तळमावले ता. पाटण जि. सातारा येथील श्री वाल्मिकी विद्यामंदिर या हायस्कुलमध्ये ज्ञानदानाचे काम करतात. लॉकडाऊनच्या काळात शाळा, महाविद्यालये बंद आहेत. मुलाचे कलाकार असलेल्या महादेव लोहार यांनी लॉकडाऊनच्या कालावधीत श्री गणेशाची अभूतपूर्व मूर्ती बनवली आहे. ही मूर्ती ‘कोरोना वध’ हा विषय घेऊन तयार केल्यामुळे सर्वत्र चर्चेचा विषय बनली आहे. तसेच या मूर्तीतून कोविड- १९ विषाणूशी सर्वसामान्य नागरिकाने लढा कसा दिला पाहिजे, याचे प्रबोधन होते. शिल्पकार महादेव लोहार सर यांनी श्री गणेशाची मूर्ती उत्तमरीत्या साकार केली आहे.                                                                                                                                             सध्या कोरोनाचा प्रसार सर्वत्र असून हा कोरोना विषाणू चीनमधून जगात पसरल्याचा संशय आहे. या विषयाच्या पार्श्वभूमीवर महादेव लोहार सर यांनी श्री गणेशाची दोन ते अडीच फुटाची मूर्ती तयार केली आहे. श्री गणेश धनुष्यबाणासह सज्ज असून त्यांच्या भात्यात सॅनिटायझर, मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग असे तीन बाण आहेत. श्री गणेश वाघावर बसून चीनमधून आलेल्या कोरोनारूपी राक्षसाचा वध करत आहेत. श्री गणेशाचे वाहन मुषकाने (उंदीर ) तोंडावर मास्क परिधान केला आहे. कोरोना राक्षसाच्या डोक्यावर कोरोना विषाणूची काटेरी प्रथिनांची खिळ्यासारखी टोके (स्पाईक ग्लायकोप्रोटीन ) शिल्पकाराने दाखवली आहेत. यात शिल्पकाराचे बारीक निरीक्षण दिसून येते. राक्षसाचा चेहरा चीनी बनावटीचा आहे. शिल्पकार महादेव लोहार यांनी आत्तापर्यंत अनेक प्रकारच्या मुर्त्या तयार केल्या. परंतु ही श्री गणेशाची मूर्ती सर्वसामान्य लोकांना कोविड- १९ शी कसे लढावे, याचे प्रबोधन करते. म्हणूनच शिल्पकाराच्या या श्री गणेश मूर्तीचे सर्वत्र कौतुक होत आहे.                                                                                                               महादेव लोहार हे मुळचे पाटण तालुक्यातील उमरकांचन (जि. सातारा ) रहिवासी असून ते सध्या  गुढे, ता. पाटण जि. सातारा येथे राहतात. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूरच्या श्री वाल्मिकी विद्यामंदिर, तळमावले येथे ते कलाशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. महादेव लोहार यांना लहानपणापासून कलेची आवड असून त्यांचे शिक्षण आर्ट्स कॉलेज, कोल्हापूर,सातारा तसेच इस्लामपूर येथे झाले आहे. त्यांनी ए.एम.( आर्ट मास्टर) चे शिक्षण घेतले आहे. विविध विषयांवर अनेक तैलचित्रे, रचनाचित्र तसेच शिल्प प्रकारांत- उठावशिल्प रचना साकारल्या. ते गणेश मूर्ती पंचवीस वर्षापासून बनवत आहेत. सध्या नोकरीत असल्यापासून प्रत्येक वर्षी एक गणेश मूर्ती घरीच बनवतात आणि घरीच त्या मूर्तीची प्रतिष्ठापना करतात. विशेष म्हणजे महादेव लोहार यांनी आत्तापर्यंत सर्व मूर्ती पर्यावरणपूरक शाडू मातीतच बनवल्या आहेत. वेळोवेळी मूर्तीमधून अनेक नवनवीन संदेश देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. महादेव लोहार यांना विचारले असता ते म्हणाले की, दरवेळी एक नवी कल्पना तसेच मूर्तीमधील वास्तवता टिकवण्याचा प्रयत्न मी नेहमी करतो. तसेच पर्यावरणपूरक मूर्तीमुळे निसर्ग समतोलही साधला जातो. दरवेळी प्रबोधनात्मक विषय घेऊन मी शिल्प करतो. महादेव लोहार यांना महाविद्यालयीन जीवनात ‘व्यसनमुक्ती’ या विषयावर पोस्टर स्पर्धेत महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक मिळाला. तसेच अनेक पारितोषिके मिळाली. आई वडील व कलाप्रेमी यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे कलेचा प्रवास मी साध्य केला, अशी भावना महादेव लोहार यांनी दैनिक प्रीतिसंगमशी बोलताना व्यक्त केली.