उद्धव ठाकरें शिवाय 'त्या' खासदारांची दिल्लीची वाट बिकट

इंडिया टुडे,सी व्होटरच्या सर्वे भाजपची चिंता वाढवणारा अंदाज

उद्धव ठाकरें शिवाय 'त्या' खासदारांची दिल्लीची वाट बिकट

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशिवाय भाजपचे पानिपत होणार असल्याचा इंडिया टुडे,सी व्होटरचा सर्वे भाजपची चिंता वाढवणारा ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे शिंदे गटासोबत महाराष्ट्रात सत्ता स्थापन केल्यावर  सर्वच्या सर्व म्हणजे ४८ लोकसभेच्या जागा जिंकण्यासाठी कंबर कसलेल्या भाजपला यामुळे खडबडून जागे होण्याची वेळ आलेली आहे.

महाराष्ट्रात सध्य स्थितीत लोकसभा निवडणुका झाल्यास महाविकास आघाडीला ३४ जागा मिळतील, असा धक्कादायक अंदाज इंडिया टुडे आणि सी व्होटरच्या सर्व्हेमध्ये व्यक्त करण्यात आला आहे. याचा अर्थ भाजप आणि शिंदे सेनेला मिळून फार तर १४ जागा मिळतील. परंतु भाजप नेत्यांचा अंदाज त्यांना ४८ पैकी ४८ जागा मिळतील आणि बारामतीमध्येही पवार कुटुंबास अस्मान दाखवले जाईल, असा आहे! सी व्होटरच्या अंदाजाप्रमाणे,भाजपा आघाडीला फटका बसलाच, तर त्यामागील कारण काय असू शकेल ?भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेत फूट पाडून खेळलेल्या राजकारणामुळे शहरी,ग्रामीण, मध्यमवर्गीय मतदार रागावले असतील का ? असा कळीचा प्रश्न उपस्थित होत आहे. महाविकासला जास्त जागा मिळत असल्यास, त्यात शिवसेनेचा वाटा अर्थातच जास्त असू शकतो. 'बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारापासून उद्धव दूर गेले', असा प्रचार करूनही उद्धवसेनेलाच अधिक यश मिळाले, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या गटातील  'खासदारांचे' काय होणार या प्रश्नाचे उत्तर काळच देईल.

शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांच्यात पंचवीस वर्षांपूर्वी झालेली युती महाराष्ट्रात भाजपला आपले हातपाय पसरायला उपयोगी पडली होती. परंतु गरज सरो आणि वैद्य मरो या प्रमाणे अपेक्षित फायदा साध्य झाल्यावर मित्रपक्षांना संपविण्याचे पातक आणि ब्रिटिशांची कार्यशैली म्हणजे तोडा फोडा आणि राज्य करा नीती अवलंबली असल्याने मतदारांच्यात नाराजी असण्याची शक्यता आहे आजपर्यंत अनेकवेळा शिवसेनेत फूट पडली होती परंतु नेहमी नव्या जोमाने आणि उमेदीने पक्ष पुन्हा फिनिक्स पक्षाप्रमाणे उभा राहिला होता कारण तळागाळातील कट्टर शिवसैनिक ही शिवसेनेची ताकत आहे आणि यामुळेच इंडिया टुडे,सी व्होटरचा सर्वे महाविकास आघाडीसाठी अनुकूल ठरला असण्याची शक्यता आहे.

भारतीय जनता पार्टीने गेल्या आठ ते दहा वर्षात राजकारण करीत असताना दुसरे पक्ष अथवा गटाला चिथावणी देऊन आपलेसे करण्यात धन्यता मानली होती यामध्ये सुरुवातीला यश देखील आले परंतु यामुळे स्वपक्षातील जेष्ठ आणि अनुभवी लोकांची नाराजी वाढत गेली वरकरणी एकसंघ दिसणारी भारतीय जनता पार्टी अंतर्गत कुरबुरीमुळे पोखरली जाऊ लागली आहे शिंदे गटाला सामावून घेताना त्यांचे आमदार खासदार असणाऱ्या तालुक्यात भाजपची व्होटबँक सक्षम पर्यायांच्या शोधात असून संकटात संधी शोधणाऱ्या उद्धव ठाकरेंनी दादा भुसेंच्या मतदारसंघात हिरेंना जवळ करून भावी राजकीय खेळीची झलक दाखवली आहे.

सातारा जिल्ह्यातील पाटण आणि कोरेगाव मतदारसंघाच्या बाबतीत आतापासूनच उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली असून याला जिल्ह्यातील भाजपच्या एका गटाची छुपी साथ असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे आ.महेश शिंदे यांनी व्यक्त केलेली मंत्री होण्याची इच्छा आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी टाकलेलं जाळं याच्यामागे जिल्ह्यातील भाजपचा एक मोठा नेता तिरक्या नजरेने पाहत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.