स्वतःच्या विकासासाठी आयुष्यभर विद्यार्थी म्हणून जगा - आ. पृथ्वीराज चव्हाण

स्वतःच्या विकासासाठी आयुष्यभर विद्यार्थी म्हणून जगा - आ. पृथ्वीराज चव्हाण
स्वतःच्या विकासासाठी आयुष्यभर विद्यार्थी म्हणून जगा - आ. पृथ्वीराज चव्हाण

कराड/प्रतिनिधी : 

                        नोकरी, उद्योग आणि राजकारणात मोठी आव्हाने आहेत. तरुणांनी या क्षेत्रामध्ये संधी शोधत असताना तुम्ही त्याकडे कोणत्या नजरेने पाहता हे खूप महत्वाचे आहे. त्याचबरोबर तुम्हाला आयुष्यभर विद्यार्थी म्हणून राहता आले पाहिजे. असे प्रतिपादन राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. 

                       कराड येथील शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयात बुधवारी 18 रोजी युवा संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डाॅ. सुभाष शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पृथ्वीराजबाबांनी भर पावसात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी आपल्या विद्यार्थीदशेपासून मुख्यमंत्रीपदाच्या वाटचालीपर्यंतचे विविध पैलू उलगडले. बुधवारी सकाळी महाविद्यालयाच्या प्रांगणात आ. चव्हाण यांचा विद्यार्थ्यांशी थेट युवा संवाद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

                       या कार्यक्रमाचे विद्यार्थ्यांनी आ. चव्हाण यांना रोजगार, देशासमोरील आव्हाने, पुढील कराडचे स्वप्न यासह अनेक प्रश्न विचारले. त्यास त्यांनी समर्पकपणे उत्तरे दिली. सुरुवातीस आ. चव्हाण यांनी आपल्या विद्यार्थीदशेपासूनच्या वाटचालीमधील टप्पे विद्यार्थ्यांसमोर उलगडले. मी कराड नगरपालिकेच्या शाळेत सातवीपर्यंतचे शिक्षण घेतले. नंतर मला टिळक हायस्कूलमध्ये प्रवेश घ्यायचा होता. परंतु वडील खासदार झाल्याने दिल्ली येथे माध्यमिक शिक्षणासाठी जावे लागले. तेथून उच्च शिक्षण मी बीआयटीएस पिलानी विद्यापीठ, तसेच अमेरिकेतील प्रसिध्द बर्कले विद्यापीठात पूर्ण केले. 

                    कुंभारगावपासून मी आयुष्याच्या प्रवासाला सुरुवात केली. मी गुणवत्तेच्या आधारावर जगातील सर्वोत्कृष्ठ शिक्षणापर्यंत पोहचलो. त्यामुळे ग्रामीणपासून सुरुवात करुन जागतिक शिक्षणापर्यंतची दोन टोके मला पाहता आली. माझं राजकारणात यायचं असं ठरलं नव्हतं. पण घरच्या राजकीय पार्श्वभूमीवर मला राजीव गांधींनी 1991 ला संधी दिली. यशवंतराव चव्हाण यांचाही खेड्यात जन्म झाला. त्यांची जिद्द आणि परिश्रम करण्याची तयारी होती. स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी तुरुंगवासही भोगला. हे त्यांना राजकीय फायदा घेण्यासाठी मुळीच करायचे नव्हते. त्यांनाही राजकारणात संधी मिळाली. त्यात त्यांनी आपले कौशल्य सिध्द केले. त्यामुळे सद्याच्या परिस्थितीत युवकांनी आपल्याला काय करता आले पाहिजे. हे पहिल्यांदा ठरवता आले पाहिजे. व स्वतःचे किमान कौशल्य विकसित केले पाहिजे. तरच सर्वकाही शक्य आहे. 

                      कोणतेही क्षेत्र तुम्हाला यशस्वी करायचे असेल, तर त्याआधी तुम्हाला स्वतःला सिध्द करता आले पाहिजे. मला आमदार म्हणून मतदारसंघाशी कनेक्ट व्हायची संधी मिळाली. ज्या लोकांनी मला इथपर्यंत पोहचवले. त्यांच्यासाठी मला खूप काम करता आले. ते म्हणाले, राजकारणात टप्प्या-टप्प्याने जावे लागते. ते टप्पे मला यशस्वीपणे पेलता आले. मी केंद्र व राज्यात मंत्री असताना लोकहितासाठी सूक्ष्मपणे काम केले. राज्यात आल्यानंतर कराड दक्षिण व उत्तर मतदारसंघात एकत्रित असा अठराशे कोटी रुपयांचा निधी आणला. याचे मोठे समाधान वाटते. आपल्या लोकप्रतिनिधीचे राजकीय वजन असले, तर काहीही शक्य होते. हे मला यातून सिध्द करता आले. मला पुन्हा संधी मिळाल्यास मी कराड व परिसराचे स्वरुप बदलल्याशिवाय राहणार नाही. कारण मला जागतिक स्तरावरील प्रगतीचा अनुभव आहे. 

                     कराडची शैक्षणीक गुणवत्ताही उच्च आहे. कराडच्या शैक्षणीक प्रगतीसाठी जे काही करता येईल, त्याकडे माझे लक्ष आहे. भविष्यात कराड जिल्हा व्हावा व कराड परिसरात आयटी पार्कची उभारणी करण्याआधी कराडभोवतीच्या सर्व सुविधा विकसित झाल्या पाहिजेत. त्याचा टप्पा मी रस्ते चौपदरीकरणाच्या माध्यमातून पूर्ण केला आहे. युवकांना राजकारणातील संधी या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले, तुमची उपयुक्तता समाजाला दाखवता आली पाहिजे. मग ठरवा की, मला निवडणूकीच्या राजकारणात यायचे आहे. राजकारण हा पोटापाण्याचा धंदा नाही. त्याबाजूने विचार करुन येणार असाल तर मुळीच राजकारणात येवू नका. राजकारणात येण्याआधी तुमची उपयुक्तता समाजाला दाखवावी लागेल. 

                       ते म्हणाले, देशातील अर्थव्यवस्थेचा विकासदर दहा टक्क्यापर्यंत नेणे हे फार मोठे आव्हान आहे. 5 टक्के अर्थिक विकास दराने देशाची प्रगती होणार नाही. बॅंकांमध्ये 73 हजार कोटींचे घोटाळे झाले आहेत. मेक इन इंडिया, मॅगनेटीक महाराष्ट्राच्या घोषणा केल्या. त्या कुठे आहेत. सरकारने योग्य निर्णय घेतले नाहीत. तर आपल्यासमोर काळजी वाटावे, असे चित्र मला दिसते. रोजगार कमी झाले आहेत. लोकसंख्या नियंत्रण होत नाही. अशा स्थितीत अर्थिक विकासाचे आकारमान वाढवता येणार नाही. परंतु दरडोई उत्पन्नात वाढ करणे आपल्याला शक्य आहे.